BREAKING NEWS
latest

भोपरवासीयांच्या उग्र आंदोलनात पालिका अधिकाऱ्यांना घेरल्याने अधिकारी नमले; अनधिकृत नळ जोडण्यावर गुरुवार शुक्रवारी करणार कारवाई..

 


प्रतिनिधी: अवधुत सावंत

  गेले कित्येक वर्ष डोंबिवलीतील भोपर व देसलेपाडा गावात तीव्र पाणीटंचाई असून यासाठी भोपरवासीयांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन केले. या उग्र आंदोलनामुळे महापालिकेचे अधिकारी नमले. आंदोलन स्थळी पालिका अधिकारी आले असता आंदोलकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता. येत्या गुरुवारी व शुक्रवारी अनधिकृत नळ जोडण्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पाणी खात्याचे वरिष्ठ अभियंता किरण वाघमारे यांनी दिल्यानंतर या आंदोलनकर्त्यांनी पालिकेचे अधिकारी वाघमारे आणि कुलकर्णी यांची आंदोलन स्थळातून सुटका केली.

सविस्तर वृत्त असे की गेली अनेक वर्ष डोंबिवली येथील भोपर गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई भासत असून आज भोपर ग्रामस्थांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात शनी मंदिर येथे धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनासाठी डोंबिवलीतील अनेक मान्यवर नागरिक सहभागी झाले होते. गेली सात आठ वर्ष भोपर गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेने एक  एक्स्प्रेस पाईपलाईन टाकलेली असून, या पाईपलाईन मधून अनधिकृत बांधकाम करणारे चोरून कनेक्शन घेत असतात. भोपर गावांमध्ये अनधिकृत बांधकाम फोफावले असून, या बांधकामांना पाणी मिळते. परंतु सामान्य नागरिकांना पाणी मिळत नसल्याची तक्रार या आंदोलनात ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून कल्याण डोंबिवली महापालिकेकडे पाणीटंचाई बाबत ग्रामस्थांमार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु महापालिका पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. गेल्या काही वर्षापासून अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी टाक्यांचे बांधकाम सुरू आहे. अत्यंत धीम्या गतीने त्यांचे बांधकाम सुरू आहे. भोपर गावांमध्ये पाणीटंचाई असताना महापालिका कायम दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार या आंदोलनात प्रसिद्धी माध्यमांसमोर करण्यात आली. आंदोलनामध्ये भोपर वासियांना पाठिंबा देण्यासाठी डोंबिवलीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक विविध पक्षातील नेते मंडळी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

या आंदोलनामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. सायंकाळी तीन वाजले तरी महापालिकेचे अधिकारी किरण वाघमारे हे आले नव्हते. वारंवार त्यांना संपर्क साधून येण्यासाठी विनंती ग्रामस्थांमार्फत केली असता त्यांनी संदप गावात कारवाई सुरू असल्याचे सांगत येण्याचे टाळत होते. मात्र साडेतीन वाजता आंदोलन स्थळी आले असता त्यांनी गुरुवार किंवा शुक्रवारी अनधिकृत नळ जोडण्यावर कारवाई करू असे सांगताच, आंदोलनातील काही महिला व कार्यकर्ते चिडले. आंदोलनात सहभागी झालेले नेते व ज्येष्ठ कार्यकर्ते या आंदोलकांना समजाविण्याचे काम करीत होते. मात्र महिलांनी व्यासपीठाजवळ येत आजच कारवाई करा असा एकसुर लावला. त्यामुळे दोन्ही अधिकारी गांगरून गेले होते. जमलेल्या आंदोलकांना नेमके काय सांगावे हे त्यांना सुचत नव्हते. बहुदा वरिष्ठांशी संपर्क साधून त्यांनी पुन्हा एकदा गुरुवारी  शुक्रवारी अनधिकृत नळ जोडण्यावर कारवाई करू असे सांगितले.

त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी त्यांची सुटका केली. या आंदोलनात ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, व्यासपीठावर एकनाथ पाटील. काळू कोमसकर, ऍड. ब्रह्मा माळी, मधुकर माळी, शिवाजी माळी, नाना (गंगाराम) शेलार, रंगनाथ ठाकूर, दीपक ठाकूर, अभिमन्यू माळी, वैजनाथ देसले, युवा मोर्चाचे गजानन पाटील, महेश संते, दिलखुश माळी, रमेश पाटील, विश्वास माळी, रमेश देसले आणि मुकेश पाटील आंदोलनात सहभाग घेऊन उपस्थित होते.


« PREV
NEXT »

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत