भांडुप संकुलातील जलाशयाचे काम पुर्ण; मध्यरात्रीपासून पाणी पुरवठा होणार सुरळीत
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास पर्यायी ४००० मिमी व्यासाची जलवाहिनी जोडणे, तसेच २४०० व १२०० मिमी व्यासाच्या झडपा बसविणे, गळती दुरुस्ती करणे व भांडूप संकुलातील ८ कामांसह पश्चिम उपनगर व शहर विभाग मिळून ३० कामे अशी तब्बल ३८ कामे एकाच वेळी महापालिकेच्या जलअभियंता विभागाने पुर्ण केली असून मंगळवारी मध्यरात्रीपासून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला. या कामासाठी महापालिका प्रशासनाने ३१ जानेवारी रोजी उपनगरांत एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
या सर्व कामांसाठी भांडुप संकुल येथील १,९१० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र सुमारे ४२ वर्षानंतर प्रथमच २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ही सर्व कामे पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी समन्वयाने सर्व कामे पूर्ण करताना, तांत्रिक अडचणी देखील यशस्वीरितीने सोडवल्या.
जलबोगदा बंद करणे, पाणी उपसून बाहेर काढणे, झडपा बसवणे, छेद जोडण्या करणे, कामे पूर्ण करुन पुन्हा वाहिन्यांमध्ये पाणी सोडून योग्य दाबासह यंत्रणा सुरळीत झाल्याची खात्री करणे, ही आव्हानात्मक कामे जलअभियंता खात्याने यशस्वीरित्या पूर्णत्वास नेली.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी भांडूप संकुलास भेट देवून तेथील सर्व कामांची बारकाईने पाहणी केली. तसेच आव्हानात्मक कामे अभियांत्रिकी व तांत्रिकी कौशल्यासह वेळेत पूर्ण केल्याबद्दल जलअभियंता खात्याचे अभिनंदनही केले. यावेळी उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे व सहकारी उपस्थित होते.
धन्यवाद,
संदिप कसालकर
पत्रकार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा