वैजापूर । बैलशर्यतीत दाखल गुन्ह्या संदर्भात माहिती विचारणाऱ्या पत्रकाराला पोलीस
निरीक्षकाने अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (ता. ६) रोजी घडली.
याविषयी केंद्रीय पत्रकार संघ औरंगाबाद ग्रामीणच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस
अधिकारी कैलास प्रजापती यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. तीन दिवसांत त्या
अधिकाऱ्यांने माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा यावेळी देण्यात आला
आहे. वैजापूर पोलीस ठाणे हद्दीतील पालखेड या गावात भरलेल्या यात्रेत गावकऱ्यांनी
बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्यास सध्याच्या कायद्यानुसार बंदी असल्याने
वैजापूर पोलिसांनी गावातील पाच ते दहा व्यक्तीवर गुन्हे दाखल केले. सदर आयोजन
संपूर्ण गावकऱ्यांनी केले असल्याने आपण विशिष्ट लोकांवरच का गुन्हे दाखल केले अशी
विचारणा मोबाईलवरून संपर्क साधून प्रवीण भडाईत या स्थानिक पत्रकाराने केली. यावेळी
तू कोण विचारणारा म्हणत शिवीगाळ करून पोलीस निरीक्षक साम्राटसिंग राजपूत यांनी
भडाईत यांचा अवमान केला. ग्रामीण पत्रकाराला हीन वागणूक देऊन त्यांचा अवमान केल्या
प्रकरणी केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर, राष्ट्रीय
उपाध्यक्ष कमलेश गायकवाड आणि राज्य सचिव राजू दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली
औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय पगारे आणि शिष्टमंडळाने पत्रकाराचा अवमान
केल्या प्रकरणी दखल घेत पोनी राजपूत यांचा निषेध नोंदवत मंगळवारी (ता. ७ ) रोजी
वैजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांची भेट घेत राजपूत
यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला. अशी भाषा ग्रामीण पत्रकार सहन करणार नाही,
तीन दिवसांत पोनी राजपूत यांनी पत्रकार भडाईत यांची जाहीरपणे लेखी माफी मागावी
अन्यथा दहा तारखेनंतर या विरोधात राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा देत निवेदन देण्यात
आले. राजपूत यांनी पत्रकाराला दिलेली वर्तणूक चूकीची असून आम्ही याचे समर्थन करणार
नाही व या बाबत त्यांना लेखी खुलासा मागवू असे आश्वासन यावेळी उपविभागीय पोलीस
अधिकारी कैलास प्रजापती यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आबासाहेब
कसबे, ग्रामीण कार्याध्यक्ष प्रवीण भडाईत उपाध्यक्ष प्रा. सचिन कुमावत, कोषाध्यक्ष
सुधीर बागुल, तालुका कार्याध्यक्ष सिद्धनाथ देवकर, तालुका समनव्यक आकाश पगारे
उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा