BREAKING NEWS
latest

रामनवमीला शिवसेनेचा ‘पॉवर शो’ – शाखा क्र. ७७ चं भव्य उद्घाटन!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

रामनवमीच्या दिवशी शिवसेनेचं संघटनबळ झळकलं! जोगेश्वरी पूर्वमध्ये शाखा क्रमांक ७७ चे कार्यालय उद्घाटन

जोगेश्वरी, ६ एप्रिल २०२५ — रामनवमीच्या दिवशी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक ७७ च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेतृत्त्वाखाली खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा आणि शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.

प्रभाग क्रमांक ७७ हा जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या भागात खासदार रविंद्र वायकर यांचे सक्रिय कार्य सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना कार्यालयाचा वापर जनतेच्या सेवेसाठी आणि संपर्कासाठी करावा, असे आवाहन केले.

शाखाप्रमुख प्रकाश (बंड्या) शिंदे यांनी यावेळी सांगितले की, “शिवसेना पक्षाचे विचार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आणि खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे. विधानसभेत मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांनी आगामी महापालिका निवडणुकीत आठही प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराला उत्तर देत ते म्हणाले की, "विकास कामांबाबत कोणताही गैरसमज पसरवला जाणार नाही, आणि सत्य जनतेपुढे मांडले जाईल."

कार्यक्रमास विधानसभा मार्गदर्शक मनीषा वायकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख रचना सावंत, महिला विभाग प्रमुख प्रियांका आंबोळकर, तसेच शाखा संघटिका, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवासेना, व्यापारी आघाडी व इतर अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनाचा हा सोहळा रामनवमीच्या दिवशी पार पडत असल्याने परिसरात एक उत्साही वातावरण निर्माण झाले होते. नव्याने सुरु झालेलं हे कार्यालय शिवसैनिकांसाठी नवे केंद्रबिंदू ठरणार आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत