प्रतिनिधी: अवधुत सावंत
मानपाडा पोलीसांना बंद घराची रेकी करून दिवसा घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे केवळ तीन महिन्यात या आरोपीने डोंबिवली परिसरात धुमाकूळ घालत १० घरफोड्या केल्याची पोलीसांना कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले १२ लाखांचे दागिनेही हस्तगत केले आहेत. शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चैनाळे (वय: २६ वर्षे) असे गजाआड केलेल्या अट्टल घरफोड्या आरोपीचे नाव आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीला अटक
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या त्या संशयित व्यक्तीचा शोध सुरु केला असता, हा व्यक्ती अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस पथकातील सपोनि. अविनाश वणवे, सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा. राजेंद्र खिलारे, गडगे, ठिकेकर, पवार, पाटील, माळी, मिसाळ, पोना. भोईर, किनरे, पवार, पाटील, पोशि. मंझा, चौधर, आहेर, आव्हाड या पथकाने व्दारली गावात सापळा रचून आरोपी शंकर भिमराव सुर्यवंशी उर्फ धोत्रे उर्फ चैनाळे याला ताब्यात घेतले.
१२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मानपाडा, डोंबिवली आणि विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साथीदाराच्या मदतीने बंद घराचे कुलूप, कडी कोयंडा तोडून १० घरफोड्या केल्याची पोलीसांना कबुली दिली. त्यानंतर घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून १० घरफोडीच्या गुन्ह्यातील २०० ग्रॅम वजनाचे सोने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
१० घरफोड्या केल्याची दिली कबुली
अटकेतील आरोपी मूळचा कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील राहणारा असून तो काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबई परिसरात आला होता. तर गेल्या तीन महिन्यांपासून तो अंबरनाथ तालुक्यातील व्दारली गावात राहत आहे. या तीन महिन्याच्या कालावधीत डोंबिवली भागात १० घरफोड्या केल्याची कबुली त्याने दिली. त्याने आणखी काही घरफोड्या केल्याची शक्यता असल्याने पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा