महाराष्ट्र-कर्नाटक दरम्यान सीमावाद चांगलाच शिगेला पोहचला असून सातत्याने कर्नाटकधार्जिण्या संघटना महाराष्ट्रविरोधात आक्रमक कारवाया करताना दिसून येत आहे. यापूर्वी कर्नाटकातील 'कन्नड रक्षण वेदिका' संघटनेकडून महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. आता अक्षरशः प्रकरणाला हिंसक वळण लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 'कन्नड रक्षण वेदिका' संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला असून, यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे सीमेवरील गावातील मराठी भाषिक देखील आक्रमक होताना दिसत आहे, त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असे चित्र दिसत आहे.
सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरण न्यायालयात पोहोचले असून यावर निर्णय येणे बाकी असताना कर्नाटकातील संघटना कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवत असल्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करत या सर्व कार्यकर्त्यांना समज देण्याची गरज आहे. 'कन्नड वेदिका रक्षण' समितीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच गदग येथे महाराष्ट्र विरोधी घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केल्याने या भागातील मराठी भाषिकांचा असंतोष उफाळून येण्याची स्थिती आहे, त्यामुळे इथे हिंसक प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता केंद्रीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमावाद प्रकरणाला संसदेत उपस्थित करून कर्नाटक सरकारच्या धोरणावर आक्षेप घेतला होता, प्रसंगी दोन्ही राज्यात भाजप सत्तेत असताना वाद निर्माण होण्यावर देखील प्रश्न उपस्थित केले होते, मात्र केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय हे प्रकरण निवळणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकातील संघटनांची मजल इतकी वाढली की, महाराष्ट्रातून कर्नाटक मध्ये गेलेल्या वाहनांवर चढून निदर्शने करण्यात आली सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्याचा प्रकार घडला, त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण शांततेने व सामोपचाराने सोडविणे आवश्यक आहे. कारण अशीच निदर्शने महाराष्ट्रातून सुरु झाल्यास हे प्रकरण आणखी चिघळणार यात काहीच शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा