BREAKING NEWS
latest

समृद्धी महामार्ग लोकार्पण कार्यक्रमावरून प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानांवर शरसंधान..


 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  महाराष्ट्राच्या दूरगामी विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या समृद्दी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील कार्य जवळपास पूर्णत्वास गेले आहे, लवकरच हा मार्ग जनतेच्या सेवेत खुला करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  महामार्गाचे लोकार्पण केले आहे. नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा बघता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याला निमित्त ठेवून पंतप्रधानांवर टीकेची तोफ डागली आहे. मराठवाडा साहित्य संमेलनाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती, यावेळी बोलताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मुद्दा उपस्थित करताना उद्धव ठाकरेंनी काही प्रश्न नरेंद्र मोदी यांना विचारले आहेत.

  यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र प्रकरणी महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहे, याबाबतीत अगोदर स्पष्टीकरण द्यावे, नंतरच शिवसेनाप्रमुखांच्या नावाच्या महामार्गाचे लोकार्पण करावे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जी अरेरावी सीमावादावर लावली आहे, त्यावर पंतप्रधानांनी सणकून बोलले पाहिजे. सध्या महाराष्ट्र, पंतप्रधानांच्या भूमिकेची या प्रश्नी वाट बघत आहे, असे देखील ठाकरे म्हणाले.

  महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने समृद्धी महामार्ग हा सुरु झालाच पाहिजे, राज्याच्या राजधानी आणि उपराजधानीला जोडणाऱ्या महामार्गाचे कार्य आमच्या शासनकाळात अधिक झाले, असे देखील नमूद करायला यावेळी उद्धव ठाकरे विसरले नाही. एकीकडे राज्यातील मोठ्या महामार्गाचे लोकार्पण करायचे आणि दुसरीकडे कर्नाटकाने महाराष्ट्राचा मार्ग बंद करण्याचे कार्य सुरु केले आहे, त्यामुळे या प्रश्नावर पंतप्रधानांनी आपले मत ठेवणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

  सीमावाद प्रकरणी खुद्द शिवसेनाप्रमुख तीन महिने कारावास भोगून आले होते, त्यामुळे त्यांच्या नावाच्या महामार्गाचे लोकार्पण होताना सीमाप्रश्नी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट होणे गरजेचे असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. एकदंरीतच उद्धव ठाकरेंनी उदयाला होणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचे संपूर्ण प्रयत्न केल्याचे त्यांच्या या विधानातून दिसून आले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत