महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला खो-खो स्पर्धेत विजयी सलामी देताना डावाने विजय मिळवले.
भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सुरू झाली. आज झालेल्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राचे दोन्ही सामने मॅटवर झाले.
पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने मध्यप्रदेशवर २०-८ असा डावाने विजय मिळविला. यात सुयश गरगटे २:२० मिनिटे संरक्षण व ५ गुण मिळवत अष्टपैलू खेळी केली. रामजी कश्यपने ३:२० मिनिटे संरक्षण करताना महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे सांभाळली. निहार दुबळेने आपल्या धारदार आक्रमणात ४ गुण मिळवले. मध्यप्रदेश कडून विवेक यादव व सागर यांनी प्रत्येकी २-२ गुण मिळवत एकाकी लढत दिली.
महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने तेलंगणाचा १९-६ असा डावाने धुवा उडवला. महाराष्ट्राच्या प्रियांका इंगळेने तेलंगणा विरुद्ध ७ गुण मिळवताना विजयाची पायाभरणी केली. रेश्मा राठोडने (२:१० मि. संरक्षण व ४ गुण) अष्टपैलू खेळ केला तर रूपाली बडे व दिपाली राठोड (प्रत्येकी २:५० मि. संरक्षण) व अपेक्षा सुतार (२:४० मि. संरक्षण) यांनी महाराष्ट्राला मोठा विजय मिळेल याची काळजी घेतली. तेलंगणाच्या कृष्णम्माने दिलेली अष्टपैलू लढत अपुरी पडली.
कोल्हापूर व गतविजेत्या रेल्वेचे शानदार विजय
अन्य एका मराठी खेळाडूंचा भरणा असलेल्या पुरुषांच्या सामन्यात गतविजेत्या रेल्वेने मणिपूरला १३-११ असे डावाने पराभूत केले.
कोल्हापूरच्या पुरुष संघाने सुद्धा उत्तर प्रदेशवर १५-१० असा डावाने विजय मिळविला. कोल्हापूरच्या आदर्श मोहितेने आपल्या धारदार आक्रमणात आठ गुण मिळवत १:३० मिनिटे सरक्षणाची खेळी केली, अविनाश देसाईने (२:१० मि. संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळी केली. रामेश्वर यादवने १ मि. संरक्षण करताना २ गुण मिळवले.
अन्य निकाल : महिला
तामिळनाडू वि.वि. पुदूचेरी १३-५, पश्चिम बंगाल वि.वि. झारखंड १८-८ डावाने, गुजरात वि.वि. मध्यभारत १०-५ डावाने, केरळ वि. वि. दादरा नगर हवेली २६-१ डावाने, मणिपूर वि.वि. इंडियन तीबेट बॉर्डर पोलीस १०-७ डावाने, भारतीय विमान प्राधिकरण वि.वि.मध्य प्रदेश १७-१४, कर्नाटक वि.वि. छत्तीसगड ११-५ डावाने, हरियाणा वि.वि. हिमाचल प्रदेश २४-४ डावाने.
अन्य निकाल : पुरुष
कर्नाटक वि.वि. झारखंड १२-७ डावाने, दादरा नगर हवेली वि.वि.अरुणाचल प्रदेश १७-१४, जम्मू काश्मीर वि.वि. इंडियन तीबेट बॉर्डर पोलीस २५-७ डावाने, तेलंगणा वि.वि. गोवा १७-८ डावाने, तामिळनाडू वि.वि. पंजाब १५-१३ डावाने, आंध्र प्रदेश वि.वि. राजस्थान १२-११ (७.२० मिनिटे राखून), ओरिसा वि.वि. सीमा सुरक्षा बल १३-१२ (६.३० मिनिटे राखून).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा