BREAKING NEWS
latest

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये "हॅप्पी कॅम्पस, लकी कॅम्पस आणि नो मोबाईल डे" कार्यक्रमाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत


डोंबिवली दि.१३ : आनंदी राहणे, भाग्यवान असणे हा शब्दश: अर्थ घेतला तर स्वाभाविकपणे प्रत्येक व्यक्तीमध्ये दडलेल्या कला  गुणांना वाव मिळून सादर करून तिचा आनंद घेणे असा आहे. आजच्या काळात भ्रमणध्वनी (मोबाईल) शिवाय जगणे म्हणजे स्वतःसाठी एक मोठे आव्हानच आहे. आणि हे आव्हान म्हणजे शिवधनुष्य पेलण्या इतपत ते कठीण आहे. परंतु यावरही मात करून 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये आनंद आणि भाग्याचा दिवस आज साजरा झाला.
                                           '


जे एम एफ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांची संकल्पना असलेला "हॅप्पी कॅम्पस, लकी कॅम्पस आणि नो मोबाईल डे" ही कल्पना अस्तित्वात आली आणि दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षी देखील ती साकारली गेली. लहानपणी पटकन मोठे व्हावे आणि मोठेपणी लहानच असावे असे खूपदा वाटते आणि हाच आविष्कार 'जे एम एफ' संस्थेमधे घडून आला. शाळा, महाविद्यालयीन मुला-मुलींना शिशुविहर ते पदवी महाविद्यालय पर्यंत कोणत्याही वर्गात जाऊन अध्यापन करण्याची मुभा आज दिलेली होती. शिकण्याला वय नाही, शिक्षणाचा आनंद आणि लहान मोठे होऊन उत्साहाने ते आत्मसात करणे होय. छोटी मुले कॉलेज मधे जाऊन अध्यापन घेत होती तर मोठी महाविद्यालयाची मुले शिशु विहार मधे जाऊन आपले बालपण जगत होती, खेळणी खेळणे, उड्या मारणे, लहान मुलांसारखी मस्ती करत अभ्यास करणे अशा विविध प्रकारच्या गोष्टी करत सर्वच जण आनंद घेत होते.
गणराज प्रेरनोत्सव अंतर्गत 'जे एम एफ' संस्थेमधे दहा दिवसांचा गणपती बाप्पा देखील विराजमान झालेला असतो, सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्या बरोबरच संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे आणि आदर्श शिक्षिका पुरस्कृत असलेल्या नागपूरच्या ८९ वर्षीय शिक्षिका श्रीमती तुळसाबाई लाकडे यांच्या हस्ते बाप्पाची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. 'लहानपण देगा देवा', किंवा 'बालपणीचा काळ सुखाचा', हे स्वप्न सर्वांचेच असते आणि पुन्हा लहान होऊन स्वच्छंदी बागडवे असे सर्वानाच वाटते त्यामुळे आपण सर्व मोठे आज लहान होऊन जगा, आणि लहान मोठे होऊन बघा, आणि आजच्या दिवशी आपले स्वप्न साकार करा असे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी मुलांना सांगितले. तर शिकायला वय नाही आणि खेळायला मर्यादा नाही असे डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगून लहानपणीचे खेळ लगोरी, सायकल चे टायर फिरवत पळत जाणे, लंगडी, धावणे या वयातही हे खेळ मनाला आणि शरीराला चालना देण्याचे काम करतात आणि आपसूकच आपले मन बाल्यावस्थेत जाते असे डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी मुलांना सांगून प्रोत्साहन दिले.

महाविद्यालयीन मुलांनी सौ. श्रेया कुलकर्णी संगीत शिक्षिका यांच्या 'नाच रे मोरा' ह्या बालगीतावर ठेका धरून आपल्या आनंदाचा पिसारा फुलवला तर काही मुलांनी 'माझा बाप्पा किती गोड दिसतो' हे गाणे मान डोलवत म्हंटले तर लहान मुलांनी 'माझ्या पप्पांनी गणपती आणला' या गाण्यावर नाच सादर केला. त्याचवेळी शिशु विहार ते शालेय मुलांनी पदवी महाविद्यालय मधे जाऊन अर्थशास्त्र, संगणक, प्रयोगशाळा मधे जाऊन त्या विषयांचे शिक्षण घेतले. गायन, वादन, नृत्य, नाटक एकाच वेळी सर्व कार्यक्रम 'जे एम एफ' संस्थेच्या मधुबन वातानुकुलीत दालनांत चालू होते तर 'जे एम एफ मंडपम' मधे मुलांनी खाद्यपदार्थ व शालेय साहित्य, स्वतः हाताने बनवलेले हस्तकला, विक्रीस ठेवले होते. 'जे एम एफ' संस्थमधे आनंद मेळाच भरला होता. खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने सर्वांनी मनसोक्त ताव मारला. तर ब्रह्मा रंगतालय मधे मंचावर देखील खेळाची रचना केली होती. प्रत्येक मजल्यावर बुध्दीला चालना देणारे वेगवेगळे खेळ ठेवले होते. स्मरणशक्ती, बुद्धिबळ, कॅरम, सोंगट्या असे खेळ खेळून मुलांनी आनंद घेतला.

दिवसभराच्या अवधीत हजारो मुलांनी मोबाईल हातात न घेता आनंदाचा क्षण जगला आणि मन आणि शरीर प्रफुल्लित करून 'नो मोबाईल डे' साजरा केला. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सर्व मुलांचे भरभरून कौतुक केले तर ८९ वर्षीय आदर्श शिक्षिका श्रीमती तुळसाबाई लाकडे यांनी हा सोहळा बघुन आनंदित झाल्या व सर्वांना आशीर्वाद दिले. सर्व कलात्मक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य करून संस्थापक व सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली 'रम्य ते बालपण' हा दिवस साजरा केला.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत