प्रतिनिधी: अवधुत सावंत
पतीला सोडून प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला उल्हासनगर हिल लाईन पोलिसांकडून दीड महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा परिसरातील एका चाळीत घडली. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिला ज्या व्यक्ती सोबत राहत होती, त्यानेच तिची हत्या करून पळ काढल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध पोलीसांनी सुरु केला असता, दीड महिन्यानंतर पोलीसांना आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. वैभव देवकाते असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मीबाई मनोहर तायडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.
शेजाऱ्यांना आढळून आला मृतदेह
मृत महिला दोन महिन्यापूर्वी आरोपी प्रियकर वैभव सोबत अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा भागातील साईबाबा चाळीतील भाड्याच्या घरात राहण्यास आली होती. ती मूळची अकोला जिल्ह्यातील पिंपळखुंटे गावात राहणारी होती. त्यातच मृतक महिला लक्ष्मीबाई मनोहर तायडे आरोपी वैभवकडे सतत लग्नाचा तगादा लावत होती. यामुळे दोघांमध्ये वादही होत होते. असाच वाद ७ नोव्हेंबर रोजी झाला होता. त्याच पहाटेच्या सुमारास तिची चाकूने गळा चिरून घरताच निर्घृण हत्या केली गेली. सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तिचा मृतदेह ती राहत असलेल्या घरात शेजाऱ्यांना आढळून आला. मात्र तिच्यासोबत रहाणारा वैभव पसार झाला होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा