BREAKING NEWS
latest

'निर्धार-एक हात आपुलकीचा' संस्थेचा उत्कृष्ट उपक्रम; नामवंत कलावंतांची हजेरी

जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथील अरविंद गंडभीर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या "निर्धार-एक हात आपुलकीचा" या सामाजिक संस्थेने अरविंद गंडभीर हायस्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

दर सहा महिन्यांनी निर्धारतर्फे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून व्यायामक्षेत्रात तसेच राज्यस्तरीय आणि देशव्यापी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये विशेष नावलौकिक मिळवलेले जोगेश्वरी येथील ज्येष्ठ रहिवासी - जोगेश्वरी भूषण लक्ष्मण बोवलेकर तसेच मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांची उपस्थिती लाभली होती.

सकाळी ९ वाजता या दोन्ही पाहुण्यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लक्ष्मण बोवलेकर आणि सुनिल तावडे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना रक्तदानाचे आणि उत्तम सुदृढ आरोग्याचे महत्व अधोरेखित केले.
त्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर, तसेच माजी रणजी क्रिकेट खेळाडू सुलक्षण कुलकर्णी, याांनी या शिबिराला उपस्थिती लावली व रक्तदान ही केले.

त्यानंतर रक्तदात्यांचा ओघ शिबिराकडे वाढू लागला. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात एकूण १२५ इच्छुकांनी आपली नावे नोंदवली. त्यापैकी काहींना आरोग्याच्या कारणामुळे रक्तदान करता आले नाही.
एकूण ११४ रक्तदात्यांनी आपले रक्तदानाचे कर्तव्य पार पाडले. म्हणजे यावेळी निर्धारतर्फे आजपर्यंतचा रक्तदात्यांचा सर्वाधिक आकडा गाठून एक नवा विक्रम प्रस्थापित केला गेला. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे १८ ते ३० वर्षे वयोगटातील तरुण रक्तदात्यांचा सहभाग अधिक होता. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक रक्तदात्याला एस.आर.व्ही हॉस्पीटल तर्फे मोफत आरोग्य चिकित्साही उपलब्ध करून देण्यात आली.
यामध्ये रक्तदाब, मधुमेह चाचणी, डोळे, वजन, उंची, ह्या सगळ्या चाचण्या मोफत करून दिल्या जात होत्या.
हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यात "निर्धार-एक हात आपुलकीचा" या समाजसेवी संस्थेचे सर्व कार्यकर्ते, जे.इ.एस महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विद्यार्थी, मातोश्री मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे तसेच एस.आर.व्ही हॉस्पिटलचे सर्व प्रतिनिधी यांनी मोलाचा हातभार लावला. शिबिराच्या समारोपाला प्रायोजक, निर्धार चे हितचिंतक, जे.इ.एस चे विश्वस्त आणि एन.एस.एस. युनिट चे विद्यार्थी आणि रक्तदाते यांचे निर्धारतर्फे आभार मानण्यात आले.
« PREV
NEXT »

1 टिप्पणी