BREAKING NEWS
latest

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी १३ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या अनिल देशमुखांना जामीन मंजूर..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कथित १०० कोटी वसुली प्रकरणी मागील १३ महिन्यांपासून तुरुंगात होते. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून अनिल देशमुख प्रयत्न करत होते, मात्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल राखून ठेवल्याने देशमुखांच्या जामिनावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले होते. नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांना काही अटीशर्तींसह १ लाख रुपये इतक्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

  मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांनी जबरदस्तीने १०० कोटी इतकी वसुली करण्याचे आदेश पोलीसांना दिल्याचे प्रकरण प्रकाशझोतात आले होते. याप्रकरणी 'ईडी' व 'सीबीआय'ने खंडणी व आर्थिक गैरव्यवहार असे गंभीर आरोप अनिल देशमुखांवर ठेवले होते. हे सर्व आरोप राजकीय आकसापोटी होत असल्याचे मत अनिल देशमुखांनी व्यक्त केले होते, त्यामुळे १३ महिन्यांपासून याप्रकरणी तपासणी व सुनावणीचे सत्र सुरु होते. दरम्यानच्या काळात अनिल देशमुखांचे प्रकृतिस्वास्थ देखील खालावले होते.

  अखेर न्यायालयाने अनिल देशमुखांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. वाढते वय, आजार इत्यादी कारणे अनिल देशमुखांनी जामीन अर्जात नमूद केले होते, या सर्व बाबींचा विचार करत न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. देशमुखांना जामीन मंजूर होताच त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत