डोंबिवली : नवरात्र उत्सवाचे नऊ दिवस हे नेहमीच आपल्याला सचेत ठेवतात. अध्यात्म, चेतना, उस्फुर्ततेचा स्रोत नवदुर्गा द्वारे चैतन्य निर्माण करतात. दरवर्षी प्रमाणेच ह्या वर्षी देखील 'जे एम एफ' शिक्षण संस्थेमध्ये नवदुर्गा आणि मातृपितृ पूजन 'जे एम एफ' मंडपम मधे उत्साहात आणि भक्ती भावाने करण्यात आले. लहान मुलींचे रुप हे दुर्गा देवीचे रूप आहे. शिशुविहार च्या छोट्या नऊ कुमारिका देवीच्या नऊ रुपात सजून आल्या होत्या तर देवी बरोबरच हे नवरात्र व्यंकटेश म्हणजे गिरी बालाजीचे देखील आहे. त्यामुळे इयत्ता पहिली मधील विद्यार्थी बालाजीच्या रूपात आला होता. तर बालाजीची पत्नी लक्ष्मी ने देखील कमळात स्थानापन्न होऊन सर्वांना प्रसन्न मुद्रेने दर्शन दिले. कलेची देवता सरस्वती हातात वीणा घेऊन व विद्येचा दाता गणपती बाप्पाने देखील सपत्नीक रिध्दी सिध्दी यांच्या बरोबर दर्शन दिले.
लहान मुले ही देवाचे रूप असतात. हातात कमळ, त्रिशूळ, खड्ग, चक्र, तलवार घेऊन देवीच्या रुपात सर्व तयार होऊन आलेल्या छोट्या बालिका म्हणजे साक्षात पार्वतीचे वेगवेगळे रूप दिसत होत्या. तर गळ्यात मुंडक्यांची माळा घालून बसलेली काली माता चे रुप हे अचंबित करणारे होते. प्रसन्न चेहऱ्याने वीणा वादन करणाऱ्या सरस्वतीचे रूप मोहून टाकणारे होते. संस्थेचे संस्थापक माननीय डॉ. राजकुमार कोल्हे, सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी 'जे एम एफ' च्या प्रवेश द्वारातून या सर्व देवी देवतांची पाद्यपूजा करून ओवाळून वाजत गाजत मंडपम मधे फुलांच्या पायघड्या घालून त्यांचे आगमन केले, व सर्वांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. मान्यवर व इतर पदाधिकारी यांनी सरस्वती पूजन केले.
आज आपलीं शाळा ही केवळ शाळा राहिली नसून साक्षात 'जे एम एफ' मंडपम मध्ये स्वर्गलोकचं अवतरला आहे असे सांगून संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे यांनी, कल्पनेमधे आपण स्वर्ग आणि देवी देवता बघत असतो परंतु आपले भाग्यच म्हणावे लागेल की, स्वर्गातून साक्षात देवी देवता आपल्या 'जे एम एफ' संस्थेला आशीर्वाद देण्यासाठी अवतरल्या आहेत. जिच्या शिवाय ब्रम्हांड अपूर्ण आहे अशी गोष्ट म्हणजे 'स्त्री' पार्वती आणि तिचीच ही अनेक रूपे ज्यामुळे ब्रह्मांड परिपूर्ण आहे. त्यामुळे केवळ आजच्याच दिवशी स्त्री चा सन्मान न करता कायमच स्त्रीयां बद्दल आदराची भावना ठेवली पाहिजे असे डॉ. राजकुमार कोल्हे यांनी सांगितले.
ज्या प्रमाणे देवी ही निरागस बलिकेचे रूप घेऊन जगाला मोहून टाकते त्याच वेळी ती कलिमाते चे रौद्र रूप धारण करून देखील वाईटांचा नाश व संहार करू शकते. त्यावेळी देवांचे देव महादेव देखील तिच्यापुढे शरणागती पत्करतात हे लक्षात ठेवा, असे संस्थेच्या सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
'जन गण मन' विद्यामंदिर च्या विध्यार्थ्यांनी आजी आजोबांवर आधारित छानसी नाटिका सादर केली. कविता गुप्ता यांनी नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले होते तर उप मुख्याध्यापिका तेजावती कोटियन दिग्दर्शित देवीचा गोंधळ हे नृत्य इयत्ता आठवीच्या मुलींनी सादर केले. शिशुविहर च्या सर्व बालकांनी त्यांच्या शिक्षिका दिपाली सोलकर यांच्या बरोबर गरबा सादर केला.
'या देवी सर्व भुतेशू स्वस्ति रुपेन संस्थिता, नमसतस्यै नमो नमः' संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे, खजिनदार जान्हवी कोल्हे यांनी भक्ती भावाने नवदुर्गाचे पूजन करून त्यांना कुमारिका वाण देऊन त्यांची आरती केली तर 'मातृ देवो भव, पितृ देवो भव' ज्या प्रमाणे गणपती बाप्पा ने आपल्या आई वडिलांचे म्हणजेच शंकर पार्वतीची पूजा करून ब्रह्मांड मधे आई वडिलचं श्रेष्ठ असे सांगितले, त्याच प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे पूजन केले. त्याच वेळी संगीत शिक्षिका सौ. श्रेया कुलकर्णी यांनी मंत्राच्या घोषात नवदुर्गा व मातृ पितृ पूजनाचा सोहळा संपन्न केला. सर्व सुवासिनींना केळं व रुमाल देऊन त्यांची ओटी भरली. सर्वांचा आवडता कार्यक्रम गरबा. मधुबन वातानुकुलीत दालनांत महा गरबा, दांडिया चे आयोजन केले गेले होते व सर्व पालक, विद्यार्थी शिक्षकांनी गरब्याचा आनंद लुटला.