BREAKING NEWS
latest

ठाणे, कल्याणमधील अतिक्रमण कारवाईवरुन मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
 
मुंबई : कल्याण-डोंबिवलीत उभारण्यात आलेल्या ६५ अनधिकृत इमारती पाडून टाकण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. यानंतर ६ इमारती पाडण्यात आल्या आहेत. कोर्टाने इमारती नियमित करण्यात येण्याची विनंती करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी थेट बिल्डरांना इशारा दिला आहे. 

ठाणे, कल्याण अतिक्रमण कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, "बिल्डरच कारस्थान करुन पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि कोणालातरी कोर्टात पाठवायचं असे धंदे करत आहेत. हे धंदे योग्य नाहीत. या संदर्भात एकनाथ शिंदेंशी बोलणं झालं आहे. त्यांनी तथ्य माझ्यासमोर मांडलं आहे. आम्ही कोर्टात बाजू मांडणार आहोत". 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारण्यातआलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, "राज्यात कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल त्याचं स्वागत करेन. विसंवाद नको, सुसंवाद असावा यासंदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी सुसंवाद करावा". यावेळी त्यांनी संजय राऊतांचा उल्लेख न करता टोला लगावला. "तुम्ही सर्वांनी मिळून ९ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे शिकवलं तर राज्यातील सुसंवादाची परिस्थिती सुधारेल. जसं ५० टक्के ते दोषी आहेत, तसं ५० टक्के तुम्हीही दोषी आहात," असं ते उपहासात्मकपणे म्हणाले. 

माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांवर ते म्हणाले की, "आमच्याकडे कोणीही तक्रार केली तर आम्ही त्याची चौकशी करत असतो. पण तक्रार झाली म्हणजे अनियमितता झाली असं होत नाही. तपासाच्या अंती जे काही निघेल त्यानंतर मी त्यावर वक्तव्य करेन".

"माणिकरावर कोकाटे यांना पीएस, ओसएडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो हे बहुदा माहिती नसेल. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि अंतिम निर्णय घेतला जातो. मी कॅबिनेटमध्ये तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण ज्यांची नावं फिक्सर, चुकीच्या कामात गुंतली आहेत त्यांना मान्यता देणार नाही हे स्पष्ट केलं होतं. १२५ च्या आसपास नावं आली आहेत. १०९ नावं क्लिअर केली आहेत. पण इतरांच्या नावे काहीतरी आरोप, चौकशी किंवा मंत्रालयात ज्यांच्याबद्दल फिक्सर अशी ओळख आहे. कोणीही नाराज झाले तरी मी त्यांना मान्यता देणार नाही," असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत