भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारची नोट चलनातून बाद होणार असल्याचे जाहीर केले. सध्या तरी १ हजार ८३३ दशलक्ष नोटा मार्केटमध्ये आहेत. पण ३० सप्टेंबरनंतर या नोटा चलनातून बाद झाल्यावर इतर नोटांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पाच रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटा छापण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
नोटा छपाईचे काम नाशिकरोड च्या :करन्सी नोट प्रेस' कडे देण्यात आले असल्याने त्यांच्यावर चांगलाच ताण वाढणार आहे. नोटाबंदीच्या काळात प्रेसच्या कामगारांनी चोवीस तास काम केले होते. जवळपास १ वर्ष सुटी न घेता कामगारांनी काम केले. अगदी त्याचप्रमाणे प्रेसमधील दीड हजार कामगारांना पुढील चार महिन्यांच्या कालावधीत नोटबंदीच्या काळाप्रमाणेच २४ तास कामकाज करावे लागणार आहे. पाच रुपयांची नोट आता चलनातून बाद होईल असे वाटत असतानाच सरकारच्या या निर्णयाने त्या नोटेचेही महत्त्व वाढलेले आहे.
पाच, दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे आणि पाचशे या सर्वच नोटांची मागणी वाढली आणि भविष्यात आणखी वाढणार आहे, याचा विचार सरकारने केला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रेसमध्ये पाचशेच्या जवळपास २ हजार ८०० दशलक्ष नोटांची छपाई करण्यात येणार आहे, असे कळते. कारण आता लोक बँकेत जाऊन नोटा बदलायला लागले आहेत. त्यामुळे या नोटांची मागणीही वाढली आहे. नोटा छापण्याचे काम म्हैसूर, सालभोनी, देवास आणि नाशिकमध्ये होत असते. पण एकट्या नाशिकच्याच प्रेसमध्ये २ हजार ८०० दशलक्ष नोटा छापण्याचे काम होणार आहे, हे विशेष.
नेपाळचेही कंत्राट
नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसला नेपाळच्या एक हजाराच्या ४३० दशलक्ष, तर ५०च्या ३०० दशलक्ष अशा ७३० दशलक्ष नोटा छपाईचे कंत्राट मिळाले आहे. या सर्व नोटा एका वर्षात छापून द्यायच्या आहेत. विशेष म्हणजे चीनलाही स्पर्धेत मागे टाकून नेपाळच्या एक हजाराच्या नोटा छापण्याचे, तर फ्रान्सला मागे टाकून नेपाळच्या ५०च्या नोटा छपाईचे काम प्रेसने मिळवले आहे.
शंभरीच्या उंबरठ्यावर
नाशिकमधील करन्सी नोट प्रेसची स्थापना १९२४ मध्ये ब्रिटीशांनी केली होती. १९२५ पासून या प्रेसमध्ये पोस्टल स्टेशनरी आणि स्टॅम्प्सचे प्रिंटिंग सुरू झाले. त्यानंतर भारत सरकारने सर्वांत पहिल्यांदा १९२८ मध्ये इथे पाच रुपयांच्या नोटेची छपाई सुरू केली. त्याला पुढील पाच वर्षांत शंभर वर्षे पूर्ण होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा