प्रतिनिधी: अवधुत सावंत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या त्यांच्या निवासस्थानी वारंवार धमकीचे फोन करणाऱ्या एका व्यक्तीला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. शरद पवार यांना का धमकी दिली, पोलिसांनी आरोपीची खडसावून चौकशी केली असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
पोलीसांनी सांगितले की, आरोपी शरद पवार यांच्यावर रागावला होता कारण त्याची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत पळून गेली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी कोणतीही कारवाई केली नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा बिहारमधून अटक करण्यात आलेल्या ४६ वर्षीय नारायण सोनी याची पत्नी पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासोबत पळून गेल्याने संतापला होता. तसेच शरद पवार यांनी या कामात हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे शरद पवारांना धमकी दिली असल्याचं त्यानं सांगितलं आहे.
त्यानंतर आरोपी नारायण सोनी याला बुधवारी मुंबईत आणून न्यायालयात हजर केले असता, तेथून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या तीन-चार महिन्यांपासून आरोपी नारायण सोनी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाला स्वतः नावाने फोन करत होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने अपशब्द वापरले आणि काही प्रसंगी ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबलला ‘मुंबई आके देसी कट्टे से उडा दूंगा’ असे सांगितले. पोलीसांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून त्याला ओळखले आणि इशारा दिला. परंतु असे असूनही, आरोपीने फोन करणे सुरूच ठेवले, त्यामुळे सोमवारी भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ आणि ५०६-२ यासह संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा