BREAKING NEWS
latest

डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल २०२५ चा उत्साहात शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली: डोंबिवलीकर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे मन प्रसन्न करणारा एक अविस्मरणीय अनुभव म्हणजे आपला 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल'. गेल्या १५ वर्षांपासून आपल्या डोंबिवलीत हा रोझ फेस्टिवल होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवार, रविवारी रामनगर मधील बाल भवन येथे हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. त्या फेस्टिवलचे शनिवारी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. 
या फेस्टिवलला दरवर्षीप्रमाणे 'इंडियन रोझ फेडरेशन' या अखिल भारतीय गुलाबप्रेमींच्या संस्थेतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच बॉम्बे रोझ सोसायटी आणि इनर व्हील क्लब, कल्याण यांची बहुमूल्य साथ लाभली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गुलाबप्रेमी या फेस्टिवलमध्ये सामील झाले आहेत.
राष्ट्रीय गुलाब प्रदर्शनातील पारितोषिक विजेते प्रमुख गुलाब उत्पादक वांगणीचे आशिष मोरे यांच्या गुलाबाला 'गुलाबांचा राजा' व 'गुलाबांची राजकुमारी', पुण्यातील पुंडलिक निम्हण यांच्या गुलाबाला 'गुलाबांची राणी', वांगणी येथील चंद्रकांत मोरे यांच्या गुलाबाला 'गुलाबांचा राजकुमार' तर मन्सूरा जहूर हुसेन यांच्या गुलाबाला 'सर्वोत्कृष्ट सुवासिक गुलाब' या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्रशांत तेलंग, तिझारे, डॉ. धनंजय गुजराथी, निलेश आपटे यांना गुलाब प्रदर्शनात विविध पुरस्कार देण्यात आले. तसेच गेल्या ५० वर्षांपासून सातत्याने गुलाब स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या चंद्रकांत मोरे यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. 
डॉ. विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे, जगदीश म्हात्रे, गणेश शिर्के, अर्शद भिवंडीवाला, मंछेर इराणी यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. असा हा आपला जिव्हाळ्याचा 'डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल' रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आपल्या मित्रपरिवारासोबत या फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि एक आनंददायी अनुभव घ्या असे अवाहन त्यावेळी आ. रवींद्र चव्हाण यांनी केले.

'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' कार्यक्रम साजरा..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : २२ जानेवारी २०१५ रोजी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' हा उपक्रम राबविण्याची मोहीम सुरू केली. त्या उपक्रमाअंतर्गत 'जे एम एफ' शिक्षण संस्था संचलित जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय मधे देखील दिनांक २४ जानेवारी रोजी 'बेटी बचाओ,बेटी पढाओ' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सकाळच्या सत्रात जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी 'बेटी बचाओ बेटी पढाओ' या विषयावर भाषण केले व मुलगी वाचवा आणि शिकवा या विषयीची चित्र फित बघितली.
दुपारच्या सत्रात जन गण मन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सादर केला. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. शिक्षणाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले. स्त्री भ्रूण हत्या, लिंग हत्या यावर प्रतिंबंध लागला पाहिजे या उद्देशाने बेटी बचाओ, बेटी पढाओ हा स्तुत्य उपक्रम आदरणीय नरेंद्र मोदीजीनी अंमलात आणला. मुलगी ही घरातली लक्ष्मी आहे, ती एका घरातून दुसऱ्या घरात सोन्याच्या पावलाने आगमन आणि निर्गमन करत असते, शिक्षणाने मुलगा हा फक्त एका घराचा विकास करतो परंतु मुलगी ही माहेर आणि सासर अशा दोन्ही घरचा विकास करते म्हणूनच मुलीला सरस्वती आणि लक्ष्मी अशा दोन्ही उपमा दिल्या आहेत, असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. सावित्री बाईंनी जनतेचे घाव सोसून शिक्षणाचा पाया रचला आणि सर्व मुलींना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या म्हणूनच आईच्या गर्भात असतानाच ती मुलगी सरस्वतीचा अंश होऊनच वाढत असते तर तिला जीवदान देऊनच असंख्य सावित्री उदयास येणार असे उद्गार डॉ. राजकुमार कोल्हे यांनी काढले.
तर आई मधील प्रेमळ ओलावा आणि वडिलांबद्दल आदरयुक्त भीती, या दोघांच्या वेलीवरचे फुल म्हणजे 'मुलगी'. मुलांपेक्षा मुली ह्या जास्त जवळच्या असतात, प्रेम, भावना, जिव्हाळा याच्याही पलीकडे जाऊन  शिक्षणाने, प्रगल्भ विचाराने सक्षम होऊन घर संसार आणि नोकरी सांभाळून न थकता ऊर्जेचा स्रोत बनून कायमच दुसऱ्यांना ऊर्जा देत राहतात, म्हणूनच स्त्री ला 'नवदुर्गेची' उपमा दिली आहे, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुलेंचे अप्रतिम नाटक सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. तसेच नाटकामधील सर्व मुलांना अध्यक्ष व सचिव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पालक व विद्यार्थ्यांनी टाळा वाजवून त्यांच्या अभिनयाला दाद दिली. नाट्य विभागाचे शिक्षक श्री. प्रमोद पगारे व सौ. कविता गुप्ता यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले तर सूत्र संचलन सौ. श्रेया कुलकर्णी यांनी केले. बेटी बचाओ,बेटी पढाओ, असा नारा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

ओपन जिमचे साहित्य तुटल्यास होणार तात्काळ दुरुस्त - मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील मैदाने,उद्याने आणि इतर अनेक अशा सुमारे २५० ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी ओपन जिम व त्यासाठी लागणारी व्यायामाची साधने आणि लहान मुलांसाठी खेळणी कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत बसविण्यात आली आहेत. महापालिकेने दिलेल्या या सुविधेचा फायदा महापालिका क्षेत्रातील अनेक आबालवृद्धांना होतो तथापि सततच्या वापराने ही खेळणी व ओपन जिम मधील व्यायामाची साधने तुटण्याच्या घटना निदर्शनास येतात.
त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशान्वये महापालिकेने बसविलेली खेळणी ओपन जिम मधील साहित्य इ.च्या दुरुस्ती साठी महापालिकेच्या वार्षिक अंदाज पत्रकात निधीची तरतुद करण्यात आली आहे आणि त्यानुसार कल्याण व डोंबिवली साठी एकूण ३ वर्षाकरिता स्वतंत्र निविदेस मंजूरी देण्यात आली आहे आणि प्रत्यक्षात कामालाही सुरवात झाली आहे. असे असतानाही एखाद्या उद्यानातील खेळणी अथवा ओपन जिमची साधने तुटल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव यांनी केले आहे.

शिवसेना आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते शास्त्रीनगर इस्पितळातील रुग्णांना मोफत फळे आणि ब्लॅंकेटचे वाटप..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या  जयंती आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त 'भगवा पंधरवडा' या उपक्रमात डोंबिवलीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान शिवसेना शाखा क्र.६५ चे कल्याण-डोंबिवली महापालिका   माजी नगरसेवक तथा परिवहन समिती माजी सभापती संजय लक्ष्मण पावशे व अपर्णा संजय पावशे यांच्या माध्यमातून डोंबिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील रुग्णांना मोफत फळे व ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते पार पडला. हॉस्पिलमधील रुग्णांना फळे आणि उबदार ब्लँकेट चे मोफत वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमादरम्यान महापालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील अनेक त्रुटी यावेळी आमदार राजेश मोरे यांना पहावयास मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक संजय पावशे, अपर्णा पावशे, वृषाली रणजित जोशी, केतकी पवार, सुभाष गायकवाड, धनाजी चौधरी, कल्पना कांबळे, सुदाम जाधव, यांच्यासह शिवसैनिक तसेच महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आमदार राजेश मोरे यांनी शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी योगेश चौधरी यांची भेट घेतली तेव्हा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सुखसुविधा मिळत नसल्याच्या अनेक त्रुटी यावेळी पहावयास मिळाल्या.
आमदार राजेश मोरे यांचे समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन..

शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे व ब्लँकेट चे वाटप  करत प्रसूती कक्षात गेला असता पासूतिकक्षात बेडची कमतरता असल्याने एका महिला रुग्णाला चक्क जमिनीवर औषधोपचार करण्यात येत असल्याचे दिसून आले. याबाबत हॉस्पिटलचे प्रभारी वैद्यकीय प्रमुख डॉ. योगेश चौधरी यांनी त्यांच्या अनेक समस्या आमदार मोरे यांच्यासमोर मांडल्या. सध्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ, भुलतज्ञ डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक आणि जागेचा अभाव असल्याच्या समस्या इस्पितळातील नर्स व  कर्मचाऱ्यांनी मांडल्या. शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये पोलिस चौकीची नितांत गरज असल्याचे सांगण्यात आले. रात्रीच्या वेळी अनेक वेळा काही लोकांचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. आमदार मोरे यांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना तुमच्या समस्या सोडविण्यासाठी हा विषय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगून समस्या कशा जलदगतीने सोडविल्या जातील, याचा आपण प्रयत्न करू, असे आश्वासन प्रसिद्धी माध्यमांसमोर देत सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दावोस मध्ये केला १५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

दावोस दि.२२ : दावोसमधील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होईल.
आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात ते ३,०५,००० कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून ३ लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत ३ लाख ५ हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे ३ लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले.
दुसरी मोठी गुंतवणूक ही ऍमेझॉन करणार असून, ती ७१,७९५ कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून ८३,१०० इतके रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या २ दिवसांत जे सामंजस्य करार झाले, त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने ११.७१ कोटींचे करार केले असून, एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी तर सिडकोने ५५,२०० कोटींचे करार केले आहेत.
टोनी ब्लेअर यांची भेट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली. टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्युंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलाएम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक, सीईओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रात इंडस्ट्रीयल पार्क, लॉजिस्टीक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे..

२१) सीऍट
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूक : ५०० कोटी
व्यवसाय : ५००
कोणत्या भागात : नागपूर

२२) व्हीआयटी सेमिकॉन्स
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : २४,४३७ कोटी
व्यवसाय : ३३,६००
कोणत्या भागात : रत्नागिरी

२३) टाटा समूह
क्षेत्र : बहुविध क्षेत्रात
गुंतवणूक : ३०,००० कोटी

२४) रुरल एन्हान्सर्स
क्षेत्र : रुग्णालयादी सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक
गुंतवणूक : १०,००० कोटी

२५) पॉवरिन ऊर्जा
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूकः १५,२९९ कोटी
व्यवसाय : ४०००

२६) ओपन ओरिजिन इंडिया इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १५,००० कोटी
रोजगार : १०००

२७) युनायटेड फॉस्परस लि.
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : ६५०० कोटी
रोजगार : १३००

२८) ईरुलर्निंग सोल्युशन्स
क्षेत्र : शिक्षण
गुंतवणूकः २०,००० कोटी
रोजगार : २०,०००

२९) ऍलेक्ट्रा ईव्ही
क्षेत्र : ऑटोमोबाईल, ईव्ही
गुंतवणूकः ३००० कोटी
रोजगार : १०००

३०) फ्युएल
क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय
राज्यातील ५००० युवकांना एआय, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस ऍनालिटिक्सचे प्रशिक्षण

दि. २१ जानेवारीपर्यंत एकूण गुंतवणूक : ६,२५,४५७ कोटी
एकूण रोजगार : १,५३,६३५

दि. २२ जानेवारी रोजीचे सामंजस्य करार

३१) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.
क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट
गुंतवणूकः ३,०५,००० कोटी
रोजगार : ३,००,०००

३२) ग्रिटा एनर्जी
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : १०,३१९ कोटी
रोजगार : ३२००
कोणत्या भागात : चंद्रपूर

३३) वर्धान लिथियम
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)
गुंतवणूक : ४२,५३५ कोटी
रोजगार : ५०००
कोणत्या भागात : नागपूर

३४) इंडोरामा
क्षेत्र : वस्त्रोद्योग
गुंतवणूक : २१,००० कोटी
रोजगार : १०००
कोणत्या भागात : रायगड

३५) इंडोरामा
क्षेत्र : टेक्निकल टेक्सटाईल्स
गुंतवणूकः १०,२०० कोटी
रोजगार : ३०००
कोणत्या भागात : रायगड

३६) सॉटेफिन भारत
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूकः ८६४१ कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

३७) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : ४३,००० कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

३८) सिलॉन बेव्हरेज
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : १०३९ कोटी
व्यवसाय : ४५०
कोणत्या भागात : अहिल्यानगर

३९) लासर्न ऍण्ड टुब्रो लि.
क्षेत्र : संरक्षण उत्पादन
गुंतवणूक : १०,००० कोटी
व्यवसाय : २५०००
कोणत्या भागात : तळेगाव

४०) नेल्सन मीडिया प्रा. लि.
क्षेत्र : आयटी
गुंतवणूकः ४५० कोटी
रोजगार : ११००
कोणत्या भागात : एमएमआर

४१) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.
क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण
गुंतवणूक : १२,७८० कोटी
रोजगार : २३२५
कोणत्या भागात : नागपूर

४२) एमएसएन होल्डिंग्ज लि.
क्षेत्र : सौर
गुंतवणूक : १४,६५२ कोटी
रोजगार : ८७६०
कोणत्या भागात : नागपूर

४३) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.
क्षेत्र : ड्रोन निर्मिती
गुंतवणूक : ३०० कोटी
रोजगार : ३००
कोणत्या भागात : जालना

४४) रेनिसन्स सोलार ऍण्ड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूकः ५००० कोटी
रोजगार : १३००
कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

४५) हॅझेरो इंडस्ट्रीज
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १६,००० कोटी (दोन प्रकल्प)
रोजगार : १०,०००
कोणत्या भागात : बुटीबोरी

४६) टॉरल इंडिया
क्षेत्रः ऍल्युमिनियम आणि मेटल्स
गुंतवणूक : ५०० कोटी
रोजगार : १२००
कोणत्या भागात : अहिल्यानगर

४७) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : ४३,००० कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

४८) हिरानंदानी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : ५१,६०० कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

४९) एव्हरस्टोन समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : ८६०० कोटी
कोणत्या भागात : एमएमआर

५०) ऍमेझॉन
क्षेत्र : डेटा सेंटर
गुंतवणूक : ७१,७९५ कोटी
रोजगार : ८३,१००
कोणत्या भागात : एमएमआर

५१) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषतः शाश्वत परिवहन सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर

५२) एमटीसी समूह
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषतः सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
कोणत्या भागात : एमएमआर

५३) क्रॉसरेल इंटरनॅशनल
क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषतः वाहतूक सुविधा
कोणत्या भागात : एमएमआर

दि. २२ जानेवारीपर्यंत
एकूण गुंतवणूक : १५.७० लाख कोटी
एकूण रोजगार : १५.७५ लाख

७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्याचे महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांचे निर्देश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी नियोजनबध्द कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अधिकारी वर्गास दिले आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या संकेतस्थळावरील माहिती अद्यावत करण्यात येत असून त्या मध्ये आर.टी.एस. व आर.टी.आय ची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नागरिकांना मालमत्ताकरां विषयी विविध सेवा घेताना येणारा त्रास कमी करण्यासाठी परिवर्तन योजना महापालिकेमार्फत राबविण्यात येत आहे. नगररचना विभागाकरीता सुलभ एस.ओ.पी. (सर्व साधारण पध्दती) निर्धारित करून दिल्यामुळे नागरिकांचा महापालिकेसोबतचा व्यवहार सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. या कृती आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी सर्व खाते /विभाग प्रमुखांसमवेत बैठक घेवून आपापले कार्यालय स्वच्छ ठेवण्याबाबत व भंगार सामानाची विल्हेवाट लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विभाग/प्रभागात स्वच्छतेबाबत नियोजन करण्यात आले आहे. जुन्या वाहनांसंदर्भात आर.टी.ओ. सोबत आवश्यक पत्रव्यवहार करून सदर वाहने निर्लेखित करण्याबाबत आर.टी.ओ. विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले आहेत.
नागरिकांच्या तक्रारींचे शिघ्रगतीने निवारण करण्यासाठी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे आणि ४ थ्या मंगळवारी सफाई मित्र दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे देखील आयोजन करण्यात येत आहे.

राज्यसेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने प्रथम सन २०१५ च्या आदेशानुसार शासनाकडील १५ सेवा अधिसुचित केल्या. तद़नंतर जून २०२३ च्या आदेशानुसार शासनाकडील १२ आणि महापालिकेकडील ५ अशा १७ सेवा अधिसुचित करण्यात आल्या. ऑगस्ट २०२३ च्या आदेशानुसार महापालिकेकडील ४४ आणि शासनाकडील ३१ अशा ७६ सेवा नागरिकांसाठी अधिसुचित करण्यात आल्या आणि जुन २०२४ च्या आदेशानुसार शासनाच्या ६८ आणि महापालिकेच्या ४९ अशा एकूण ११७ सेवा महापालिकेने अधिसुचित केल्या आहेत. याबाबत चे फलक सर्व नागरी सुविधा केंद्र आणि विभागात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपले सरकार पोर्टलवर व पी.जी.पोर्टलवर  तक्रारीचे निराकरण नियमित स्वरूपात करण्यात येत आहे असे सांगण्यात आले.

जाह्नवीज मल्टी फाउंडेशन संचालित 'जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळा आणि विद्यामंदिर' चा डोळ्यांचे पारणे फेडणारा वार्षिक स्नेहसंमेलन ९ वा 'प्रेरणोत्सव २०२५' उत्साहात साजरा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली दि.२१ : दरवर्षी सर्वच विद्यार्थी पालक ज्या गोष्टीची आतुरतेने व उत्सुकतेने वाट बघत असतात तो म्हणजे आपल्या पाल्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा. दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखील जन गण मन इंग्लिश शाळा चा १७ वा आणि विद्यामंदिर चा ९ वा वार्षिक स्नेहसंमेलन 'प्रेरणोत्सव २०२५' दिनांक २० व २१ जानेवारी  रोजी चार सत्रांमध्ये डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलादालनात पार पडला.
दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वच उपस्थितांना स्नेहसंमेलनाची मेजवानीच होती. सकाळी दहा ते एक या सत्रात जन गण मन किड्स प्ले, शिशु विहार ते इयत्ता  दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा नववा 'प्रेरणोत्सव २०२५' स्नेहसंमेलन पार पडला. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे, प्रमुख पाहुणे श्री.माधव जोशी, राज योगिनी बी.के.शकू दिदिजी व इतर पदाधिकारी या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. 
चारही सत्रात राष्ट्रगीत झाल्यावर  विद्यार्थ्यांनी शालेय गीत व स्वागत गीत म्हणून पाहुण्यांचे स्वागत केले. तर इयत्ता दुसरी मधील कु. श्रावणी पवार हीने स्वागतपर भाषण केले. शिशु विहाराच्या उप-मुख्याध्यापिका सौ. मयुरी खोब्रागडे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला. इंग्लिश सेकंडरी शाळे मधून शिशु विहाराच्या अनया सागरे, सारा योही, मोठा शिशु तसेच इयत्ता दुसरी मधील अर्णव अंबिके व श्रेयांश देसाई या विद्यार्थांना 'स्टार स्टुडंट्स ऑफ द इयर' (तारका विद्यार्थी) म्हणून मान्यवरांच्या हस्ते मुकुट परिधान करून गौरविण्यात आले. तसेच सीबीएसई मधून हेतल तांडेल(इयत्ता तिसरी), मीरा पाटील(इयत्ता पाचवी), ऋषाव दास(इयत्ता आठवी), दीक्षा गरदे(इयत्ता दहावी) यांनाही पुरस्कार देण्यात आले. विद्यामंदिर मधून विहान गांधी, सुप्रिया चौधरी, हर्शील परघी यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सर्व मान्यवरांनी विजेत्यांचे कौतुक व अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांचा 'कार्टून कॅरेक्टर' (व्यंगचित्र चरित्र) या छोट्या मुलांच्या आवडीचा विषय घेऊन नृत्य, नाटिका सादर केल्या गेल्या. सर्वच मुले सिंचॅन, डोरेमाँन, छोटा भीम, टॉम आणि जेरी, मिकी माऊस, बार्बी, मोटू पतलू तसेच जंगल बुक चे प्राणी बनून वेष परिधान करून तयार होऊन आले होते. मुलांचे नृत्य आणि उत्साह बघुन त्यांचे पालक देखील मुलांप्रमाणेच लहान झाले होते. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामवी, चारवी, लिरिषा, यांनी केले तर आभार प्रदर्शन मायरा या विद्यार्थीनींने केले. दुपारच्या दोन ते पाच  सत्रात जन गण मन इंग्लिश सेकंडरी शाळेच्या चे वार्षिक स्नेहसंमेलन झाले. 'द रिअल सुपर हिरो' हा विषय घेऊन नृत्य आणि नाटिका सादर झाल्या. शिशु विहार ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आपल्या रोजच्या जीवनातले आपले हिरो म्हणजे आई बाबा, डॉकटर, शिक्षक, भाजीवाले, डबेवाले, पोलीस आहेत. सर्व मुले दिलेल्या थीम नुसार वेष परिधान करून आली होती व या सर्व रियल लाईफ हिरोना आपल्या नृत्य नाटकातून कृतज्ञता व्यक्त केली, नर्सरी मधील विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या आई बाबांनाही नृत्य करण्याची संधी मिळाली. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी 'स्वच्छ भारत' नाटिका सादर केली व स्वच्छतेचा संदेश दिला. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी, अविरा, सानवी या विद्यार्थिनींनी केले तर स्वागतपर भाषण देविका हीने केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आरूष भांगे या विद्यार्थ्याने केले.
संध्याकाळी सहा ते नऊ च्या सत्रात जन गण मन इंग्लिश शाळेचे इयत्ता तिसरी ते दहावी या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार पडले. 'इंक्रेडिबल आर्ट' (अविश्वसनीय, अतुल्य कला) हा विषय घेऊन नृत्य, नाटक, गायन, वादन सादर केले गेले. कार्यक्रमाची सुरुवात शिव तांडव ने करण्यात आली व त्यानंतर भारतातील अतुल्य कला सर्व मुलांनी आपल्या नृत्य, नाटक, गायन, वादनातून प्रेक्षकांना दाखविल्या. यामधे शास्त्रीय गायन, वादन, अभंग, सालासा नृत्य प्रकार, राजस्थानी कठ पुतली, सावित्रीबाई फुलेंचे नाटक, पथनाट्य, एकपात्री अभिनय अशा अनेक कलांचा समावेश होता व सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले.
दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दोन मधील सत्रात जन गण मन विद्यामंदिर, इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन पार पडले. भारत देश विविध संस्कृती कलांनी नटलेला आहे. 'सा कला या विमुक्तये' म्हणजेच कला ही सर्व बंधनातून मुक्त करते. स्वच्छंदी आनंदी राहण्यासाठी अंगी कला असणे आवश्यक आहे. प्रत्येकाच्या अंगी कला आणि नवरस असतात. जन गण मन विद्यामंदिर साठी 'नवरस ' हा विषय घेऊन विद्यार्थ्यांनी प्रत्येक नवरसाची  माहिती आपल्या नाटकात देऊन त्यावर नृत्य सादर केले. नवरसंपैकी अदभुत रस, भयानक रस अशा ह्या नृत्य नाटिका नी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. 
संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे यांनी दोन दिवसांचा 'जे एम एफ' शिक्षण संस्थेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा बघुन आज आपल्या सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असे उद्गार काढून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ज्या प्रमाणे कस्तुरी मृग कस्तुरीचा सुवास घेण्यासाठी पळत असते त्यावेळी त्या मृगालाच माहिती नसते की आपल्याच अंगात कस्तुरी आहे, अगदी या मुलांचे तसेच आहे त्यांच्या स्वतःच्या अंगात कलेचे दालन आहे आणि त्या दालनातील स्वतःच्या अंगीकृत कलेचा खजिना त्यांनाही आजच उमजला, प्रत्येक मुलाला परमेश्वराने विशेष घडवले आहे. दोन्ही दिवसाचा कार्यक्रम हा अवाक करणारा होता असे उदगार काढून सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी मुलांच्या अंगीकृत कलागुणांना वाव देऊन नव्या कल्पनेच्या अविष्कारांना व्यवसायाच्या दृष्टीने स्टार्टअप करिता भांडवल म्हणून 'ऑन द स्पॉट फंडिंग' करणारे जेके स्टार्टअप सपोर्ट इन्कयूबेशन सेंटर चे फाउंडर श्री. जयेश खाडे ही उपस्थित होते.
अगदी नर्सरी पासून ते दहावी पर्यंतच्या मुलांनी एका पेक्षा एक असे सादरीकरण करून सर्व पालकांना थक्क करून टाकले. आपल्या पाल्या मधे काय कमतरता आहे, याच्यापेक्षा त्याच्यामध्ये काय कलागुण आहेत आणि त्या कला गुणांना कशाप्रकारे प्रोत्साहित करता येईल याचा विचार पालकांनी करावा, प्रत्येक मूल हे वेगळे असते, त्याची स्वतःची एक खास शैली असते त्यामुळे कुणाशीही तुलना न करता आपल्या मुलाच्या अंगभूत कलेला वाव द्या, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले. कलात्मक शिक्षक संगीत शिक्षिका सौ.श्रेया कुलकर्णी, नृत्य शिक्षक अभिषेक देसाई, दिपाली सोलकर, नाट्य शिक्षक प्रमोद पगारे व समूह तसेच हस्तकला शिक्षिका दीपा तांबे, सपना यांनाम, स्नेहा डोळे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभून 'प्रेरणोत्सव २०२५' हा यशस्वीरित्या पार पडला. डॉ.निखिल शासने यांनी रोजच्या जीवनात तंदुरुस्त राहण्यासाठी योगा नृत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. संगीत शिक्षिका सौ श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.

देशातील पहिली सोलर कार बाजारात दाखल..

प्रतिनिधी : अवधुत सावंत
   
पुणे : येथील स्टार्टअप कंपनी 'वेव मोबीलिटी' कडून ऑटो एक्सपोमध्ये भारतातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार 'इवा' लाँच करण्यात आली आहे. वेव इवा ही एक छोटी कार आहे. ज्यामध्ये २ लोकं आणि एक लहान मूल बसू शकते. कंपनीचा दावा आहे की कार एका चार्जवर   २५०  किलोमीटरची रेंज देईल. ही ईवा ५ सेकंदात ०-४० किलोमीटर प्रतितास वेग वाढवू शकते. इवाची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹३.२५ लाख आहे, ज्यामध्ये सबस्क्रिप्शन प्लॅन म्हणून बॅटरीचा समावेश आहे.

त्याच वेळी, शुक्रवारी आयएक्स१ एलडब्लूबी लाँच केल्यानंतर, जर्मन लक्झरी ऑटोमेकर बीएमडब्ल्यू ने दुसऱ्या दिवशी ४ लाँच केले आहेत. यामध्ये मिनी कूपर एस जेएसडब्लू पॅक आणि नवीन बीएमडब्ल्यू एक्स३ या दोन कार लाँच करण्यात आल्या आहेत. याशिवाय एस १००० आरआर आणि आर १३०० जीएसए एडव्हेंचर या दोन बाईक्स सादर करण्यात आल्या. विनफास्टने भारतीय बाजारपेठेसाठी त्यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही व्हिएफ ६ आणि व्हिएफ ७ चे अनावरण केले आहे. दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये विमानाने प्रेरित डिझाईन आहे आणि त्यात केबिनसारखे कॉकपिट आहे. यात एज-टू-एज मूनरूफ देखील आहे.

याशिवाय, कंपनीने व्हिएफ ३, व्हिएफई३४, व्हिएफ८, व्हिएफ९ इलेक्ट्रिक एसयूव्ही, व्हिएफ वाईल्ड पिकअप ट्रक देखील प्रदर्शित केले आहेत. मात्र, या गाड्या भारतीय बाजारात दाखल होणार नाहीत. भारतासाठी सादर केलेल्या कार वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होऊ शकतात.

आज (१८ जानेवारी) इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ चा दुसरा दिवस आहे. दिवसाची सुरुवात व्हिएतनामच्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी विनफास्टने केली. कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करत आहे. व्हिएतनामी कंपनी सध्या तीन खंडांमधील १२ देशांमध्ये कार्यरत आहे. आज एक ६ सीटर फ्लाइंग टॅक्सी देखील दाखल होणार आहे, जी सरला एव्हिएशनने बनवली आहे. त्याचबरोबर पहिली सोलर कार इवा ही सादर करण्यात येणार आहे. याशिवाय ह्युंडाई मोटर इंडिया, बी वाय डी, बी एम डब्लू इंडिया, बजाज ऑटोसारखे ब्रँड त्यांच्या वाहनांचे प्रदर्शन करणार आहेत.

एक्स्पोच्या पहिल्या दिवशी, मारुती-सुझुकीने पहिली इलेक्ट्रिक कार ई-विटारा सादर केली . त्याच वेळी, ह्युंडाई मोटर इंडियाने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार क्रेटा ईवी लाँच केली. यासह ऑटोमोबाईल कंपन्यांनी पहिल्या दिवशी ३०  हून अधिक वाहने सादर केली.

राज्य शिक्षण मंडळाकडून १० वी, १२ वीच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी (एस एस सी) इयत्ता १० वी आणि (एच एस सी) इयत्ता १२ वी ची परीक्षा अगदी तोंडावर आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठीचं हॉल तिकीट शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मात्र हे हॉल तिकीट आता वादग्रस्त ठरत आहे. हॉल तिकीट पाहून एकच गोंधळ उडाला आहे. कारण विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर कास्ट कॅटेगरी (जात प्रवर्गाची श्रेणी) नमूद करण्यात आली आहे. हे पाहून शिक्षण तज्ज्ञ व शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे शिक्षण मंडळाला मोठ्या टिकेला सामोरं जावं लागत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. गोसावी म्हणाले, “हॉल तिकिटांवर जात नव्हे तर जात प्रवर्गाचा उल्लेख आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा उल्लेख केला गेला आहे.

शरद गोसावी म्हणाले, “हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख नाही तर जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे, म्हणजे ओबीसी, एसटी, एससी असा उल्लेख आहे. आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. त्या शिष्यवृत्ती घेताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी त्यांच्या हॉल तिकीटांवर जातप्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरवर विद्यार्थ्याच्या जातीची, जातप्रवर्गाची नोंद असेल तर त्यांना शिष्यवृत्ती मिळवणं सोपं होतं. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख फक्त दाखल्यावर असतो त्यात चूक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते ते टाळण्यासाठी हॉल तिकींटावर प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे.

शरद गोसावी म्हणाले, शाळा सोडल्यानंतर शाळेच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या जनरल रजिस्टरमध्ये विद्यार्थ्याला त्याचं नाव, त्याच्या पालकांचे नाव, जात अथवा जात प्रवर्गात कुठलीही चूक झाली असेल तर ती दुरुस्त करून येत नाही. अनेकदा विद्यार्थ्यांच्या जातीचा अथवा प्रवर्गाचा उल्लेख चुकलेला असतो. त्यामुळे भविष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थी अशा तक्रारी घेऊन आमच्याकडे येतात. नियमानुसार विद्यार्थ्यांनी एकदा का शाळा सोडली की त्याला शाळेच्या जनरल रजिस्टरमध्ये त्याचं नाव, आडनाव, आई-वडिलांची नावे, जन्मतारीख किंवा जातीच्या उल्लेखात कोणताही बदल करता येत नाही. यात एखादी चूक असेल तर हे हॉल तिकीट त्यांच्या उपयोगी पडणार आहे. हॉल तिकिटावर एखादी चूक असेल तर ती आत्ताच निदर्शनास आणून देता येईल आणि दुरुस्त करून घेता येईल. या एकमेव उदात्त हेतूने राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर जात प्रवर्गाची नोंद केली आहे. यामुळे विद्यार्थ्याला त्याच्या नावातच काय इतर कोणत्याही गोष्टीत चूक असेल तर ती बदल करण्याची संधी मिळते.

शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
मुंबई : सार्वजनिक वाहतूक प्रणाली एका सिंगल मोबिलिटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून, त्यादृष्टीने मुंबईतील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांना केवळ ३०० ते ५०० मीटर चालून सार्वजनिक वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जलद आणि सुलभ वाहतूक सेवा देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील एकात्मिक तिकीट सेवा प्रणालीवर चर्चा झाली. या बैठकीत मित्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच मध्य, पश्चिम रेल्वे आणि महामुंबई मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसाठी लोकल रेल्वे ही जीवनवाहिनी आहे. एकत्रिक सेवा प्रणालीमुळे प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी जलद तसेच सुलभ होणार असून, महसूल वाढीसह सार्वजनिक सेवांचा अधिकाधिक वापर होईल. तंत्रज्ञानाचा वापर वाढवून टॅक्सी आणि इतर सेवांसोबत या प्रणालीचे एकत्रिकरण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पामुळे प्रवाशांना सहजगत्या एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व वाहतूक सुविधा मिळतील. यामुळे वाहतुकीचे सुलभीकरण होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, तसेच वाहतूक व्यवस्थेतील अडथळे दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस सांगितले.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबईत सध्या ३,५०० लोकल सेवा कार्यरत आहेत. येत्या काळात आणखी ३०० लोकल सेवा सुरू करण्यासाठी १७,१०७  कोटी रुपयांची गुंतवणूक रेल्वेकडून करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांमध्ये १. ७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकार शहरी वाहतुकीसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली राबविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA)च्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचे उद्दिष्ट विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी तिकीट प्रक्रिया एकसंध तसेच सुलभ करणे आहे. यासाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मचा तांत्रिक आधार घेतला जाणार आहे.