BREAKING NEWS
latest

डोंबिवलीतील 'होली एंजल्स जूनियर कॉलेज' मध्ये महाराष्ट्रातील पहिला हायलाईन कार्यक्रम संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : आज दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १ वाजता डोंबिवलीतील
'होली एंजल्स जुनियर कॉलेज' मध्ये महाराष्ट्रातील पहिल्या हायलाईन कार्यक्रमाचे यजमान होऊन इतिहास रचला आहे. 'होली एंजल्स जुनियर कॉलेज' महाराष्ट्रातील पहिली शैक्षणिक संस्था बनली असून ह्या कार्यक्रमामध्ये तोशिथ नायडू, संस्थेचे माजी विद्यार्थी आणि साहसी खेळांमध असलेले व्यक्तिमत्व, यांचा सहभाग होता. तोशिथ हायलाईनच्या या कार्यक्रमात रोमांचन आयोजन आणि प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.
                         
हायलाईन खेळाबद्दल
हायलाईन हा एक साहसी खेळ असून ज्यामध्ये उंचीवर ताणलेल्या दोरीवर चालण्याचे धाडस असते. या खेळात जबरदस्त लक्ष, संतुलन आणि धैर्य आवश्यक असते. हा खेळ साहस करण्याचे आणि मर्यादा ओलांडण्याचे प्रतीक मानला जातो. 'होली एंजल्स जूनियर कॉलेज' विद्यार्थ्यांना साहसी खेळांच्या या अ‌द्वितीय जगाशी परिचित करून देणे आणि विकासासाठी नवीन मार्ग खुले करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
हायलाईनचा इतिहास

हायलाईन हा स्लॅकलाईन या खेळाचा एक प्रकार असून, तो सध्या जागतिक स्तरावर सुरू झाला आहे. स्लॅकलाईन जमिनीपासून जवळ खेळला जातो. तर हायलाईन हा खेळ जड किंवा शहरी भागातील उंच ठिकाणी खेळला जातो. हा खेळ शारीरिक कौशल्य, मानसिक  आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा संगम आहे. या खेळात हार्नेस आणि टेथर यासारख्या उपकरणांचा वापर केला जातो, ज्यामुळे खेळाडू सुरक्षित राहतात.
                               
तोशिथ नायडू यांचे योगदान

तोशिथ नायडू हे होली एंजल्स जूनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी असून, साहसी क्षेत्रातील एक प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आपल्या शिक्षण संस्थेत करून  विद्यार्थ्यांना आव्हाने स्वीकारण्यास, भीतीवर मात करण्यास आणि आत्मविकासासाठी संधींचा शोध घेण्यासाठी प्रेरित करू इच्छितात.
प्राचार्यांचे विचार

या उपक्रमाबद्दल 'होली एंजल्स जूनियर कॉलेज' चे प्राचार्य बिजॉय ओमन म्हणाले, "तोशिथ नायडू यांच्या प्रयत्नांना आमच्या संस्थेत हायलाईन कार्यक्रम आणण्यासाठी पाठिंबा देताना आम्हाला अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणे, धैर्य, सर्जनशीलता आणि साहसी भावना जोपासणे, ही आमची भूमिका या कार्यक्रमाशी सुसंगत आहे. हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर लोकांचे लक्ष वेधून घेईल, असा विश्वास असून, हे महाराष्ट्रासाठी आणि संस्थेसाठीही एक महत्त्वाचा टप्पा ठरेल." होली एंजल्स जूनियर कॉलेज' चे विद्यार्थी आणि शिक्षक या उपक्रमाचा उत्सुकतेने वाट पाहत होते असे कॉलेजचे प्राचार्य बिजॉय ओमन यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

"मे. श्री.समर्थ एंटरप्रायझेस" यांचेकडील रु. १,२८,०२,४४०/- इतक्या रक्कमेच्या थकबाकी पोटी बोरगांवकर वाडी वाहनतळ महापालिकेने घेतले ताब्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : काल सायं. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व मालमत्ता विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विभागाचे अधिक्षक जयराम शिंदे व लिपिक प्रशांत धिवर, प्रविण घिगे व इतर कर्मचारी वर्गाने कल्याण रेल्वे स्थानकाजवळील बोरगांवकर वाडी वाहनतळ संबंधित ठेकेदाराकडील रु. १,२८,०२,४४०/- इतक्या रक्कमेच्या थकबाकी पोटी महापालिकेच्या ताब्यात घेण्याची कार्यवाही केली. बोरगांवकर वाडी बांधिव वाहनतळ (पे ॲन्ड पार्क) या धरतीवर ३ वर्षाच्या कालावधीकरीता, भाडेतत्वावर चालविण्यासाठी मे. श्री.समर्थ एंटरप्रायझेस यांस दि. १६/११/२०२३ रोजीच्या कार्यादेशान्वये देण्यात आले होते. सदर वाहनतळ पे ॲन्ड पार्क तत्वावर सुरु करण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने पहिल्या ३ महिन्याचे भाडे रु. ५९,२०,९७६/- इतकी रक्कम महापालिका फंडात भरणा केली होती.

तद्नंतर सदर परिचालक हे करारनाम्यातील अटी व शर्तीप्रमाणे महापालिकेचे भाडे नियमित भरणा करीत नसल्यामुळे, त्यांस बोरगांवकर वाडी वाहनतळाचे भाडे भरण्यासाठी नोटीसा बजावून देखील, संबंधित ठेकेदाराने भाडे रक्कम महापालिकेत भरणा केली नाही.

महापालिकेच्या मालमत्ता विभागाने दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी प्रत्यक्ष वाहनतळाची पाहणी केली असता, बेसमेंटमधील पार्कींगसाठी वापर सुरु असल्याचे, त्याचप्रमाणे पार्कींग शुल्क आकारणी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये सुमारे १००० दुचाकी वाहने पार्कींग केल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर ठिकाणी पार्कींग होत नसल्याची सबब पुढे करुन संबंधित ठेकेदार वाहनतळाचे भाडे भरणा करण्यास टाळाटाळ करुन, महापालिकेचे आर्थिक नुकसान करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बोरगांवकर वाडी वाहनतळावर पे ॲन्ड पार्क धरतीवर चालविणेबाबतचा मे. श्री.समर्थ एंटरप्रायझेस यांचे सोबतचा करारनामा संपुष्ठात आणून, निविदाकाराने महापालिकेकडे जमा केलेली सुरक्षा अनामत, इसारा रक्कम जप्त करणेबाबत आदेश मालमत्ता विभागाचे उपआयुक्त रमेश मिसाळ यांनी निर्गमित केले आहे.

संबंधित मे. श्री.समर्थ एंटरप्रायझेस यांस काळ्या यादीत टाकण्यात येत असून, त्यांस अन्य कोणत्याही प्राधिकरणाकडे व्यवसाय करण्यास मनाई करण्यात येत आहे असे प्रसार माध्यमांना सांगण्यात आले.

पाच कोटी ८५ लाख रुपयांच्या वीजचोरीत महावितरणचा ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भांडुप परिमंडळात अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्यांवर गेल्या पाच महिन्यांमध्ये व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल ८५३ वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देण्यात आला. यावेळी पाच कोटी ८५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात ‘महावितरण’च्या पथकाला यश आले आहे.

अधिक हानी असलेल्या ६० वीज वाहिन्यांवरील सदोष मीटर बदलणे, नवीन वीज जोडणी, कमकुवत वीजतारा बदलणे आदी विविध उपाय योजनांमुळे महसुलांमध्ये तब्बल ४० लाख १४,५४१ युनिट वीजेची भर पडली आहे. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ दरम्यान आखण्यात आलेल्या उपाय योजनांमध्ये ठाणे मंडळ कार्यालयांच्या अंतर्गत २५८ वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करून एक कोटी ७९ लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आणण्यात आली आहे. वाशी मंडळ कार्यालयातील ४०२ जणांकडे तीन कोटी ४७ लाख रुपयांची वीज चोरी सापडली. परिणामी ठाणे मंडळात १० लाख २७,०६७ युनिट आणि वाशी मंडळात सर्वाधिक २१ लाख ७९,४६१ आणि पेण मंडळात आठ लाख ८०१३ युनिट वीजेची वाढ नोंदवण्यात आली आहे.

मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय पाटील, ठाणे मंडळाचे अधीक्षक अभियंता युवराज मेश्राम आणि पेण मंडळाचे अधिक्षक अभियंता राजाराम माने यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, अधिकारी, जनमित्रांच्या समुहाने ही कामगिरी केली.

महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील ह्याची दक्षता घ्यावी - महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : महापालिकेच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होतील ह्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी आज दिले. जनतेला, नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करुन, त्यावर प्रभावी कार्यवाही करणेबाबत निर्देश मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याअनुषंगाने कार्यवाही करणेकामी आयुक्त दालनात आयोजिलेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत बोलताना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी हे निर्देश दिले.

आपापल्या कार्यालयातील अभिलेखांचे वर्गीकरण करुन आवश्यकता नसल्यास सदर अभिलेख तपासणीअंती योग्य प्रक्रियेनुसार नष्ट करावेत. आवश्यक अभिलेखांचे व्यवस्थित जतन करण्यासाठी अभिलेख कक्ष सुव्यवस्थित ठेवावा. अनावश्यक असलेले साहित्य, भंगार इ. योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी. आपले कार्यालय स्वच्छ व सुंदर राहील, याची दक्षता घ्यावी. 

आपले कार्यालय सिटीझन फ्रेंडली ठेवावे, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे कामांचा लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभाग कार्यालयात उपअभियंता स्तरावर काही प्रमाणात आर्थिक अधिकार देण्यात यावेत. तसेच नागरिकांना त्यांच्या अडचणी, समस्यांबाबत अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वेळ ठरवून देण्यात यावा, अशाही सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या आणि याबाबत झालेल्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी पुन्हा काही दिवसांच्या कालावधीत बैठक घेण्यात येणार असल्याबाबत त्यांनी यावेळी सूचित केले.

विश्वासघाताचं राजकारण केल्यामुळे मतदारांनी शरद पवारांना हद्दपार केलं..

प्रतिनिधी: अवधूत सावंत

मुंबई : विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक असलेल्या शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला आहे. विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण आजवर केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी चढवला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शेलार बोलत होते. यावेळी प्रदेश भाजपा समन्वयक विश्वास पाठक आणि भाजपाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

 ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘पुलोद’च्या निर्मितीबाबत बोलताना आपण जनसंघाच्या बळावर मुख्यमंत्री झालो हे मान्य केलं. मात्र हे सरकार बनवण्याआधी विश्वासघाताचे आणि खंजीर खुपसण्याचं कोणते विचारमंथन तुम्ही केलं होते, कोणाच्या विरोधात केलं होते हे सत्य ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येऊ द्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना न्यायालयीन प्रक्रीयेद्वारे निर्दोषत्व मिळाले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून अमित शाह यांच्यावर तुम्ही टीका करणार असाल तर ‘लवासा’ पासून अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने कोणाकडे बोट दाखवले आहे हे बोलण्याची वेळ येऊ देऊ नका असेही शेलार म्हणाले.

शेलार यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना पवार साहेबांचा राजकीय न्यूनगंड दिसून आला आहे त्यामुळेच ते शाह यांच्यावर अशा भाषेत टीका करत आहेत. शरद पवार यांनी विश्वासघाताच्या राजकारणाचे प्रशिक्षण उद्धव ठाकरे यांना दिले आहे, हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिसून आले आहे. या विश्वासघाताच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी मतपेटीतून उत्तर दिले आहे. सत्तेच्या लोभासाठी एकत्र आलेली ही महाविकास आघाडी एक्सपायरी डेट संपल्याने केव्हाही फुटण्याची शक्यता आहे असेही शेलार यांनी नमूद केले.

मायेची साडी’ने गाजवला भातुकडी पाडा – गरजू महिलांसाठी अनोखी मदत!

जोगेश्वरी, १२ जानेवारी २०२५ – गरजू आणि आदिवासी पाड्यातील महिलांसाठी आयोजित "मायेची साडी" उपक्रमाला यंदाही उत्तम प्रतिसाद मिळाला. मालाड पूर्वेतील भातुकडी पाड्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी अष्टविनायक महिला बचत गट शामनगर यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो.
नवरात्रोत्सवात देवीला अर्पण झालेल्या साड्या गोळा करून त्याचे वाटप गरजू महिलांना करण्यात येते. मागील वर्षी या उपक्रमात ६० साड्यांचे वितरण करण्यात आले होते. यंदाही मंडळांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर साड्या जमा होऊन गरजू महिलांना वितरित करण्यात आल्या.
या कार्यक्रमात रुपल खैरनार, स्मिता सावंत, दत्ता सावंत, भक्ती साळकर, पूजा दळवी, विनया कानडे, सुरेशना धुरी, प्राजक्ता महाजन, संतोष सावंत, प्रवीण सावंत आणि अतुल जैन यांचा मोलाचा सहभाग होता.
उपक्रमाचे आयोजक शिवाजी खैरनार यांनी या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्व मंडळांचे आणि महिलांचे आभार मानले. हा उपक्रम महिलांसाठी आधार बनला असून यामुळे त्यांना मदतीचा हात मिळाला आहे.

८६ रक्तदात्यांनी दिला जीवनदानाचा ठसा, जोगेश्वरीत निर्धारचा अनोखा उपक्रम!

जोगेश्वरी (पूर्व): स्वामी विवेकानंद जयंती आणि भारतीय युवादिनाचे औचित्य साधून रविवार, १२ जानेवारी २०२५ रोजी "निर्धार-एक हात आपुलकीचा" या सामाजिक संस्थेने अरविंद गंडभीर हायस्कूल, जोगेश्वरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या संस्थेचे नववे रक्तदान शिबिर असून दर सहा महिन्यांनी असे शिबिर आयोजित केले जाते.
शिबिराचे उद्घाटन सकाळी ९ वाजता प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत शेलार (मुख्याध्यापक, जे.ई.एस महाविद्यालय) यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ आणि साहित्यकृती देऊन करण्यात आला.
सकाळपासून रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत एकूण ११० जणांनी नाव नोंदवले, त्यापैकी ८६ जणांनी रक्तदान केले. नवोदित रक्तदात्यांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला, यामुळे निर्धारतर्फे समाजात जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले.
सध्या रक्तपेढ्यांमध्ये जाणवणाऱ्या रक्ततुटवड्याला काही प्रमाणात हातभार लावणारे हे शिबिर अतिशय यशस्वी ठरले. शिबिराच्या यशस्वितेसाठी "निर्धार" संस्थेचे कार्यकर्ते, मातोश्री मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे प्रतिनिधी आणि जे.ई.एस. महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.
शिबिराच्या समारोपाला प्रायोजक, हितचिंतक, रक्तदाते आणि संस्थेचे सहकार्यकर्ते यांचे विशेष आभार मानण्यात आले. "निर्धार"च्या पुढील शिबिरांसाठीही अशाच प्रकारचा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे महात्मा गांधी विद्यामंदिर डोंबिवली येथे ३५ वे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली वाहतूक शाखे तर्फे दि. ०९/०१/२०२५ रोजी, डोंबिवली पश्चिम येथे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत महात्मा गांधी येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार शशीकांत गांगुर्डे यांनी अपघात कुठल्या चुकीमुळे होतात याची कारणे आणि घडणाऱ्या अपघाताची आकडेवारी या बदल माहिती दिली. विद्यार्थांना रस्ता सुरक्षा विषयी सुरक्षित प्रवास कसा करावा, रस्ता सुरक्षाचे नियम याची सुद्धा माहिती करून दिली. 
या अभियानात डोंबिवली वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मा. बोरसे सर यांनी पोलीस विभागाचे आभार मानले. या वेळी ट्राफिक वॉर्डन सोमासे ट्राफिक वॉर्डन निलेश झेमसे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.