गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अभिनंदन केलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय नोंदवला आहे. या विजयासह गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपाचं सरकार येणार असल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, गुजरातमधील भाजपाच्या विजयानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचं अभिनंदन केलं आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
गुजरातमध्ये भाजपाने मिळवलेला विजय विक्रमी आणि ऐतिहासिक असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. “गुजरात निवडणूक पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती. त्यामुळे जनतेनं भाजपाला भरघोस मतदान केलं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या उद्योगांवरून मोदींना टोलाही लगावला. “गुजरातमधील विजयात महाराष्ट्रातून पळवलेले मोठे उद्योगही फळले असावेत, असे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ तारखेला महाराष्ट्रात येत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते इथेही भरघोस घोषणा करतील अशी अपेक्षा” असे ते म्हणाले. “आप पक्षाने गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी करुन भाजपाचा फायदा घडवून आणला हे स्पष्ट आहे. ज्यांचं त्यांचं राजकारण सोयीनुसार चालत असतं”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा