संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)
मुंबई: जोगेश्वरी पूर्व विभागातील गणेश भक्तांसाठी भावनिक आणि सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव, श्यामनगर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या नैसर्गिक विसर्जन तलावात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खैरनार, स्थानिक नागरिकांनी आणि गणेश भक्तांनी व्यक्त केला असून, यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या तलावाला अनेक दशकांचा इतिहास असून, गणपती विसर्जनासाठी हा तलाव स्थानिकांसाठी एकमेव पर्याय आहे. प्रत्येक वर्षी हजारो गणेशभक्त इथे श्रद्धेने आपले बाप्पा विसर्जन करतात. मात्र सध्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे तलावाचे पावित्र्य आणि पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे.
या मुद्द्यावर नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर महानगरपालिकेने तात्काळ दखल घेतली. तलावाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. विशेष म्हणजे, या पाहणीनंतर स्थानिक आमदार श्री. बाळा नर यांच्या कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीस महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत तलावाच्या स्वच्छतेबाबत, ड्रेनेजच्या पाण्याच्या संभाव्य प्रवाहाबाबत चर्चा झाली.
यावेळी आमदार बाळा नर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "हा तलाव आमच्या संस्कृतीचा भाग आहे, येथे कोणतीही अस्वच्छता सहन केली जाणार नाही. नागरिकांच्या भावना लक्षात घेता त्वरित उपाययोजना व्हायलाच हव्यात."
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील तातडीने ड्रेनेजचे पाणी रोखण्यासाठी योग्य ती दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले.
गणेशभक्त आणि स्थानिक नागरिकांनी आमदार बाळा नर यांचे विशेष आभार मानले असून, पुढील विसर्जन सण सुरक्षित आणि पवित्र पद्धतीने होण्यासाठी लवकरच उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा