BREAKING NEWS
latest

यजमान महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम; महाराष्ट्राच्या महिलांचे २४ वे अजिंक्यपद तर रेल्वेचे ११ वे अजिंक्यपद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राचा भारतीय विमान प्राधिकरण संघावर डावाने विजय मिळवत 
उस्मानाबाद येथे यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघाने ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. महाराष्ट्राच्या महिलांचे हे २४ वे अजिंक्यपद ठरले आहे.

  भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला संघाने भारतीय विमान प्राधिकरण संघाचा ११-९ असा डावाने शानदार विजय मिळविला. महाराष्ट्राच्या पहिल्या तुकडीनेच संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. प्रियांका इंगळे (३.३० मिनिटे व २ गुण), अपेक्षा सुतार (२.२o व १.१०मिनिटे व १ गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. पूजा फरगडे हीने ४ गडी बाद करीत आक्रमणाची बाजू सांभाळली. दुसऱ्या डावात रेश्मा राठोड २.२० व दिपाली राठोड हीने २.३० मिनिटे संरक्षण केले. भारतीय विमान प्राधिकरण संघाकडून वीणा (१.१० मिनिटे नाबाद), ऋतुजा खरेने (१.२० मिनिटे), जान्हवी पेठे हीने (१.०० मिनिटे व १ गुण) संरक्षण करीत एकाकी लढत दिली.

पुरुषांमध्ये रेल्वेची हॅट्ट्रिक साधत ११ वे अजिंक्यपद, महाराष्ट्राला उपविजेतेपद तर कोल्हापूरला तृतीय क्रमांक

  भारतीय रेल्वेने यजमान महाराष्ट्रावर १४-१२ असा ४५ सेकंद राखून विजय मिळवित हॅटट्रिक केली. रेल्वेचे हे ११ वे विजेतेपद आहे. नाणेफेक जिंकून रेल्वेने संरक्षण स्वीकारले. महाराष्ट्राने पहिल्या आक्रमणात ६ गडी बाद केले. रेल्वेने ७ गडी बाद करीत मध्यंतरास  एका गुणाची निसटती आघाडी घेतली. महाराष्ट्राने दुसऱ्या डावातही ६ गडी टिपले. विजयासाठी रेल्वेला ६ गुण मिळवायाचे होते. त्यांनी ७ गुण मिळवित हॅटट्रिक केली.
रेल्वेकडून अक्षय गणपुले (२.०० व १.३० मिनिटे), महेश शिंदे (१.५० व १.४० मिनिटे व २ गुण), अमित पाटील (१.३० मिनिटे व १ गुण), विजय हजारे (१.१० मिनिटे), मिलिंद चौरेकर ३ गुण यांनी शानदार खेळी केली.
महाराष्ट्रकडून रामजी कश्यप (१.४० व १.३० मिनिटे व १गुण), प्रतिक वाईकर (१.५० मिनिटे), अक्षय भांगरे (१.१० मिनिटे व ४ गुण) यांनी लढत दिली.
अपेक्षा सुतार, अक्षय गणपुले सर्वोत्कृष्ट 

  अपेक्षा सुतार राणी लक्ष्मीबाई पुरस्काराची मानकरी तर अक्षय गणपुले एकलव्य पुरस्कारचा मानकरी ठरला. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतर्फे  पुरस्कारप्राप्त पुरुष व महिला खेळाडूना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. पारितोषिके विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे नाईक निंबाळकर, आमदार श्रीकांत भारतीय, कल्याणराव काळे, बँक ऑफ महाराष्ट्रच्या विभागीय व्यवस्थापक दत्तात्रय कावेरी, अभिनेत्री किरण डहाने, भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी यांच्या उपस्थितीत देण्यात आली. त्यांचे स्वागत डॉ. चंद्रजीत जाधव, रहिमान काझी व अनिल खोचरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.ज्योती वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आली.

सोलापूरचा रामजी कश्यप ठरला सर्वोत्कृष्ट संरक्षक
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू असे : 
अष्टपैलू : अपेक्षा सुतार, अक्षय गणपुले
संरक्षक : रेश्मा राठोड, रामजी कश्यप
आक्रमक : नसरीन, विजय हजारे
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत