BREAKING NEWS
latest

डोंबिवलीत महाशिवरात्री उत्साहात साजरी..




 प्रतिनिधी: अवधुत सावंत

  डोंबिवली शहरात आणि ग्रामीण भागात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात तसेच ग्रामीण भागातील श्रीशंकर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शंकर मंदिरात भक्तांना फळवाटप सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच भाविकांनी शंकराच्या मंदिराजवळ रांगा लावून भोले शंकराचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात शिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. 


महाशिवरात्रीनिमित्त शहरातील सर्वात जुन्या असलेल्या पिंपळेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. बेलपत्र, बेलफळे वाहत, शिवलिंगावर दूध अर्पण करून यथासांग पूजा करण्यात आली.  येथील शिवमंदिरात भाविकांनी पूजा करून महाशिवरात्र हा उत्सव साजरा केला. अनेक ठिकाणी या सणानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक शिवभक्तांनी भंडाऱ्याचेही आयोजन केले होते. आगामी निवडणुका पाहता अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भक्तांना शुभेच्छा देण्याचे मंदिर परिसरात बॅनर्स लावल्याचे दिसून येत होते.


  श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळातर्फे महाशिवरात्री हा उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीत भजन-कीर्तन तसेच अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. दुसऱ्या दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येथे महाप्रसादाचा लाभ घेत असतात. सागाव, मानपाडा, सोनारपाडा, सागर्ली परिसरातील अशा गावांमधील भाविक श्रावणी  सोमवारीच नव्हे, तर प्रत्येक दिवशी या मंदिराला भेट देत असतात. येणाऱ्या सर्व भक्त जणांसाठी प्रसाद म्हणून खिचडी, केळी, खजुराचे वाटप केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोकप्रतिनिधी या मंदिरास भक्तिभावाने भेट देत असतात. मंदिराचे विश्वस्त प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे, पूजा मात्रे, पंढरीनाथ पाटील, रिक्षा संघटनेचे अंकुश म्हात्रे हे महाशिवरात्रीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी झटत असतात.


श्री सागांवेश्वर शिवमंदिर यांच्या वतीने महाशिवरात्रीचे आयोजन मंदिराचे अध्यक्ष कर्ण जाधव यांनी मानपाडा क्रॉस रोडवरील शिवमंदिर येथे केले होते. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे भक्तांसाठी भंडारा ठेवण्यात आला होता. 'मानस प्रचार हौसाबाई चॅरिटेबल ट्रस्ट' सेवा संस्थेच्या वतीने श्री राम कथायज्ञ श्री रामजी मिश्रा महाराज यांचे सुश्राव्य किर्तन १० ते १८ फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले होते. रात्रीपासून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांनी रीघ लावली होती यात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाशिवरात्रीच्या सकाळीच मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतल्याचे कर्ण जाधव यांनी सांगितले. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळते काही दिवसापूर्वी श्री त्रिंबकेश्वर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी 'दर्शन यात्रा' आयोजित केली होती महादेवाच्या भक्तांना दूर जाऊ लागू नये म्हणून हे मंदिर २०१४ साली बांधण्यात आल्याचे कर्ण जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले, ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक मदत करणे त्याप्रमाणे सामाजिक कार्य नेत्रदान वैद्यकीय शिबिर असे आयोजित आम्ही करीत असतो असे ते म्हणाले. 


  कोपर येथील नागेश्वर मंदिरात देखील ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीचा भजन कीर्तनाचा  कार्यक्रम ठेवण्यात आला होता १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी असा हा साप्ताहिक कार्यक्रम होता यामध्ये धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन, हरिपाठ इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात आले होते तसेच १९ फेब्रुवारी रविवारी रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भंडाऱ्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.

« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत