प्रतिनिधी: अवधुत सावंत
अमेरिकेत पुढील वर्षी होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये आता भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी उतरले आहेत. 'फॉक्स न्यूज'वर दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. आता ते सोशल मिडिया व्हिडीओद्वारे निवडणूक लढवण्यासाठी निधी संकलित करण्याबाबत लोकांना आवाहन करत आहेत.
रामास्वामींबाबत थोडक्यात माहिती
रिपब्लिकन पक्षाचे सदस्य असलेले विवेक रामास्वामी यांनी डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना पक्षात प्रवेश केला. विवेक यांनी २००३ मध्ये सिनसिनाटी येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आपले शिक्षण पूर्ण केलं. २००७ मध्ये त्यांनी हार्वर्डमधून पदवी घेतली. ३७ वर्षीय विवेक रामास्वामी हे आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक आहेत. 'ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर' मधील सर्जन आणि सहाय्यक प्राध्यापक अपूर्व तिवारी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. २०२२ मध्ये त्यांनी स्ट्राइव्ह ऍसेट मॅनेजमेंट नावाची नवीन कंपनी स्थापन केली. विवेक त्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष आहेत.
त्यांनी अमेरिकन कॉर्पोरेट्स मधील सामाजिक न्यायाच्या समस्यांवर एक पुस्तक लिहिले आहे. त्यांनी बायोफार्मास्युटिकल कंपनी रिव्हॉल्ट सायन्सेसची स्थापना केली आहे. विवेक यांचे आई-वडील केरळहून अमेरिकेला गेले होते. त्यांचे वडील इंजिनिअर असून आई मानसोपचारतज्ज्ञ आहे. केरळमधील, वेदकेंचेरी, पलक्कड हे त्यांचे मूळ गाव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा