BREAKING NEWS
latest

“बारामतीत चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात” म्हणणाऱ्या पडळकरांवर अजित पवार संतापले..

 

प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत असतात. सोमवारी नाशिकमध्ये पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. गेल्या ४० वर्षात चुलते आणि पुतण्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

  एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, बारामतीचे चुलते आणि पुतणे दिवसा दरोडे टाकतात. महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांचा निधी यांनी पळवला आहे. शिरुर तालुक्याचा बिबट्या संदर्भातील १००० हजार कोटींचा निधी बारामतीला नेला. पण, बारामतीत एकही बिबट्या नाही. गेल्या ४० वर्षात यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागांचं नुकसान केलं. त्यामुळे आपली वाताहात केली,” असं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.

  गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, “प्रत्येकाला उत्तर देण्यास मी बांधील नाही. उपटसुंभ लोकांना उत्तर देण्यास अजित पवार मोकळा नाही. तो काय एवढा मोठा नेता लागून गेला नाही. डिपॉजिट जप्त करुन पाठवलं आहे.”

प्रश्न उपस्थित करणाऱ्यामध्ये ताकद आहे का ?

  कृषी प्रदर्शनासाठी शरद पवारांनी पैसे घेतले, असा आरोप भाजपाने केल्याचं प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विचारल्यावर अजित पवारांनी सांगितलं, “कृषी प्रदर्शन होतं असताना शरद पवारांनी पैसे मागितले, असं सांगणारा एक शेतकरी उभा करा, मी राजकारण सोडून देईन. प्रश्न उपस्थित करणाऱ्यामध्ये ताकद आहे का? आव्हान स्वीकारत राजकारणातून निवृत्त व्हायचं. भारताला स्वयंपूर्ण करण्यात काम शरद पवारांनी केलं. त्याची नोंद जगाने घेतली,” असेही अजित पवार म्हणाले.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत