BREAKING NEWS
latest

डोंबिवली वाहतूक शाखेतर्फे ३३ वे रस्ता सुरक्षा अभियान संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  रविवार दिनांक १५.०१.२०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता डोंबिवली वाहतूक विभाग, 'डोंबिवली एनफिल्ड क्लब' व 'डोंबिवली रायडर्स क्लब' यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक जनजागृती करिता डोंबिवली वाहतूक विभाग येथून डोंबिवली पश्चिम, ठाकुर्ली ब्रिज, फडके रोड, टिळक चौक, घरडा सर्कल अशी बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये ५० बाईक रायडर्स यांनी सहभाग घेतला.
. याच वेळी म्हसोबा चौक, डोंबिवली पूर्व येथे हिरकणी प्रतिष्ठान, डोंबिवली यांच्या वतीने म्हसोबा चौक ते घरडा सर्कल अशी सायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये २०-३० महिलांनी सहभाग घेतला. घरडा सर्कल येथे 'आर्मी डे' निमित्ताने सर्वांनी शहिद कॅप्टन विनयकुमार सच्चान यांच्या स्मारकास आदरंजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी वेदांत कुलकर्णी याने केले. यावेळी प्रमुख अतिथी श्री. विवेक पंडीत, विद्यानिकेतन शाळा यांनी 'आर्मी डे' चे महत्व पटवून देत सर्वांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. तर प्रसिद्ध लेखक श्री. दुर्गेश परुळेकर यांनी 'डोंबिवली सारख्या सुसंस्कृत नगरीमध्ये सर्वांनी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळायला हवेत' असे आवाहन केले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सचिव श्री. संजय जाधव यांनी अत्यंत चांगला उपक्रम राबविल्याबद्दल डोंबिवली वाहतूक विभागाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या व सर्व नागरिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. काही दिवसापूर्वीच ठाणे कल्याण अंबरनाथ येथील भाविकांचा शिर्डी येथे जाताना सिन्नर ला अपघात घडल्याच्या दुःखद घटनेची आठवण करून देत वाहतुकीचे नियम आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.

  रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत ११ जानेवारी ते १७ जानेवारी दरम्यान वाहतूक जनजागृती करिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून यामध्ये वाहतूक पोलीस व वाहनचालक यांचे आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर, पथनाट्य, शाळा-महाविद्यालयामध्ये वाहतूक नियमांची जनजागृती केली असून आज बाईक व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (डोंबिवली वाहतूक उपविभाग) यांनी यावेळी सांगितले. केवळ  पोलीस समोर आहेत म्हणून नाही तर स्वतःच्या व कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी रोटरी क्लब डोंबिवली सनसिटी, रोटरी क्लब डोंबिवली इस्ट, वेस्टचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट बँड वादन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुप्रिया कुलकर्णी यांनी केले.
« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत