प्रतिनिधी: अवधुत सावंत
योग गुरू बाबा रामदेव यांचा नुकताच ठाण्यात योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात महिलांबाबत विधान करताना रामदेव बाबांचा तोल सुटला व त्यांनी महिलांवर वादग्रस्त विधान केले होते, दरम्यान रामदेव बाबांच्या या विधानाने विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून रुपाली ठोंबरे यांच्यानंतर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी रामदेव बाबांबद्दल खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल चुकीचे विधान करतात, राज्यपाल वादग्रस्त विधान करतात आणि रामदेव बाबा महिलांच्या बाबतीत लज्जास्पद भाष्य करतात, असे असताना सरकार गप्प का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, रामदेव बाबांच्या योग कार्यक्रमाला खुद्द मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित होत्या, मात्र महिलांबाबत रामदेव बाबा लज्जास्पद बोलल्यावर देखील त्या गप्प का बसल्या. त्यांनी सणसणीत कानाखाली द्यायला हवी होती. या सरकारने जीभ गहाण ठेवली आहे का?असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांच्या बुलढाणा येथे आज होणाऱ्या शेतकरी मेळाव्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या भेटीला जात आहे, ठाकरे गट हीच खरी शिवसेना व सरकार आहे, त्यामुळे आजची उद्धव ठाकरेंची भेट ऐतिहासिक होईल, असा विश्वास यावेळी राऊतांनी व्यक्त केला. रामदेव बाबा यांनी ठाण्यातील कार्यक्रमात महिलांच्या बाबतीत विधान करताना म्हटले होते की, महिला या साडीमध्ये चांगच्या दिसतात, सलवार सूटमध्ये देखील चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, नेमक्या याच वक्तव्याने सध्या वाद सर्वत्र पेटलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा