BREAKING NEWS
latest

अंतराळात २०२७ मध्ये झेपावणार ‘चांद्रयान-४’..

प्रतिनिधी: अवधुत सावंत
   
नवी दिल्ली : ‘चांद्रयान-३’ मोहिमेअंतर्गत २३ ऑगस्ट २०२३ ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरले होते. या ऐतिहासिक घटनेनंतर हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर उद्या शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी काल पत्रकार परिषदेमध्ये भाटवडेकर यांनी चांद्रयान- ४ मोहिमेची माहिती दिली.

'इसरो' अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या यशानंतर आता २०२७ मध्ये ‘चांद्रयान- ४ ‘मोहिमेचे नियोजन केले आहे. या मोहिमेला केवळ सरकारची औपचारिक परवानगी बाकी आहे. मात्र त्यासाठीची उलटगणना सुरू असल्याचे ‘इसरो’चे वैज्ञानिक सचिव शंतनू भाटवडेकर यांनी काल दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. जितेंद्रसिंह हे देखील उपस्थित होते.

शंतनू भाटवडेकर यांनी सांगितले की,”चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून रोव्हरद्वारे तेथील जमीन, खडकांचे नमुने गोळा करणे आणि हे नमुने पृथ्वीवर आणून त्यांचे विश्लेषण करणे, हे या ‘चांद्रयान-४’ मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ‘चांद्रयान-५’ चाही आराखडा तयार असून चंद्रावर सूर्यप्रकाश पोहोचू न शकणाऱ्या भागांचे संशोधन या मोहिमेमध्ये केले जाणार आहे. या मोहिमेत यानातून उतरविले जाणारे लॅंडर भारतीय बनावटीचे असेल. त्यामध्ये साधारण ३५० किलोग्रॅम वजनाचे रोव्हर वापरले जाणार आहे. यासाठी जपानमधील जॅक्सा या संस्थेशी बोलणी सुरू आहे.”

प्रतिवर्षी प्रमाणे 'दीपेश म्हात्रे फाउंडेशन' तर्फे यंदाही डोंबिवलीत स्वराज्य दहीकाला उत्सवाचे आयोजन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : दिपेश म्हात्रे फाऊंडेशन यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही 'स्वराज्य दहिकाला उत्सव २०२४' चे आयोजन डोंबिवली पश्चिम येथे सम्राट चौकात मंगळवार २७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती युवा मोर्चा सचिव दिपेश म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

स्वराज्य दहिकाला उत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. तसेच दहीहंडी फोडण्याचा मान यंदा  रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. याचे कारण रिक्षाचालक प्रामाणिकपणे रिक्षा चालवित असतात. रिक्षामध्ये वस्तू, बॅग अन्य काही चीजवस्तू राहिल्यास परत देतात. परंतु त्यांना पाहिजे तसा मान सन्मान मिळत नाही. त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे बघीतले जाते. एखाद्या वेळेस व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका येणाच्या अगोदर रिक्षावाला तेथे पाहचतो म्हणून या सर्व बाबींची दखल घेऊन रिक्षा चालकांना यंदा दहीहंडी फोडण्याचा मान मिळणार आहे.

तसेच सहभागी झालेल्या गोविंदा  पथकांना सलामी देण्यासाठीही आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तसेच संजु राठोड व विनायक माळीसह अन्य कलाकार यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच २६ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता 'कृष्ण जन्माष्टमी' साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तसेच कमानी गेट लावले जाणार नाहीत, जेणे करून वाहतुक कोंडी होणार नाही. कमानी लावु नये यासाठी आपण इतर पक्षांशीही मी बोलणार आहे असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. दहिकाला उत्सवाचे निमंत्रण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही दिले असल्याची माहिती दिपेश म्हात्रे यांनी दिली.

'फक्त निलंबनाने काय होणार? दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला गेला नाही?’, मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलीसांना खडसावले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने अख्खा महाराष्ट्र हादरला. या प्रकरणाची दखल आता मुंबई हायकोर्टाकडून घेण्यात आली आहे. याप्रकरणी कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

या प्रकरणाची तातडीची सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टाने बदलापूर पोलीसांना झापले आहे. बदलापूर पोलीसांवर या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याचा आणि दिरंगाई केल्याचा आरोप आहे. फक्त निलंबन करून काय होणार? तसंच या प्रकरणात दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला गेला नाही?, असा सवाल करत हायकोर्टाने बदलापूर पोलीसांना खडसावले आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बदलापूरमध्ये जमा झाली होती. आंदोलकांनी संबंधित शाळेत प्रवेश करत तोडफोड केली. त्याचवेळेस काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले व त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला. दरम्यान बदलापूर रेल्वे सेवा ९ ते १० तास संपूर्ण ठप्प झाली होती. राज्यभरात सातत्याने महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.

नराधम अक्षय शिंदे याला बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी २६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

बदलापूर : बदलापूरातील अल्पवयीन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची आज पोलीस कोठडी संपल्यानं त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बदलापूरमधील एका नामांकित आदर्श विद्यामंदिर शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच चार दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेतील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे. तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे. हा धक्कादायक प्रकार उजेडात येताच जमाव मोठ्या प्रमाणात संतप्त झाला. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. असं असताना आरोपीला १७ ऑगस्ट रोजी अटक करुन त्याला न्यायालयात हजर केलं असता, त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आज कोठडी संपल्याने पुन्हा त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आरोपी अक्षय शिदेंला हजर केलं असता न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी.ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी युक्तीवाद केला.

इंटरनेट सेवा बंद

दोन चिमुकल्या विद्यार्थिंनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक मंगळवारी रस्त्यावर उतरले. सकाळपासून नागरिकांचे शाळेबाहेर आंदोलन सुरू असतानाच शेकडो नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वेची वाहतूकही रोखून धरली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा सुमारे १० तास ठप्प झाली. संपूर्ण बदलापुरात संतापाचं वातावरण आहे. इंटरनेट सेवा बंद असून शहरात जमावबंदी लागू केली आहे. तर काही भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

कल्याण जिल्हा न्यायालयात केलं हजर

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण जिल्हा न्यायालयात हजर करण्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपीला फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडून केली जात होती. बदलापुरातील पालक आणि नागरिकांचा रोष पाहता आरोपीवर हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे कायदा सुव्यवस्था पाहता पोलीसांनी स्टेशन परिसरासह कल्याण न्यायालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

"पत्रकारांशी असभ्य वर्तणूक व अश्लील भाषा केलेली सहन करणार नाही" - केंद्रीय पत्रकार संघ; इस्लामपूर तालुका वाळवा तहसीलदार सचिन पाटील यांना दिले निवेदन!


विशेष प्रतिनिधी

इस्लामपूर, २२ ऑगस्ट २०२४: कोल्हापूर येथे ऑलम्पिक वीर यांच्या मिरवणुकीमध्ये वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकार आणि छायाचित्रकार यांना पोलीस प्रशासनाने धक्काबुक्की केली व त्यांना अयोग्य वागणूक देण्यात आली. या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा तसेच बदलापूर येथील वार्तांकन करण्यास गेलेल्या महिला पत्रकाराला अश्लील भाषेत बोलून त्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांच्या निर्देशानुसार या संदर्भातील निवेदन इस्लामपूर तालुका वाळवा तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले. यावेळी राज्य प्रवक्ते चंद्रशेखर क्षीरसागर, सांगली जिल्हा अध्यक्ष रवींद्र लोंढे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मोहिते, पत्रकार राजेश कांबळे, जेष्ठ पत्रकार दयानंद माळी व इतर पत्रकार उपस्थित होते.

"पत्रकारांचा अपमान हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान आहे, हा आम्ही कदापि सहन करणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि अश्लील भाषेत बोलून अपमान करणाऱ्या त्या राजकीय व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे" असे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटले आहे.


कांद्याच्या भावात मोठी उसळी, या वर्षातील सर्वात जास्त भावाची नोंद !

प्रतिनिधी: अवधुत सावंत

नाशिक :  कांद्याचे बाजारभाव सध्या टिकून असून रोज कांद्याचे भावात सुधारणा होत आहे. नाशिक जिल्हात ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी होते त्या ठिकाणाचा कांदा चांगला भाव खावुन जात आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा हेक्टरी कांदा पिकविण्याबाबत प्रसिध्द आहेत. तसेच मराठवाडा विदर्भ व कोकणात सुध्दा काही जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड केली जाते. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे तर सबंध भारतात कांदा पिकविण्यात प्रसिध्द आहे. एकूण उत्पादनापैकी महाराष्ट्रातील ३७ टक्के तर भारतातील १० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक  जिल्ह्यात घेतले जाते.

कांद्याची वाढती मागणी आणि कांद्याची तुटवडा लक्षात घेता कांद्याचे भाव अजून वाढत जाणार आहे. नाशिकच्या कांद्याची चव ही सर्वात श्रेष्ट असल्यामुळे कांद्याची मागणी वाढत आहे. त्याच बरोबर देशामध्ये कांद्याची मागणी टिकून आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या सर्वात जास्त कांदा निफाड तालुक्यातून येत आहे. इतर तालुक्यात मात्र कांदे उपलब्ध नाही. काही ठिकाणी येवला तालुक्यात कांद्याचे पिक आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी प्रचंड दुष्काळ असल्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण हाल झाले. शेतकरी जेव्हा कांदा पिकवितो तेंव्हा त्याला कांद्याला भाव राहत नाही अशी स्थिती नेहमी होते. कांद्याला जेंव्हा २०० रुपये भाव क्विंटला मिळतो तेंव्हा मात्र शहरी लोकांच्या डोळ्यात पाणी येत नाही. शहरी लोकांनी हे समजून घेतलं पाहिजेत कांद्याचा भाव हा मोत्या पोवळ्या सारखा असता,  कधी वाढला तर वाढला नाहीतर सरसरी १००० रुपये शेतकऱ्यांना विकावा लागतो.

सध्याच्या घडीला राज्यातील पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला उच्चांकी ४१०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. याशिवाय उमराणे बाजार समितीमध्ये देखील कांद्याला ४००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे आणि टप्पा गाठला आहे. तर राज्यातील अन्य सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला सध्या ३७०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटलहुन अधिक दर मिळत आहे. ज्यामुळे आता कांदा दरात वाढ झाल्याने उन्हाळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

लाल कांदा बाजारात येण्यासाठी अजून उशीर लागणार आहे. कांद्याची वाढती मागणी आणि नवीन कांदा बाजारात येण्यासाठी होणारा उशीर यामुळे कांदा ५ हजाराचा टप्पा गाठणार आहे. असे अभ्यासकांचे मत आहे. दुष्काळामुळे कांद्याचे उत्पादन घटले आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला.

मंकीपॉक्स विरोधी लस सीरम इन्स्टिट्यूट बनवणार..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे, दि.२० : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असताता काल महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने या रोगावर देखरेख आणि व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानंतर आज कोरोना लस कोविशील्ड बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने मंकीपॉक्स (एमपॉक्स) लस तयार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले  एमपॉक्स ला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर, आम्ही लाखो लोकांना मदत करण्यासाठी एक लस विकसित करत आहोत. आशा आहे की आम्ही ती एका वर्षात पूर्ण करू.

एमपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमध्ये १९ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांसह पाकिस्तान आणि बांगलादेश सीमेवर अलर्ट जारी केला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. सध्या भारतात मंकीपॉक्सची लागण कोणालाही झालेली नाही. शेवटचे प्रकरण मार्च २०२४ मध्ये उघडकीस आले होते.

आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, एकाच बाधित रुग्णाला मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव मानला जातो, त्यामुळे प्रत्येक प्रकरणाची रॅपिड रिस्पॉन्स टीमकडून चौकशी करण्यात यावी. संशयित रुग्णांचे प्रयोगशाळेतील नमुने पुणे येथील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी' म्हणजेच एनआयव्ही येथे पाठवावेत. बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे वैद्यकीय करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने रविवारी एक बैठक घेतली आणि राज्यांना देखरेख, प्रतिबंध आणि नियंत्रण क्रियाकलापांसाठी निर्देश जारी केले. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.