प्रतिनिधी: अवधुत सावंत
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.
अमरावती येथील फार्मसी महाविद्यालयातील हा विद्यार्थी असून त्यांने हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्थेथॉस्कोपसारखे साधन तयार केले असून, या शोधाबद्दल त्याला राज्यस्तरावरील एक लक्ष रूपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक पुरस्कार कुशकुमार यांना प्रदान करण्यात आला. नावीन्यपूर्ण शोधाबाबत राज्यस्तरावर २१ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. त्यात कुशकुमार याला 'आरोग्य हेल्थकेअर सेक्टर' मध्ये प्रथम पुरस्कार देवून राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
कुशकुमार ठाकरे हा अमरावतीच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने ‘पर-क्ल्यू’ हे
स्थेथॉस्कोपचे काम करणारे साधन निर्माण केले आहे. या संशोधनाला कुशकुमार याचा वर्गमित्र असलेल्या मनीष पुथरन यांचे मोलाचे सहकार्य व शिक्षिका डॉ. शारदा देवरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
ज्याप्रमाणे घरच्या घरी शर्करापातळी मोजण्यासाठी ग्लुकोमीटरचा वापर होतो, त्याचप्रमाणे ‘पर-क्ल्यू’ (परफेक्ट क्ल्यू) हे साधन वापरून हृदयाचे ठोके मोजण्याबरोबरच हृदयविकाराची पूर्वकल्पनाही मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचार घेता येतील. या साधनात रक्तदाबाची दैनंदिन नोंद होऊन त्याचा महिनाभराचा डेटाही सेव्ह व्हावा, यादृष्टीने आम्ही ते अधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुशकुमार आणि मनीष यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाताना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.
मोदी सरकार स्टार्टअप सारखे उपक्रम राबवून नवनवीन संशोधनाला प्राधान्य देत असल्याने विद्यार्थी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर देत असल्याचे गवरमेन्ट फार्मसी कॉलेजच्या शिक्षिका डॉ.शारदा देवरे यांनी सांगितले. अमरावतीच्या या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे उपकरण भविष्य काळात निश्चितच समाजोपयोगी ठरेल असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा