BREAKING NEWS
latest

"१ लाख नसेल तर मरण पत्करा!" — मुंबईतील होली स्पिरिट हॉस्पिटलचा अमानुष निर्णय

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी साप्ताहिक)

"पैशांअभावी उपचार नाकारले, जीव धोक्यात!" — होली स्पिरिट हॉस्पिटलवर गंभीर आरोप, हृदयविकारग्रस्त रुग्णाला प्रवेश नाकारल्याचा प्रकार

जोगेश्वरी/अंधेरी: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, मुंबईतही पैशांअभावी उपचार नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्वेतील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटलने हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला डिपॉझिट न दिल्यामुळे ऍडमिट करून घेण्यास नकार दिला. तब्बल दीड तास रुग्ण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थ अवस्थेत बसून राहिला आणि अखेर महापालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

जिवंत असतानाही हॉस्पिटलने पाठ फिरवली!
जोगेश्वरी पूर्वेतील दुर्गानगरमधील ५२ वर्षीय अमृतलाल सोनी यांना मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने होली स्पिरिटमध्ये नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलने तत्काळ १ लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्याची अट घालून रुग्णाला ऍडमिट करण्यास स्पष्ट नकार दिला.

धर्मादाय हॉस्पिटलची अमानुष वागणूक!
होली स्पिरिट हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत असूनही निर्धन व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या बेड्सचा लाभ रुग्णाला मिळाला नाही. २५ हजार रुपये देण्याची विनंती केली असतानाही रुग्णालयाने हट्टाने नकार दिला, हे विशेष!

राजकीय हस्तक्षेप, तरीही उत्तर नाही!
अखेर नातेवाईकांनी सोनी यांना मध्यरात्री कूपर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच मनसेच्या जोगेश्वरी विभागाने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. मात्र कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे मनसेचे सचिव नितीन गावडे यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी धर्मादाय आयुक्त व आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार करण्याची घोषणा केली आहे.

एक प्रश्न अनुत्तरित — धर्मादाय संस्थांचे ध्येय फक्त पैसा कमवणेच आहे का?
या प्रकारानंतर होली स्पिरिट हॉस्पिटलच्या प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. आता बघावे लागेल की प्रशासन जबाबदारी स्वीकारते की या प्रकरणातही एखाद्या जीवाच्या किंमतीवर गप्प राहते!

ह्या अमानुषतेला जबाबदार कोण?
रुग्णाच्या जीवावर बेतणाऱ्या 'पेहले पैसे, फिर उपचार' या मानसिकतेविरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत