मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे केंद्र सरकारने वीज वितरण सेवांच्या व्यवहार्यतेसंबंधित स्थापन केलेल्या मंत्रीगटाची दुसरी बैठक पार पाडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांसमवेत संवाद साधला.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महावितरण ही भारतातील सर्वात मोठी विद्युत वितरण कंपनी आहे. महावितरणचे ३ कोटी ग्राहक असून, त्यापैकी २.२९ कोटी घरगुती ग्राहक आहेत. तसेच २२.६१ लाख व्यावसायिक ग्राहक व ४.७८ लाख औद्योगिक ग्राहक आणि ४७ लाख कृषी ग्राहक आहेत. सन २०२३-२०२४ वर्षात महावितरणचा वार्षिक वीज वापर १,४१,७७१ दशलक्ष युनिट होता. यामध्ये शेतीसाठीचा वापर ४०,९२६ दशलक्ष युनिट असून, जो एकूण वापराच्या २८% आहे, जे देशात सर्वाधिक असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. औद्योगिक ग्राहक एकूण ग्राहकांपैकी १.५% आहेत, पण ते ४१% वीज वापरतात आणि एकूण महसुलापैकी ४९% महसूल हा उद्योगातून येतो. महावितरण मुंबईच्या काही भागांना वगळता संपूर्ण राज्यातील ४५७ शहरे व ४१,९२८ गावांना वीजपुरवठा करते. महावितरण दररोज २६,००० मेगावॅट वीजेची मागणी पूर्ण करत असून, महावितरणचे उत्पन्न ₹१ लाख कोटी पेक्षा जास्त आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात ते ₹१.१२ लाख कोटी इतके असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी बैठकीत पॉवर फायनान्स कमिशन, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान राज्यातील ऊर्जा विभागांनी सादरीकरण केले.
यावेळी तामिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही.सेंथील बालाजी, उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री सोमेन्द्र तोमर, महाराष्ट्र ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, तसेच महावितरण, महापारेषण व महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व संबंधित विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा