प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण : महापालिका आयुक्त यांचे दालनात आज सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची मॅरेथॉन मीटिंग घेण्यात आली. यात आरोग्य यंत्रणेत आमुलाग्र सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून निर्देश देण्यात आले. कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी देखील महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी संपूर्ण दिवसभर महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेतील सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेत आमुलाग्र सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व अधिकारी वर्गास निर्देश दिले. यावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर तसेच महापालिका मुख्यालय आणि मनपा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
शासनाने महापालिकेस ७५ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र (हेल्थ वेलनेस सेंटर्स) मंजूर केली आहेत. त्यापैकी २० महापालिका क्षेत्रात कार्यान्वित असून बारा आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. ही सर्व शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र चालू करण्याकरिता आयुक्तांनी खालील निर्देश दिले :
• आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या नियुक्त्या वेळेत पूर्ण कराव्यात.
• आरोग्यवर्धिनी केंद्राचे बांधकाम अपूर्ण असल्यास ते तात्काळ पूर्ण करून घेण्यात यावे.
• त्यासाठी शहर अभियंता कार्यालयासमवेत समन्वय बैठक आयोजित करण्यात यावी .
• आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपकरणांपैकी खरेदी न करण्यात आलेल्या उपकरणाची तात्काळ खरेदी करण्यात यावी.
• या आरोग्यवर्धिनी केंद्रांकरिता आवश्यक असलेले फर्निचर देखील तात्काळ खरेदी करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी.
• रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा .
• राज्य शासनाकडून रुग्णवाहिका खरेदीसाठी तांत्रिक मान्यता असल्यास तपासून घ्यावी.
•"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" सुरू करण्यासाठी शासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या संस्थेसोबत समन्वय साधून त्यांना सदर दवाखाना चालू करण्यामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी.
• शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथे रात्रीच्या वेळी स्त्री रोग तज्ञ व भुलतज्ञ यांची उपलब्धता होण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालयाशी यांच्याशी संपर्क साधावा.
• महापालिकेच्या सर्व रुग्णालयात त्यांच्या क्षेत्रातील हाय रिस्क गर्भवती माता यांची नावासहित यादी उपलब्ध असणे आवश्यक आहे ,अशी यादी महिन्याच्या प्रारंभी अद्ययावत करण्यात यावी .
• एनक्यूएएस च्या मानका नुसार महापालिका परिक्षेत्रातील १३ नागरी आरोग्य केंद्र व सर्व रुग्णालय अद्ययावत करण्यासाठी मुख्यालय स्तरावर पथक स्थापन करण्यात यावे.
• आयुष्यमान भारत च्या मार्गदर्शक सूचनानुसार रुग्णालयांमध्ये तसेच नागरी आरोग्य केंद्रामध्ये आयुष औषधांची उपलब्धता करून द्यावी.
• महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून आवश्यकता सुधारणा करून घ्याव्यात.
• महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सेवा चालू करण्यात याव्यात.
• बाहय संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले डॉक्टर्स उपलब्ध नसल्यास त्यांच्या सेवा समाप्त करणाऱ्या याव्यात.
• प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रा साठी उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांचा आढावा आयुक्त महोदयांना देण्यात यावा .
• बाई रुख्मिणी बाई रुग्णालयाकरिता डिजिटल एक्स-रे मशीन तसेच डेंटल एक्स-रे मशीन खरेदी करण्यात यावी.
• राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया रुग्णालयांमध्ये करण्यात याव्यात.
• वैद्यकीय आरोग्य विभागाकरिता मनुष्यबळ पुरवणाऱ्या बाह्य संस्थांनी पुरविलेल्या डॉक्टरांची वेगळी बैठक आयोजित करण्यात यावी.
• सर्व रुग्णालयांच्या संदर्भ सेवांचे ऑडिट करण्यात येऊन त्यांचा अहवाल त्वरित सादर करण्यात यावा, अशा अनेक सूचना या आढावा बैठकीत आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
• त्याचप्रमाणे आरोग्य सुविधांबाबत एक दिवसाआड सायंकाळी आयुक्त कार्यालयात आढावा घेतला जाईल असे निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले.