डोंबिवली: डोंबिवलीकर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे मन प्रसन्न करणारा एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे आपला 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल'. गेल्या १५ वर्षांपासून आपल्या डोंबिवलीत हा रोझ फेस्टिवल होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, रविवारी रामनगर मधील बाल भवन येथे हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. त्या फेस्टिवलचे शनिवारी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
या फेस्टिवलला दरवर्षीप्रमाणे 'इंडियन रोझ फेडरेशन' या अखिल भारतीय गुलाबप्रेमींच्या संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच बॉम्बे रोझ सोसायटी आणि इनर व्हील क्लब, कल्याण यांची बहुमूल्य साथ लाभली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुलाबप्रेमी या फेस्टिवलमध्ये सामील झाले आहेत.
राष्ट्रीय गुलाब प्रदर्शनातील पारितोषिक विजेते प्रमुख गुलाब उत्पादक वांगणीचे आशिष मोरे यांच्या गुलाबाला 'गुलाबांचा राजा' व 'गुलाबांची राजकुमारी', पुण्यातील पुंडलिक निम्हण यांच्या गुलाबाला 'गुलाबांची राणी', वांगणी येथील चंद्रकांत मोरे यांच्या गुलाबाला 'गुलाबांचा राजकुमार' तर मन्सूरा जहूर हुसेन यांच्या गुलाबाला 'सर्वोत्कृष्ट सुवासिक गुलाब' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रशांत तेलंग, तिझारे, डॉ. धनंजय गुजराथी, निलेश आपटे यांना गुलाब प्रदर्शनात विविध पुरस्कार देण्यात आले. तसेच गेल्या ५० वर्षांपासून सातत्याने गुलाब स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या चंद्रकांत मोरे यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.
डॉ. विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे, जगदीश म्हात्रे, गणेश शिर्के, अर्शद भिवंडीवाला, मंछेर इराणी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. असा हा आपला जिव्हाळ्याचा 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल' रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आपल्या मित्रपरिवारासोबत या फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि एक आनंददायी अनुभव घ्या असे अवाहन त्यावेळी आ. रवींद्र चव्हाण यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा