BREAKING NEWS
latest

पैशांअभावी उपचार नाकारले, जीव धोक्यात! – 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांच्या बातमीची दखल; खासदार रविंद्र वायकर यांची थेट हॉस्पिटलला भेट


संदिप कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबई: अंधेरी पूर्वेतील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये हृदयविकारग्रस्त ५२ वर्षीय अमृतलाल सोनी यांना डिपॉझिट नसल्यामुळे उपचार नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. त्रासात असलेल्या रुग्णाला जवळपास दीड तास हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थ अवस्थेत बसवून ठेवण्यात आले. अखेर नातेवाईकांनी त्यांना महापालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल केलं, जेथे सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, होली स्पिरिटसारख्या धर्मादाय हॉस्पिटलकडूनही गोरगरीब रुग्णासाठी राखीव असलेल्या सुविधांचा लाभ नाकारण्यात आला. रुग्णाच्या नातेवाईकांनी २५ हजार रुपयांचे डिपॉझिट देण्याची तयारी दर्शवली होती, तरीही हॉस्पिटल प्रशासनाने ताठर भूमिका घेतली. धर्मादाय रुग्णालय असूनही अशा प्रकारची अमानुष वागणूक मिळाल्याने जनतेमध्ये तीव्र संताप आहे.


या घटनेनंतर नागरिकांच्या तक्रारी आणि 'न्याय रणभूमी' व इतर माध्यमांच्या बातमीची दखल घेत खासदार रविंद्र वायकर यांनी होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये अचानक भेट दिली. हॉस्पिटल प्रशासनाची कानउघाडणी करत त्यांनी रुग्णांबरोबर यापुढे सुसंवाद आणि सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी, अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला. धर्मादाय हॉस्पिटल म्हणून गोरगरीब रुग्णांना आर्थिक सहाय्य, राखीव सुविधा आणि तातडीची मदत मिळावी, यासाठी रचनात्मक बदल करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.


या बैठकीस मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी, कार्यकारी संचालक सिस्टर लीसी, उपसंचालक सिस्टर फेलसी, मेडिकल डायरेक्टर डॉ. सुसंन तसेच माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, सदानंद परब, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, विधानसभा संघटक संतोष गिरी, शाखा प्रमुख भालचंद्र जोशी, प्रकाश शिंदे, उपेश सावंत, अंशिका जाधव आणि भाई मिर्लेकर उपस्थित होते.

या प्रकारानंतर नागरिकांमधून अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, "या पुढेही पालिकेने आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ, ठोस पावले उचलावीत"


फक्त २४ तासांत चमत्कार! भारत २४ तासच्या बातमीनंतर जोगेश्वरी स्टेशन फेरीवाल्यांपासून मुक्त!


संदिप कसालकर, संपादक (न्याय रणभूमी)

जेव्हा पत्रकारितेला लोकशक्तीची साथ मिळते, तेव्हा बदल घडतो! भारत २४ तासची बातमी, आणि महापालिकेची कारवाई – जोगेश्वरीकर म्हणतात, 'आता खरंच काहीतरी बदलतेय!

बातमीचा सविस्तर तपशील:
जोगेश्वरी पूर्व रेल्वे स्थानकाजवळील परिसर 'ना फेरीवाला झोन' असतानाही, मागील अनेक महिन्यांपासून इथे शेकडो फेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढलेलं होतं. हातगाड्या, फळभाज्या, कपडे अशा अनेक वस्तूंच्या विक्रीमुळे प्रवाशांना दररोज अडथळ्यांना तोंड द्यावं लागत होतं.
या परिसरात वाहतूक विस्कळीत होत होती, स्टेशनच्या लिफ्ट व मार्गांवर अडथळे निर्माण होत होते, आणि अपघाताच्या घटनाही वाढत होत्या. काही प्रवासी संघटनांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या, पण ठोस कारवाई होत नव्हती.
भारत २४ तासचा इम्पॅक्ट:
भारत २४ तासवर प्रकाशित झालेल्या वृत्तात हे सर्व वास्तव व प्रत्यक्ष चित्रफीत समोर मांडण्यात आलं. बातमी प्रसारित होताच, के-पूर्व महापालिका विभागाने तात्काळ दखल घेतली.
- महापालिका कर्मचाऱ्यांनी विशेष पथकासह फेरीवाले हटवले
- अतिक्रमित रस्त्यांची साफसफाई करण्यात आली
- परिसरात नियमित देखरेखीचा निर्णय घेण्यात आला

प्रशासनाचे पाऊल स्वागतार्ह!
नागरिकांनी प्रशासनाच्या या तत्परतेचं अभिनंदन केलं असून, अशाच प्रकारे लोकांच्या अडचणींवर लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.



महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढाकार
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे उपविभाग संघटक सुशांत हर्याण यांनीही काही दिवसांपूर्वी या गंभीर परिस्थितीविरोधात अधिकृत पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यावेळी संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती.
याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा उत्तम सर्वोदय या अधिकाऱ्यांना भेटून अश्या कारवाई वारंवार झाल्या पाहिजेत असे निवेदन देणार असल्याचे हरयाण यांनी सांगितले आहे.


एक स्थानिक नागरिक म्हणाले:
"पहिल्यांदा असं वाटतंय की आपली तक्रार कुणीतरी ऐकली! भारत २४ तासचे आभार, आणि महापालिकेचेही!"
या पुढेही महापालिका अशीच कारवाई करेल, जेणेकरून स्थानिकांना त्रास होणार नाही – अशी अपेक्षा आता जोगेश्वरीकर व्यक्त करत आहेत!


मजबूत पत्रकारिता + जागृत नागरिक + जबाबदार प्रशासन = सकारात्मक बदल!
भारतातील मीडिया कधी प्रभावी ठरतो, हे या घटनेतून स्पष्ट होतं. अशाच बातम्यांसाठी आणि लोकशाहीला बळ देण्यासाठी पाहत राहा – भारत २४ तास!








एक शिक्षक, एक व्हिडीओ आणि दोन पुरस्कार! रोम्युला यांनी सेंट अर्नोल्ड शाळेचं नाव केलं उज्वल!


संदिप कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

मुंबई | ११ एप्रिल २०२५ – शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या मनात उजळवलेली प्रेरणेची ठिणगी! आणि हीच ठिणगी तेवत ठेवणाऱ्या शिक्षकांमध्ये सेंट अर्नोल्ड हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या रोम्युला फिलिप पिंटोयांचे नाव आता गौरवाने घेतले जाते. 

शैक्षणिक विभाग आयोजित "Quality Educational Video Competition" मध्ये त्यांच्या नावीन्यपूर्ण व्हिडीओने परीक्षकांची मने जिंकली आणि त्यांना तालुका स्तरावर प्रथम क्रमांक तर जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळवून दिला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना ११ एप्रिल रोजी, भायखळा येथील पेन्ग्विन ऑडिटोरियममध्ये मोठ्या सन्मानाने ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या समारंभात मुंबईभरातील २१८ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला होता, मात्र रोम्युला यांचा पराक्रम विशेष ठरला. पश्चिम उपनगर अधीक्षक दीपिका पाटील यांच्या हस्ते झालेला हा सन्मान, केवळ वैयक्तिक यश नसून संपूर्ण शाळेसाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे - भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे:

* टिटवाळा स्टेशन: २५ कोटी रुपये

* शहाड स्टेशन: ८. ४ कोटी रुपये

* दिवा स्टेशन: ४५ कोटी रुपये

* बेलापूर स्टेशन: ३२ कोटी रुपये

याव्यतिरिक्त, कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे. या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

"१ लाख नसेल तर मरण पत्करा!" — मुंबईतील होली स्पिरिट हॉस्पिटलचा अमानुष निर्णय

संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी साप्ताहिक)

"पैशांअभावी उपचार नाकारले, जीव धोक्यात!" — होली स्पिरिट हॉस्पिटलवर गंभीर आरोप, हृदयविकारग्रस्त रुग्णाला प्रवेश नाकारल्याचा प्रकार

जोगेश्वरी/अंधेरी: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच, मुंबईतही पैशांअभावी उपचार नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्वेतील नामांकित होली स्पिरिट हॉस्पिटलने हृदयविकाराने त्रस्त असलेल्या एका रुग्णाला डिपॉझिट न दिल्यामुळे ऍडमिट करून घेण्यास नकार दिला. तब्बल दीड तास रुग्ण हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थ अवस्थेत बसून राहिला आणि अखेर महापालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.

जिवंत असतानाही हॉस्पिटलने पाठ फिरवली!
जोगेश्वरी पूर्वेतील दुर्गानगरमधील ५२ वर्षीय अमृतलाल सोनी यांना मंगळवारी रात्री अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने होली स्पिरिटमध्ये नेण्यात आले. मात्र हॉस्पिटलने तत्काळ १ लाख रुपयांचे डिपॉझिट भरण्याची अट घालून रुग्णाला ऍडमिट करण्यास स्पष्ट नकार दिला.

धर्मादाय हॉस्पिटलची अमानुष वागणूक!
होली स्पिरिट हॉस्पिटल हे धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत असूनही निर्धन व दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या बेड्सचा लाभ रुग्णाला मिळाला नाही. २५ हजार रुपये देण्याची विनंती केली असतानाही रुग्णालयाने हट्टाने नकार दिला, हे विशेष!

राजकीय हस्तक्षेप, तरीही उत्तर नाही!
अखेर नातेवाईकांनी सोनी यांना मध्यरात्री कूपर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळताच मनसेच्या जोगेश्वरी विभागाने रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. मात्र कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याचे मनसेचे सचिव नितीन गावडे यांनी सांगितले. त्यांनी याप्रकरणी धर्मादाय आयुक्त व आरोग्यमंत्री यांना पत्रव्यवहार करण्याची घोषणा केली आहे.

एक प्रश्न अनुत्तरित — धर्मादाय संस्थांचे ध्येय फक्त पैसा कमवणेच आहे का?
या प्रकारानंतर होली स्पिरिट हॉस्पिटलच्या प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. आता बघावे लागेल की प्रशासन जबाबदारी स्वीकारते की या प्रकरणातही एखाद्या जीवाच्या किंमतीवर गप्प राहते!

ह्या अमानुषतेला जबाबदार कोण?
रुग्णाच्या जीवावर बेतणाऱ्या 'पेहले पैसे, फिर उपचार' या मानसिकतेविरोधात आता आवाज उठवण्याची वेळ आली आहे.


प्रशासनाचा चांगल्या अनुभवाचा उपयोग कल्याण-डोंबिवली पालिकेत होईल - आयुक्त अभिनव गोयल

प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण : आरोग्य  व शिक्षण, विभागाची माला आवड असल्याने या विभागात विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे मत नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना हिंगोली जिल्हा अधिकारी पदी चांगले काम केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने माझी नियुक्ती कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त पदी केल्याचे समाधान नवीन आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केले.

माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासन लोकाभिमुख व्हावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याची मोहीम राबविण्यात येत असून, त्या धरतीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यात येणार असल्याचे मत महा पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी मांडले.

कल्याण डोंबिवली या शहरी भागात आपल्या क्षेत्राचे आव्हाने, त्याचे भविष्यातील नियोजन , आणि आपल्याकडे काय काय समस्या आहे, काय काय प्रश्न आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या विकास कामांचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यांना गती देण्याची आपल्याला गरज आहे, त्याच्यावर एकदा सविस्तर चर्चा करून आपल्याला त्या कामावर भर देण्यात येईल. कल्याण-डोंबिवली महापालिके च्या अनधिकृत ६४ बिल्डिंगचा प्रश्न न्याय प्रविष्ट असल्याने  आपल्याला योग्य वेळेची वाट पाहावी लागणार असल्याचे मत आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले, फूट पथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

रामनवमीला शिवसेनेचा ‘पॉवर शो’ – शाखा क्र. ७७ चं भव्य उद्घाटन!


संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, न्याय रणभूमी)

रामनवमीच्या दिवशी शिवसेनेचं संघटनबळ झळकलं! जोगेश्वरी पूर्वमध्ये शाखा क्रमांक ७७ चे कार्यालय उद्घाटन

जोगेश्वरी, ६ एप्रिल २०२५ — रामनवमीच्या दिवशी जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसेना शाखा क्रमांक ७७ च्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेतृत्त्वाखाली खासदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा आणि शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आला होता.

प्रभाग क्रमांक ७७ हा जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील एक महत्त्वाचा प्रभाग मानला जातो. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या भागात खासदार रविंद्र वायकर यांचे सक्रिय कार्य सुरू आहे. उद्घाटनप्रसंगी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना कार्यालयाचा वापर जनतेच्या सेवेसाठी आणि संपर्कासाठी करावा, असे आवाहन केले.

शाखाप्रमुख प्रकाश (बंड्या) शिंदे यांनी यावेळी सांगितले की, “शिवसेना पक्षाचे विचार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आणि खासदार रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहणार आहे. विधानसभेत मताधिक्य वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे.”

विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांनी आगामी महापालिका निवडणुकीत आठही प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.
त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांबाबत सुरू असलेल्या अपप्रचाराला उत्तर देत ते म्हणाले की, "विकास कामांबाबत कोणताही गैरसमज पसरवला जाणार नाही, आणि सत्य जनतेपुढे मांडले जाईल."

कार्यक्रमास विधानसभा मार्गदर्शक मनीषा वायकर, लोकसभा सहसंपर्कप्रमुख रचना सावंत, महिला विभाग प्रमुख प्रियांका आंबोळकर, तसेच शाखा संघटिका, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवासेना, व्यापारी आघाडी व इतर अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटनाचा हा सोहळा रामनवमीच्या दिवशी पार पडत असल्याने परिसरात एक उत्साही वातावरण निर्माण झाले होते. नव्याने सुरु झालेलं हे कार्यालय शिवसैनिकांसाठी नवे केंद्रबिंदू ठरणार आहे.