अडीच वर्ष राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं त्याला चालना देण्याचं काम आम्ही केलं आहे, आज सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत, अनेक सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. अडीच वर्षात आघाडी सरकारने एकही मान्यता दिली नव्हती असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले, ते विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत होते.
ठाकरे शिवसेना गटाचा समाचार घेताना ते म्हणाले की बाळासाहेबांच्या विचारा सोबतच प्रबोधनकरांच्या विचारांना ही तिलांजली दिली, आम्हाला अनेक प्रकारे हिणवलं गेलं, मात्र बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली कामं करतो म्हणूनच गोविंद बागेत न जाता रेशीम बागेत गेलो असे सांगत ज्यांना अंडी पिल्ली माहीत आहेत त्यांना हिम्मत दाखवण्याची भाषा केली जात आहे अशी टीका त्यांनी केली. आम्ही कोरोनात पीपीई कीट घालून रुग्णालयात फिरलो, पूर्वी लाठ्या काठ्या खाल्ल्या, आम्हाला आव्हान देऊ नका, तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या लालसेसाठी शिवसेना प्रमुखांना तुरुंगात टाकणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, ही तर हिऱ्यापोटी निपजलेली गारगोटी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाल वीर दिवस साजरा करायला गेलो तर टीका केली, हा शीख धर्मीयांचा आणि बलिदान करणाऱ्यांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कायम वंदनीयच आहेत आणि राहणार, मात्र त्यांच्या वारसांकडे पुरावे कोणी मागितले, छत्रपती संभाजीराजे यांच्या कडे उमेदवारी साठी प्रतिज्ञापत्र कोणी मागितले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान कोण करतो, याबद्दल का बोलत नाही असे खडा सवाल त्यांनी केला.
महात्मा फुले दाम्पत्याचे तैलचित्र आम्हीच मंत्रालयात लावले, त्यांचे राष्ट्रीय स्मारक भिडे वाड्यात करण्याचे काम सुरू आहे, बाळासाहेबांचे तैलचित्र विधिमंडळात लावले, वडुजला छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक करू, प्रताप गडावरील अतिक्रमण हटविले तसेच पंढरपूर कॉरिडॉर चे काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही अशीही ग्वाही त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे, गिरीश महाजन, पत्रकार अर्णव गोस्वामी, राहूल कुलकर्णी , अभिनेत्री कंगना राणावत, आमदार रवी राणा, खासदर नवनीत राणा यांच्या वर केलेल्या कारवाया , षडयंत्र याबद्दल काय, आम्ही सहन करतो म्हणून काहीही बोलाल का ? आम्हीही खस्ता खाल्ल्या आहेत, घरा दारावर तुळशीपत्र ठेवून आम्ही काम करतोय, तोंड आहे म्हणून काहीही बोलायचं हे चालणार नाही असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला.
हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल आणि जनतेची कामं पूर्ण ताकदीने करेल, पुढच्या वेळेस संपूर्ण ताकदीने पुन्हा निवडून येऊ, लोकायुक्त विधेयक मंजूर करून आम्हीच भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले, आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय सुरू करीत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक पातळीवर काम करता आलं पाहिजे अशी व्यवस्था आम्ही करतो आहे, महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कारवाई साठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात सत्तर हजार कोटींच्या उद्योग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यातून मोठी रोजगार निर्मिती होईल, दोन तीन महिन्यात मोठे उद्योग इकडून तिकडे जाऊ शकत नाहीत , मात्र येणाऱ्या उद्योगांकडे टक्केवारी कोणी मागितली, उद्योगांचे प्लॉट परावर्तीत कोणी केले याची चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा