BREAKING NEWS
latest

जाह्नवीज मल्टी फाउंडेशन संचालित 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर' चा डोळ्यांचे पारणे फेडणारा वार्षिक स्नेहसंमेलन ९ वा 'प्रेरणोत्सव २०२५' उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२१ : दरवर्षी सर्वच विद्यार्थी पालक ज्या गोष्टीची आतुरतेने व उत्सुकतेने वाट बघत असतात तो म्हणजे आपल्या पाल्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा. दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील जन गण मन इंग्लिश शाळा चा १७ वा आणि विद्यामंदिर चा ९ वा वार्षिक स्नेहसंमेलन 'प्रेरणोत्सव २०२५' दिनांक २० व २१ जानेवारी  रोजी चार सत्रांमध्ये डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलादालनात पार पडला.
दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वच उपस्थितांना स्नेहसंमेलनाची मेजवानीच होती. सकाळी दहा ते एक या सत्रात जन गण मन किड्स प्ले, शिशु विहार ते इयत्ता  दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा नववा 'प्रेरणोत्सव २०२५' स्नेहसंमेलन पार पडला. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, प्रमुख पाहुणे श्री.माधव जोशी, राज योगिनी बी.के.शकू दिदिजी व इतर पदाधिकारी या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. 
चारही सत्रात राष्ट्रगीत झाल्यावर  विद्यार्थ्यांनी शालेय गीत व स्वागत गीत म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले. तर इयत्ता दुसरी मधील कु. श्रावणी पवार हीने स्वागतपर भाषण केले. शिशु विहाराच्या उप-मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. इंग्लिश सेकंडरी शाळे मधून शिशु विहाराच्या अनया सागरे, सारा योही, मोठा शिशु तसेच इयत्ता दुसरी मधील अर्णव अंबिके व श्रेयांश देसाई या विद्यार्थांना 'स्टार स्टुडंट्स ऑफ द इयर' (तारका विद्यार्थी) म्हणून मान्यवरांच्या हस्ते मुकुट परिधान करून गौरविण्यात आले. तसेच सीबीएसई मधून हेतल तांडेल(इयत्ता तिसरी), मीरा पाटील(इयत्ता पाचवी), ऋषाव दास(इयत्ता आठवी), दीक्षा गरदे(इयत्ता दहावी) यांनाही पुरस्कार देण्यात आले. विद्यामंदिर मधून विहान गांधी, सुप्रिया चौधरी, हर्शील परघी यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्व मान्यवरांनी विजेत्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांचा 'कार्टून कॅरेक्टर' (व्यंगचित्र चरित्र) या छोट्या मुलांच्या आवडीचा विषय घेऊन नृत्य, नाटिका सादर केल्या गेल्या. सर्वच मुले सिंचॅन, डोरेमाँन, छोटा भीम, टॉम आणि जेरी, मिकी माऊस, बार्बी, मोटू पतलू तसेच जंगल बुक चे प्राणी बनून वेष परिधान करून तयार होऊन आले होते. मुलांचे नृत्य आणि उत्साह बघुन त्यांचे पालक देखील मुलांप्रमाणेच लहान झाले होते. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामवी, चारवी, लिरिषा, यांनी केले तर आभार प्रदर्शन मायरा या विद्यार्थीनींने केले. दुपारच्या दोन ते पाच  सत्रात जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या चे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. 'द रिअल सुपर हिरो' हा विषय घेऊन नृत्य आणि नाटिका सादर झाल्या. शिशु विहार ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आपल्या रोजच्या जीवनातले आपले हिरो म्हणजे आई बाबा, डॉकटर, शिक्षक, भाजीवाले, डबेवाले, पोलीस आहेत. सर्व मुले दिलेल्या थीम नुसार वेष परिधान करून आली होती व या सर्व रियल लाईफ हिरोना आपल्या नृत्य नाटकातून कृतज्ञता व्यक्त केली, नर्सरी मधील विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या आई बाबांनाही नृत्य करण्याची संधी मिळाली. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी 'स्वच्छ भारत' नाटिका सादर केली व स्वच्छतेचा संदेश दिला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी, अविरा, सानवी या विद्यार्थिनींनी केले तर स्वागतपर भाषण देविका हीने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरूष भांगे या विद्यार्थ्याने केले.
संध्याकाळी सहा ते नऊ च्या सत्रात जन गण मन इंग्लिश शाळेचे इयत्ता तिसरी ते दहावी या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार पडले. 'इंक्रेडिबल आर्ट' (अविश्वसनीय, अतुल्य कला) हा विषय घेऊन नृत्य, नाटक, गायन, वादन सादर केले गेले. कार्यक्रमाची सुरुवात शिव तांडव ने करण्यात आली व त्यानंतर भारतातील अतुल्य कला सर्व मुलांनी आपल्या नृत्य, नाटक, गायन, वादनातून प्रेक्षकांना दाखविल्या. यामधे शास्त्रीय गायन, वादन, अभंग, सालासा नृत्य प्रकार, राजस्थानी कठ पुतली, सावित्रीबाई फुलेंचे नाटक, पथनाट्य, एकपात्री अभिनय अशा अनेक कलांचा समावेश होता व सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दोन मधील सत्रात जन गण मन विद्यामंदिर, इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार पडले. भारत देश विविध संस्कृती कलांनी नटलेला आहे. 'सा कला या विमुक्तये' म्हणजेच कला ही सर्व बंधनातून मुक्त करते. स्वच्छंदी आनंदी राहण्यासाठी अंगी कला असणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या अंगी कला आणि नवरस असतात. जन गण मन विद्यामंदिर साठी 'नवरस ' हा विषय घेऊन विद्यार्थ्यांनी प्रत्येक नवरसाची  माहिती आपल्या नाटकात देऊन त्यावर नृत्य सादर केले. नवरसंपैकी अदभुत रस, भयानक रस अशा ह्या नृत्य नाटिका नी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. 
संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी दोन दिवसांचा 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बघुन आज आपल्या सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असे उद्गार काढून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ज्या प्रमाणे कस्तुरी मृग कस्तुरीचा सुवास घेण्यासाठी पळत असते त्यावेळी त्या मृगालाच माहिती नसते की आपल्याच अंगात कस्तुरी आहे, अगदी या मुलांचे तसेच आहे त्यांच्या स्वतःच्या अंगात कलेचे दालन आहे आणि त्या दालनातील स्वतःच्या अंगीकृत कलेचा खजिना त्यांनाही आजच उमजला, प्रत्येक मुलाला परमेश्वराने विशेष घडवले आहे. दोन्ही दिवसाचा कार्यक्रम हा अवाक करणारा होता असे उदगार काढून सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी मुलांच्या अंगीकृत कलागुणांना वाव देऊन नव्या कल्पनेच्या अविष्कारांना व्यवसायाच्या दृष्टीने स्टार्टअप करिता भांडवल म्हणून 'ऑन द स्पॉट फंडिंग' करणारे जेके स्टार्टअप सपोर्ट इन्कयूबेशन सेंटर चे फाउंडर श्री. जयेश खाडे ही उपस्थित होते.
अगदी नर्सरी पासून ते दहावी पर्यंतच्या मुलांनी एका पेक्षा एक असे सादरीकरण करून सर्व पालकांना थक्क करून टाकले. आपल्या पाल्या मधे काय कमतरता आहे, याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय कलागुण आहेत आणि त्या कला गुणांना कशाप्रकारे प्रोत्साहित करता येईल याचा विचार पालकांनी करावा, प्रत्येक मूल हे वेगळे असते, त्याची स्वतःची एक खास शैली असते त्यामुळे कुणाशीही तुलना न करता आपल्या मुलाच्या अंगभूत कलेला वाव द्या, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. कलात्मक शिक्षक संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी, नृत्य शिक्षक अभिषेक देसाई, दिपाली सोलकर, नाट्य शिक्षक प्रमोद पगारे व समूह तसेच हस्तकला शिक्षिका दीपा तांबे, सपना यांनाम, स्नेहा डोळे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभून 'प्रेरणोत्सव २०२५' हा यशस्वीरित्या पार पडला. डॉ.निखिल शासने यांनी रोजच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी योगा नृत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. संगीत शिक्षिका सौ श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत