काटई : मौजे काटई, डोंबिवली येथील सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन जयवंत पाटील यांच्या राहत्या घरी गणेशोत्सव काळात मागील नऊ वर्षांपासून "गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी" हा सामाजिक उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात ते गणपती दर्शना निमित्त येणाऱ्या साऱ्या गणेश भक्तांना शैक्षणिक साहित्य आणण्याचे आवाहन करत असतात आणि हे जमा झालेले शैक्षणिक साहित्य ते दुर्गम भागातील, आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करत असतात.
"गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी" या उपक्रमा अंतर्गत घरगुती गणेशोत्सव काळात त्यांच्या काटई येथील राहत्या घरी गणपती दर्शनानिमित्ताने आलेल्या गणेश भक्तांकडून प्राप्त झालेले व मखरीतील सजावटीचे सर्व शैक्षणिक साहित्य त्यांनी आज शुक्रवार,दिनांक २०/०९/२०२४ रोजी खडकवाडी (ता.कर्जत, जि.रायगड) या आदिवासी पाड्यातील, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेतील अंगणवाडी ते इयत्ता सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाटप केले.
या शैक्षणिक साहित्य वाटपावेळी नेहमीप्रमाणे विशेष आकर्षण झाले ते म्हणजे आगरी समाजातील प्रसिद्ध निवेदक, सूत्रसंचालक, जादूगर श्री राम पाटील सरांचे जादूचे प्रयोग. हे नवनवीन जादूचे प्रयोग विद्यार्थी कुतूहलाने पाहत तर होतेच परंतु काही जादूच्या प्रयोगातून झालेल्या विनोदाने तर पोट दुखायची वेळ येत होती असे गजानन पाटील यांनी यावेळी सांगितले.
आजच्या शैक्षणिक साहित्य वाटपावेळी हभप हनुमान महाराज पाटील, जादूगार राम पाटील सर, विश्वनाथ म्हात्रे, फुलचंद पाटील, मनोहर पाटील, प्रकाश पाटील, गणेश पाटील, प्रेमनाथ पाटील, करसन पाटील, मधुकर पाटील, महेश संते, मंगेश खुटारकर, शशिकांत पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, युवराज पाटील यांचे मोलाचे सहकार्य व उपस्थिती लाभली. तसेच खडकवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेशजी चव्हाण सर व सहशिक्षक मनोहरजी सोनटक्के सर यांनी या संकल्पनेचे कौतुकही केले.
"घरगुती गणेशोत्सवानिमित्त माझ्या राहत्या घरी मागील नऊ वर्षांपासून बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पांच्या दर्शनानिमित्त येणाऱ्या गणेश भक्तांकडून आवाहन केल्याप्रमाणे शैक्षणिक साहित्य संकलित केले जाते. हे जमा झालेले सर्व शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील आदिवासी पाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्याची ही एक प्रामाणिक संकल्पना आहे. गणेशोत्सवातील आनंद आणि आज शैक्षणिक साहित्य वाटपा वेळी शाळकरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमचाही आनंद द्विगुणित झाला". असे सामाजिक कार्यकर्ते श्री. गजानन जयवंत पाटील यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले तर "आपल्या हिंदू धर्मात आपण मूर्तीमध्ये देव शोधतो परंतु सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी या संकल्पनेद्वारे दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये देव शोधला." असे उद्गार खडकवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्याप श्री. योगेश चव्हाण यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर काढले.