प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट येथील एक्सप्रेस टॅावर इमारतीत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकसत्ता समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद गोयंका, संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते.
काळ, समाजकारण, राजकारण बदलले तरीसुद्धा गेल्या ७५ वर्षांपासून लोकसत्ताने आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम ठेवल्याबद्दल कौतुक व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात चांगले काम करणाऱ्या विविध संस्थांना पुढे आणण्याचे काम आणि महिला, युवकांसाठी लोकसत्ता समूहामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहे ही कौतुकास्पद बाब आहे. राज्याच्या विकासात माध्यमांचे योगदान मोठे आहे. आम्हीही राज्यात लोकसत्ता आणली आहे. गेल्या सात महिन्यात राज्य शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यांना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम माध्यमे करीत असून ही माध्यमे विकासाची वाट दाखविणारे आहेत. त्याचबरोबर राज्य शासन करीत असलेल्या कामांचे मूल्यमापन देखील माध्यमे करीत असतात, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र देशाचे 'ग्रोथ इंजिन' असून महाराष्ट्रानेही एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यासाठी राज्य शासन विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्प राबवित असून या प्रकल्पांना गती दिली जात आहे. यात राज्यातील रस्त्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी व्यवस्था उभी करण्यासाठी गेमचेंजर असलेला 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' गडचिरोली पर्यंत, नागपूर-गोवा महामार्ग, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड रस्ता प्रस्तावित आहे. याचबरोबर राज्यात मेट्रो प्रकल्प सुरु आहेत. अशा विविध प्रकल्पांमुळे वाहनांची संख्या कमी होऊन पर्यायाने प्रवाशांची वेळेची बचत होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
. मुंबई ही आर्थिक राजधानी असून कोस्टल रोडसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी राज्य शासनाने अनेक प्रकल्प हाती घेतले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हेच राज्य शासनाचे ध्येय असून त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राज्याची आर्थिक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पहिल्यांदाच आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे. राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. उद्योगवाढीसाठी नुकतेच दावोस येथे कोट्यवधींचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून राज्याच्या उद्योगवाढीला चालना मिळणार आहे. राज्याच्या विकास आणि लोकहितासाठी प्रसारमाध्यमांनी सूचना केल्यास त्यांच्या सूचनांवर राज्य शासनाकडून नक्कीच कार्यवाही केली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केले. यावेळी ‘लोकसत्ता वर्षवेध २०२२’ या वार्षिकांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा