BREAKING NEWS
latest

कॅमेऱ्यात हसणारे चेहरे रक्तात माखले! पहलगाममध्ये 26/11 पेक्षा भीषण हल्ला!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

"नाव विचारलं... आणि गोळ्या झाडल्या!" — पहलगाममध्ये पर्यटकांवर थेट नरसंहार, २७ मृत, देश हादरला


पहलगामच्या शांत, थंडगार वाद्यांत पर्यटक फेरफटका मारत होते. कुणी निसर्गाच्या सौंदर्यात हरवले होते, तर कुणी मोबाइलमध्ये आठवणी कैद करत होते. पण या सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर मृत्यू दबा धरून बसला होता… अचानक काही अज्ञातांनी पर्यटकांना अडवलं… नाव विचारली… आणि काही क्षणांतच हवेत गोळ्यांचा आवाज घुमला! एकाच क्षणात हास्य, आनंद आणि जगण्याची आशा रक्तात माखली गेली. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत २७ निष्पाप जीवांचा बळी घेतला. देशात खळबळ उडवणाऱ्या 26/11 हल्ल्याची आठवण करणारा हा हल्ला सध्या देशभर चर्चेचा विषय ठरतोय.

या भीषण हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मरण पावलेल्यांमध्ये दिलीप डिसले आणि अतुल मोने यांचा समावेश आहे. जखमींमध्ये माणिक पटेल (पनवेल) आणि एस. भालचंद्रराव हे असून सुदैवाने त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती काश्मीर प्रशासनाने दिली आहे.

बैसरन खोऱ्याच्या उंच डोंगराळ भागात पर्यटक फिरत असताना दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. त्यांनी एक एकजण पुढे बोलावून नाव विचारण्यास सुरुवात केली. 'तुमचं नाव काय?' या प्रश्नाच्या उत्तरादाखल काहीजणांनी नावं सांगितली आणि त्याच क्षणी गोळीबार सुरु झाला. अनेक पर्यटकांना काही कळायच्या आत गोळ्यांच्या वर्षावात कोसळावं लागलं. मृतांमध्ये तामिळनाडू, केरळ आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचा समावेश आहे. पुण्यातील एका पाच जणांच्या कुटुंबालाही या गोळीबाराचा फटका बसला असल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर देशभरातून संतापाचा सूर उमटला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ प्रशासनाशी संपर्क साधून माहिती घेतली. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांच्याशी त्यांनी फोनवर संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. हल्ल्यानंतर पहलगाम आणि आसपासच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

प्रश्न उभा राहतोय — दहशतवाद्यांना पर्यटकांची नावं कशासाठी हवी होती? त्यामागे धार्मिक ओळखच होती का?

या घटनेनंतर केंद्र सरकारवर आणि जम्मू-काश्मीर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात दबाव वाढला आहे. देशातील सामान्य जनतेसह विविध पक्षांचे नेतेही या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत.

पाहुणचाराच्या भूमीत पाहुण्यांचा संहार — अशी संतप्त प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहे.

ही घटना केवळ एक दहशतवादी हल्ला नाही, तर देशातील सुरक्षिततेच्या यंत्रणेला टाकलेलं आव्हान आहे.
हे फक्त मृत्यूनं झाकोळलेलं पहलगाम नाही, तर देशाच्या मनामनात घर करून बसलेलं एक जखमी वास्तव आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत