नववर्ष २०२३ स्वागताचा पूर्वसंध्येला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून राबवल्या जाणाऱ्या 'द' दारूचा नव्हे तर 'द' दुधाचा या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देताना डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश गीत्ते यांनी नागरिकांना वरील आव्हान केले. दारू पिऊन अथवा कुठलीही नशा करून नववर्षाचे स्वागत करून नका. कुठलंही व्यसन करून वाहने चालवू नका, यात तुमच्याच जिविताला धोका संभवतो. 'ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह' विरुद्ध ची कारवाई वाहतूक पोलीसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठीच करावी लागते, अशावेळी वाहतूक विभागावर प्रचंड ताण पडतो, अशी चिंता त्यांनी बोलताना व्यक्त केली.
शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकरांच्या पुरोगामी विचारांच्या संकल्पनेतून राबवला जात असलेल्या 'द' दारूचा नव्हे 'द' दुधाचा' अश्या व्यसन विरोधी उपक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमाला डोंबिवलीतील नागरिकांनी प्रचंड व मोठ्या उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद दिला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या या उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री.रोहित सामंत यांनी विशेष पुढाकार घेतला. दूध वाटून, व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करित नववर्षाचे स्वागत करतानाच स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित श्री दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेली छोटी पुस्तिका युवकांना भेट देण्यात आल्या.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सीपीआय, काँग्रेस यांच्यासह विविध संस्था आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून या व्यसनविरोधी उपक्रमाला पाठिंबा दिला.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले, महाराष्ट्राचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रा. प्रवीण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस चे डोंबिवली विधानसभा कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक श्री. नंदकुमार धुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. सुशील सामंत, सीपीआयचे कॉम्रेड अरुण वेळासकर, अंनिस ठाणे शाखेचे विजय मोहिते, डोंबिवली शाखेचे नितीन सेठ, उदय देशमुख, संध्या देशमुख , शशिकांत म्हात्रे, निमेश पाटील, विद्याधर राणे, एलन क्लासचे चीफ श्री गणेश देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील फलदेसाई, मंगेश जाधव इत्यादी सहकाऱ्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शवून सर्व नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
डोंबिवली स्टेशन जवळील राजाजी पथ येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान आयोजित केल्या गेलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे युवकांनी आणि स्त्रियांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून अशा उपक्रमाची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. दुधाचा ग्लास देवून, नववर्षाच्या शुभेच्छा देतानाच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अशा स्तुत्य उपक्रमांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. प्रवीण देशमुख यांनी समस्त नागरिकांना केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा