BREAKING NEWS
latest

भारत जोडो, पदयात्रा नसून एक जनचळवळ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुनियोजित असलेली 'भारत जोडो यात्रा' सध्या महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. राज्यात या यात्रेचा महाराष्ट्रातून प्रवासाला प्रारंभ मराठवाडा विभागातून सुरु झाला असून देगलूर येथून सुरु झालेली ही यात्रा सध्या नांदेडला पोहोचली आहे. यात्रेदरम्यान एक दिवसाची विश्रांती घेताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नांदेड मधील ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नुकतीच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. प्रसंगी, बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजराती नेत्यांचे धनाजी आणि संताजी आहे.

“राहुल गांधी यांना यात्रेदरम्यान अनेक लोक येऊन भेटत आहे ज्यांचा प्रत्यक्षपणे राजकारणाशी काडीमात्र संबंध नाही तरीही त्यांच्या भावना सरकारबाबत तीव्र आहे. या सर्व बाबींचा विचार करता देशात किती अत्याचारी सरकार अस्तित्वात आहे या बाबीची कल्पना येते”, असे पटोले म्हणाले. पुढे बोलताना पटोले म्हणाले, खुद्द माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन 'भारत जोडो' यात्रेचे कौतुक करत आहे, त्यामुळे ही पदयात्रा नसून एक जनचळवळ बनली आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केले.

  येत्या काही दिवसांत ही पदयात्रा शेगांव येथून प्रवास करणार आहे त्यावेळी शेगांवला होणारी सभा महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे चित्र पालटवेल असा आशावाद यावेळी नाना पटोलेंनी व्यक्त केला. यावेळी नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना बंगाल येथील निवडणुकीचा दाखला दिला, याप्रसंगी दाढी वाढविणे हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. राहुल गांधी यांना वेळ मिळत नसल्याने ते दाढी करत नाही, मात्र देशाच्या पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या वेळी रवींद्रनाथ टागोर सारखी दाढी वाढवली  होती, परंतू तिथे हरल्यावर पुन्हा जुन्या शेपमध्ये दाढी आणली. अरुणाचल प्रदेश मध्ये चीनने काही गावे बळकावली असून सरकारी संपत्ती विकल्याने मोदी रोज अडीच किलो शिव्या खातात, अशा कठोर शब्दात टीका पटोलेंकडून करण्यात आली.

  एकंदरीतच 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने विरोधक राज्य सरकार आणि केंद्र सरकारला धारेवर धरण्यात कुठलीही कसर सोडताना दिसत नाही आहे. लवकरच ही यात्रा विदर्भात येणार असून यावेळी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विदर्भातील असल्याने ते काय मत मांडतात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे, विदर्भात या यात्रेला आणखी प्रतिसाद मिळण्याचा अंदाज बोलला जात आहे.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत