कल्याण : मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी नियोजनबध्द कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अधिकारी वर्गास दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या संकेतस्थळावरील माहिती अद्यावत करण्यात येत असून त्या मध्ये आर.टी.एस. व आर.टी.आय ची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नागरिकांना मालमत्ताकरां विषयी विविध सेवा घेताना येणारा त्रास कमी करण्यासाठी परिवर्तन योजना महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. नगररचना विभागाकरीता सुलभ एस.ओ.पी. (सर्व साधारण पध्दती) निर्धारित करून दिल्यामुळे नागरिकांचा महापालिकेसोबतचा व्यवहार सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. या कृती आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी सर्व खाते /विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेवून आपापले कार्यालय स्वच्छ ठेवण्याबाबत व भंगार सामानाची विल्हेवाट लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विभाग/प्रभागात स्वच्छतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. जुन्या वाहनांसंदर्भात आर.टी.ओ. सोबत आवश्यक पत्रव्यवहार करून सदर वाहने निर्लेखित करण्याबाबत आर.टी.ओ. विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले आहेत.
नागरिकांच्या तक्रारींचे शिघ्रगतीने निवारण करण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे आणि ४ थ्या मंगळवारी सफाई मित्र दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे देखील आयोजन करण्यात येत आहे.
राज्यसेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने प्रथम सन २०१५ च्या आदेशानुसार शासनाकडील १५ सेवा अधिसुचित केल्या. तद़नंतर जून २०२३ च्या आदेशानुसार शासनाकडील १२ आणि महापालिकेकडील ५ अशा १७ सेवा अधिसुचित करण्यात आल्या. ऑगस्ट २०२३ च्या आदेशानुसार महापालिकेकडील ४४ आणि शासनाकडील ३१ अशा ७६ सेवा नागरिकांसाठी अधिसुचित करण्यात आल्या आणि जुन २०२४ च्या आदेशानुसार शासनाच्या ६८ आणि महापालिकेच्या ४९ अशा एकूण ११७ सेवा महापालिकेने अधिसुचित केल्या आहेत. याबाबत चे फलक सर्व नागरी सुविधा केंद्र आणि विभागात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपले सरकार पोर्टलवर व पी.जी.पोर्टलवर तक्रारीचे निराकरण नियमित स्वरूपात करण्यात येत आहे असे सांगण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा