BREAKING NEWS
latest

ट्विटर 'ब्लू टिक' साठी भारतात पैसे मोजावे लागणार..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  ट्विटरची मालकी टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते सातत्याने नवनवीन बदल करत आहेत. ट्विटरला विकत घेण्याचे एलॉन मस्क यांचे स्वप्न पूर्ण झाल्याने ते आता नवीन बाबींना लागू करत ट्विटरला एक आगळेवेगळे स्वरूप देण्याकरिता प्रयत्नशील दिसून येत आहे. ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आल्यावर सर्वप्रथम त्यांनी अनेक जुन्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली होती. नव्याने ट्विटर करिता घेण्यात आलेल्या निर्णयामध्ये 'ट्विटर ब्लू' पेड सब्स्क्रिप्शन चा समावेश आहे. त्यामुळे ट्विटरवर ब्लू टिक साठी शुल्क आकारणी केली जाणार असून सुरुवातीला विविध देशात ब्लू टिक साठी वेगवेगळे शुल्क आकारण्यात येईल असे कळविण्यात आले होते.

  नव्याने ट्विटर ब्लू टिक साठी ट्विटरकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत माहिती पुढे आली असून भारतात ट्विटरवर ब्लू टिक करीत मासिक ७१९ रुपये इतकी शुल्क आकारणी केली जाणार असल्याचे समजते. हे एक पेड सबस्क्रिप्शन राहणार असून यामध्ये काही नवीन सेवावैशिष्ट्यांचा देखील लाभ वापरकर्त्यांना मिळणार आहे. भारतात सुरुवातीला असा अंदाज लावण्यात येत होता की 'ब्लू टिक' साठी मासिक ६६० रुपये मोजावे लागतील परंतू नव्याने पुढे आलेल्या माहितीमुळे या तर्कांना पूर्णविराम लागला आहे.

  भारतात पुढील एक महिन्याच्या कालावधीत 'ट्विटर ब्लू' पेड सब्स्क्रिप्शन सुरु केले जाणार असल्याची माहिती ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी दिली होती परंतू सध्या काही जणांना 'ब्लू टिक' ऍक्सेस मिळत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यामुळे नवीन कुठल्या सेवा वैशिष्ट्यांचा अंतर्भाव ट्विटर मध्ये होणार याबाबतीत वापरकर्त्यांना उत्सुकता लागलेली आहे.

  सध्या जरी ट्विटरने भारतात ७१९ रुपये इतक्या शुल्काची घोषणा केले असले तरी भविष्यात याबाबतीत काही बदल देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अनेक जणांनी भारतात 'ब्लू टिक' साठी आकारण्यात येणारी रक्कम अधिक असल्याचे मत व्यक्त केले आहे. प्रीमियम सेवा वैशिष्ट्यांमध्ये मोठ्या साईझचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा देण्यात येणार आहे, असे प्रथमदर्शी सांगण्यात आले होते.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत