BREAKING NEWS
latest

जोगेश्वरीत मनपा शाळेसमोरचा ‘मौत का चेंबर’ – पाय अडकून नागरिक जखमी, स्थानिकांनी जीव वाचवला!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी वर्तमानपत्र)

जोगेश्वरी (पूर्व) प्रभाग क्र. ७३ मधील गांधीनगर येथील मनपा शाळेसमोरील रस्त्यावरील तुटलेला चेंबर सध्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. आज (18 एप्रिल) सकाळी 11 वाजता या धोकादायक चेंबरमध्ये एका नागरिकाचा पाय अडकला.


हा चेंबर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच असून, दररोज शेकडो मुले-पालक या मार्गाने जातात. ही घटना घडल्यानंतर आजूबाजूचे स्थानिक नागरिक मदतीला धावले. तात्काळ परिस्थिती पाहता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवासेनेचे उपसचिव अमित पेडणेकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत त्वरीत मदतीसाठी मार्गदर्शन केले.

स्थानिक रहिवाशांनी एका वेल्डिंग करणाऱ्याच्या मदतीने चेंबरवरची धातूची जाळी कापून त्या नागरिकाचा पाय बाहेर काढला. हे दृश्य इतके भयावह होते की आजूबाजूच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

घटनेनंतर रहिवाशांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. मात्र, प्रशासनाने यापूर्वी वारंवार तक्रारी असूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांचं म्हणणं आहे की, “हा चेंबर जर लवकरात लवकर दुरुस्त झाला नाही, तर पुढे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते. यासाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावी.”


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत