BREAKING NEWS
latest

"आनंदाचा शिध्या"ची काळ्या बाजारात विक्री, २७० खाद्य तेलाच्या थैल्या पकडल्या, रेशन दुकान सील..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथ : एका रेशन दुकानदाराला पामतेला समवेत अन्य शिधा जिन्नसांचा अपहार करताना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना अंबरनाथ मधील महालक्ष्मी नगर येथे घडली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात शिधा वाटप दुकानदार आणि त्याच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पूर्व येथील महालक्ष्मी नगरात मैत्रिण औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या शिधावाटप दुकानात पामतेल आणि अन्न धान्याचा काळा बाजार होत असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला होता. त्यांनी या दुकानावर पाळत ठेवत सोमवारी दुकानदार सुभाष भारती आणि त्याचा साथीदार कुंदन कुमार गुप्ता यांना शिधाधारकांना वितरित करण्यासाठी आणलेल्या पामतेल आणि इतर शिध्याचा काळा बाजार करत असताना पकडले. ही घटना समजताच अंबरनाथ रेशनिंग विभागाचे अधिकारी शशिकांत बाळकृष्ण पोटसुते यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिधावाटप दुकानाची झाडाझडती घेतली असताना त्यांना पामतेल आणि अन्य शिधा जिन्न्स कमी प्रमाणात आढळून आले. त्यांनी रेशन दुकानदारा विरुद्ध अनधिकृतपणे जीवनावश्यक वस्तूंचा अपहार केल्याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

रेशन दुकानात कमी आढललेला माल २,८७५ किलो तांदूळ, गहू ५,४२० किलो, प्रधानमंत्री पिशवी ५५७ नग, अंत्योदय साखर १० किलो, साडी २ नग, आनंदाचा शिधा (रवा, साखर, चनाडाळ, तेल प्रति एक किलो) आनंदाचा शिधा (तेल), २७० नग, असा साधारण ४ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या माल दुकानातून गायब केला.

राज्य शासनाकडून रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जात असतो. मात्र अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरातील ४६ /फ - ००१ या रेशन दुकानात सरकारकडून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाच्या शिध्याचं साहित्य आलं होतं. यापैकी सोयाबीन खाद्य तेलाच्या २७० लिटर तेलाच्या पिशव्या पहाटेच्या सुमारास एका खाजगी टेम्पोतून काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी आणि प्रशांत उतेकर यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी टेम्पो चालकाला अडवून विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिल्यामुळे गोसावी यांनी शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना बोलाविले. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस ठाणे करीत आहे.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ.योगेश चौधरी यांची नियुक्ती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. योगेश चौधरी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.चौधरी हे पूर्वी शास्त्रीनगर रुग्णालयात बालरोग तज्ञ म्हणून १२ ते १३ वर्षे कार्यरत होते. त्यानंतर ते कल्याण-डोंबिवली  महापालिकेच्या कल्याण येथील  रुक्मिणीबाई रुग्णालयात ८ ते १० वर्षे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत होते. दिवसभरात ते २०० ते २५० रुग्णांना तपासत असे. एक दीड वर्षापूर्वी डॉ. योगेश चौधरी यांची टिटवाळा येथील रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली होते. तिथे त्यांचे वैद्यकीय कार्य पाहून डॉ. चौधरी यांना डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून उद्यापासून ते पदभार सांभाळणार आहेत असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

ब्रेकिंग न्यूज: जोगेश्वरी पश्चिमेत बर्थडे पार्टीमध्ये मुलांच्या ऑरेंज ज्यूसमध्ये आढळला डास!

दिनांक 09 सप्टेंबर, 2024 रोजी जोगेश्वरी पश्चिम येथील आदर्श नगर येथे वाढदिवसाच्या कार्यक्रमात, लहान मुलांना वाटण्यात आलेल्या बिग किड्स ऑरेंज ज्यूसच्या बाटलीत एक डास आढळून आला. पत्रकार संदीप कसालकर यांची मुलगी वैष्णवी हिला ज्यूसच्या बाटलीत काहीतरी असामान्य गोष्ट दिसली. जवळून पाहणी केल्यावर तिच्या लक्षात आले की यात डास आहे.

ही दूषित ज्यूसची बाटली ओशिवरा मेट्रो स्टेशनजवळील एका दुकानातून खरेदी करण्यात आली होती. संदीप कसालकर यांनी दुकानदाराशी संपर्क साधला असता, त्यांना माहिती मिळाली की या बाटल्या Aje India Pvt Ltd चे वितरक शैलेश मिश्रा यांनी पुरवल्या होत्या. मात्र, मिश्रा यांना स्पष्टीकरण विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार देत अचानक फोन कट केला.

कसालकर यांनी तात्काळ या घटनेची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील यांना दिली, त्यांनी त्यांना अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) तक्रार करण्याचा सल्ला दिला. या मार्गदर्शनानंतर कसालकर यांनी अंधेरी येथील एफडीएचे डॉ. सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी धक्कादायक उत्तर दिले, “आम्ही याबाबत काहीही करू शकत नाही. तुम्हाला FSSAI पोर्टलवर तक्रार दाखल करावी लागेल.”

बालकांना विषबाधा झाल्याची प्रकरणे अजूनही ताजी असताना, हा निष्काळजीपणा आणि कारवाईत होणारा दिरंगाई गंभीर चिंता निर्माण करत आहे. हे प्रकरण निकडीचे असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून जबाबदारी व वेळीच प्रतिसादाचा अभाव दिसून येत आहे.

पत्रकार संदीप कसालकर यांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा विलंबाला जागा असू शकत नाही. अशा घटना जीवघेण्या होऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांनी ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे.”

आता Aje India Pvt Ltd आणि जबाबदार वितरकांची उत्तरं काय असणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. लहान मुलांच्या शीतपेयांमध्ये सुरक्षा मानकांचे असे धोकादायक उल्लंघन कसे होऊ शकते? आरोग्याच्या या गंभीर धोक्याकडे लक्ष देण्यासाठी त्वरीत कारवाई का केली जात नाही? असे अनेक प्रश्न सध्या सदर घटना पाहून उपस्थित राहत आहेत. 





रिक्षात विसरलेली ४ तोळे दागिन्यांची पर्स मानपाडा पोलीसांनी केली परत..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रीजन्सी अनंतम संकुलात राहणाऱ्या महिला सौ. श्वेता नितीन नरवडे (वय: २६ वर्षे) या दिनांक ०६/०९/२०२४ रोजी रात्री आठ वाजता अनंतम रीजन्सी ते डोंबिवली स्टेशन असा रिक्षाचा प्रवास करीत असताना रिक्षात ठेवलेली पर्स नकळत पाठीमागे विसरून गेल्या. सदर पर्समध्ये एकुण ४ तोळे सोन्याचे दागीने होते त्यात एक दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, १३ ग्रॅम दोन लहान मंगळसूत्र, एक सोन्याची अंगठी, ९ ग्रॅम चांदीचे मनगट्या, गळ्यातील लहान सोन्याचे एक पान व रोख रक्कम असा ऐवज आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. दागिने असलेली पर्स रिक्षात विसरली असल्याचे महिलेच्या लक्षात आल्याने त्यांनी लागलीच मानपाडा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. 

मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व पोलीस निरीक्षक (गुन्हे ) राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संपत पडोळ यांनी लागलीच एक टीम तयार केली.  पोलीस शिपाई अशोक आहेर,  विजय आव्हाड यांना सदर ठिकाणी ताबडतोब रवाना करून त्यांनी तांत्रिक पद्धतीने बावीस सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून रिक्षाचा तीन तासात शोध घेऊन त्यांची हरवलेली पर्स परत आणून त्या महिलेला दिली. महिलेने त्यांचे आभार मानत मानपाडा पोलीसांच्या उत्तम कामगिरी मुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी केली दुर्गाडी गणेश घाट परिसराची पाहणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी गणेश घाट येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रातील तसेच उल्हासनगर येथील मोठ्या श्रीगणेश मूर्ती प्रामुख्याने विसर्जनासाठी येत असतात. कल्याण मधील हे सर्वात मोठं नैसर्गिक विसर्जन स्थळ असल्यामुळे तेथे करण्यात आलेल्या तयारीची आज महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या दुर्गामाता चौकातून दुर्गाडी गणेश घाटाकडे जाण्यासाठी यापूर्वी दोन रस्ते होते. यातील एक रस्ता जाण्यासाठी व दुसरा रस्ता बाहेर येण्यासाठी वापरला जात होता. परंतू यातील एक मार्ग चालू वर्षी या ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या नेव्हल म्युझीयममुळे कायमस्वरुपी बंद झाला होता. त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाची मागणी पोलीस विभाग तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. याकरीता सदर ठिकाणी रिंग रोडवर असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपा पासून दुर्गाडी गणेश घाटापर्यंत पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय महापालिके मार्फत घेण्यात आला.

या ठिकाणी एकूण ११५ मी. लांब व १५ मी. रुंद रस्ता पेव्हर ब्लॉक लावून पुर्ण करण्यात येत आहे. तसेच या ठिकाणी वाहत असलेल्या नाल्यावर ६ फुट व्यासाचे ४ पाईप टाकुण पुल बनविण्यात आला आहे. याकरीता महापालिका निधीतून रु. २ कोटी इतका खर्च करण्यास महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच सदर काम कोणत्याही परिस्थितीत श्री गणेशोत्सवापूर्वी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत दिवस-रात्र काम चालू ठेवून, ते पूर्ण करण्यात येत आहे.
सदर मार्गाने वाहने बाहेर पडून ट्रक टर्मिनल्सच्या जागेत असलेल्या रस्त्याच्या मार्गे मुख्य रस्त्याला नेण्यात येतील. यामुळे दरवर्षी दुर्गामाता चौकात विसर्जनाच्या दिवशी होणारी वाहतुक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. म‍हापालिकेमार्फत केलेल्या या रस्त्याच्या कामामुळे पोलीस विभाग तसेच नागरीक व श्री गणेशोत्सव मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे. या पाहणी दौऱ्यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, विभागप्रमुख (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव उपस्थित होते.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेश भक्तांची लाल परीला पसंती..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे : ठाणे विभागातून यंदा लालपरीची 'विक्रमी' स्वारी होणार आहे. ठाणे विभागीय कार्यालयाच्या आगारातून सुमारे दोन हजार ५०० बस किंवा त्यापेक्षा अधिक बसमधून गणेशभक्त गावी जाणार आहेत. त्यातील दोन हजार ४८१ बस फुल झाल्या आहेत. यामध्ये २ हजार ६४ बस ग्रुप बुकिंगच्या तर उर्वरित ४१७ बस आरक्षण बुकिंगच्या आहेत. गुरुवारी सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या कोकणात गणेशभक्तांना घेऊन रवाना झाल्या. एकूण बुकिंग गाड्यांपैकी जवळपास १ हजार २०० गाड्या या राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून बुक झाल्या आहेत.

शनिवार, ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. गौरी-गणपतीच्या सणाकरिता ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान एसटी वाहतूक केली जाते. यंदा २ हजार ३२ गाड्यांचे नियोजन ठाणे (एसटी) विभागाने केले. त्यापेक्षा अधिक जवळपास ५०० गाड्यांचे बुकिंग झाल्याने २ हजार ४८१ बस फूल होऊन ठाणे विभागीय कार्यालयाची विक्रमी नोंद झाली. गतवर्षीपेक्षा यंदा ५०० अधिक गाड्यांचे बुकिंग झाले. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

विविध सवलतींमुळे एसटीला पसंती देत पुन्हा प्रवासी एसटीकडे वळताना दिसत आहेत. दरम्यान, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बस सुटण्याची ही आहेत ठिकाणे

 ठाणे - खोपट, बोरीवली, भाईंदर, मुलुंड, भांडुप, डोंबिवली, कल्याण, विठ्ठलवाडी आणि दिवा.

गुरुवारी सर्वाधिक १,८८१ गाड्या रवाना

ठाणे विभागाकडून संपाच्या दिवसात योग्य नियोजन करून मंगळवार दि.३ सप्टेंबरला २२ तर बुधवार दि.४ सप्टेंबरला ४८२ गाड्या सोडण्यात आल्या. गुरुवारी ५ सप्टेंबरला सर्वाधिक १ हजार ८८१ गाड्या रवाना झाल्या. शुक्रवारी ६ सप्टेंबरला ९६ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

या विभागांचा ठाण्याला मदतीचा हात

ठाणे विभागाच्या मदतीला एकूण १ हजार ७०० गाड्या धावून आल्या. गतवर्षीपेक्षा ६० गाड्या यंदा जास्त आहेत. यंदा मुंबई प्रादेशिक, पुणे प्रादेशिक आणि नाशिक प्रादेशिक येथील गाड्यांचा समावेश आहे.

जाताना पाच तर येताना तीन ठिकाणी थांबा

कोकणात मुंबई-गोवा महामार्गाने जाताना चहापान आणि नैसर्गिक विधीसाठी पाच हॉटेलच्या ठिकाणी थांबा दिला आहे तर येताना तीन ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

शिक्षक दिनी पेंढारकरच्या प्राध्यापकांचा काळे कपडे परिधान करून निषेध..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर कॉलेजच्या अनुदानित प्राध्यापकांनी गुरुवारी शिक्षकदिनी काळे कपडे घालून कॉलेज प्रशासनाचा निषेध केला. आम्हाला न्याय कधी मिळणार? आमची उपेक्षा कधी थांबणार? असे संतप्त सवाल उपस्थित केले.

हे कॉलेज डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाकडून चालविले जाते. संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांनी कॉलेज अनुदानित असताना ते विनाअनुदानित करण्याचा घाट घातला आहे. ३ जूनपासून अनुदानित प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गास काम न देता एका वर्गाच्या  खोलीत बसवून ठेवले जाते. कॉलेज प्रशासनाच्या विरोधात माजी विद्यार्थी सोनू सुरवसे यांनी बेमुदत साखळी उपोषण कॉलेजसमोर सुरू केले ते आजपर्यंत सुरू आहे. प्राध्यापकांसह शिक्षकेतर कर्मचारी वर्गास जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा पगार दिलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसह विभागीय शिक्षण संचालक आणि उच्च शिक्षण विभागाचे कोकण विभागीय उपसंचालकांकडे तक्रारी केल्या. शिक्षण संचालकाच्या पुणे कार्यालयाने अध्यक्षांना जाब विचारला तर अध्यक्षांनी त्यांच्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉलेजवर प्रशासक नेमावा, असे आदेश दिले आहेत.