कल्याण : महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत दि. १ मार्च व २ मार्च रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन, शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी नानासाहेब फडके क्रीडा संकुल, लालचौकी कल्याण (प) येथे महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या शुभहस्ते सकाळी ११.०० वाजता संपन्न झाले. या स्पर्धांमध्ये सुमारे २०० पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती सहभागी झाले.
या क्रीडा स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, कॅरम अशा बैठ्या खेळांचा अंतर्भाव असून मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये गोळा फेक, नेमबाजी, व्हीलचेअर स्पर्धा, धावणे इ.स्पर्धांचा अंतर्भाव होता.
दिनांक २ मार्च रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिव्यांग व्यक्तींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल रहाणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे संपूर्ण सादरीकरण दिव्यांग व्यक्तींमार्फतच केले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचा शुभारंभ दिनांक २ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यासाठी दिव्यांग कलाकार मोठ्या हुरूपाने सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव करीत आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या संकल्पनेनुसार आणि समाज कल्याण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी पेन्शन, थेरेपी सेंटर, व्यवसाय अर्थसहाय्य, विवाह अर्थसहाय्य, शैक्षणिक शिष्यवृत्ती, खेळाडू शिष्यवृत्ती अशा अनेकविध सुविधा महापालिकेमार्फत देण्यात येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा