महाराष्ट्रातील शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यावरील सर्व संदर्भित याचिकांवरील सुनावणी सात सदस्यीय घटना पिठाकडे जाणार की नाही याबाबतचा निर्णय आजही होऊ शकलेला नाही, याबाबतची सुनावणी आज अपूर्णच राहिली. आजपासून या संदर्भातील सुनावणी सुरू झाली त्यावेळी शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी ऑनलाईन पद्धतीने बाजू मांडली, हे प्रकरण सात सदस्यांच्या पिठाकडे द्यायची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र न्यायालयाने ठाकरे गटाला युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले.
घटना पीठ आवश्यक का आहे ?
लोकशाही वाचविण्यासाठी २०१६ साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नबाम बाबतच्या निर्णयावर अधिक स्पष्टता येणे आवश्यक आहे असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. कोणीही अविश्वास ठराव दाखल केला म्हणून विधानसभा अध्यक्षांना सदस्य अपात्रतेवर निर्णय घेता येणार नाही असे म्हणणे हे लोकशाही विरोधी असल्याचे त्यांचे म्हणणे होते, म्हणूनच सात सदस्यीय घटना पीठ आवश्यक आहे असे सिब्बल म्हणाले , अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनीही आपापले मुद्दे मांडले. मात्र सायंकाळी चार वाजता सुनावणी संपेपर्यंत शिंदे गटाच्या वकिलांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ मिळाला नाही म्हणून आता उद्याही यावर सुनावणी होईल, मग घटनापीठ नेमके कोणते ते स्पष्ट होऊ शकेल, मूळ याचिकांवर सुनावणी अद्याप बाकीच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा