मुंबई :- तहसिल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या सेतु सेवा कार्यालयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागातील उप-अधीक्षक भूमी अभिलेख, ठाणे आणि उप-अधीक्षक भूमी अभिलेख, शहापूर या कार्यालयातील भुप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला.
या केंद्रामध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिकेवरील फेरफार सर्व प्रकारचे ऑनलाईन फेरफार अर्ज, ई-मोजणी व्हर्जन २.० मधील सर्व प्रकारचे मोजणी नकाशे, मिळकतीच्या डिजिटल सही केलेले फेरफार, नोंदवही उतारे आणि ऑनलाईन अर्ज करायची सुविधा, तसेच नकाशे व स्कॅन अभिलेख याच्या डिजिटल सही केलेल्या नकला, जनतेला वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यापूर्वी भूमी अभिलेख विभागातील विविध प्रकारचे नकला मिळविण्यासाठी नक्कल अर्ज करण्यासाठी जनतेला कार्यालयात छापील अर्ज करून हेलपाटे घालावे लागत होते. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नागरिकांची खाजगी संस्थेकडून आर्थिक पिळवणूक होत होती आणि सुविधा वेळेत मिळत नव्हत्या. परंतू आता भूप्रमाण केंद्राच्या माध्यामातून जनतेला सर्व सुविधा वेळेत आणि वाजवी दरात मिळाल्यामुळे प्रशासनातील विलंब कमी होऊन लोकाभिमुख प्रशासनाला हातभार लागणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकुण ३० भूप्रमाण केंद्राचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले असून यामुळे भूमी अभिलेख खाते लोकाभिमुख होणार आहे.