राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर झाला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेती क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. विरोधीपक्षाने राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.
राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राज्यात सध्या आर्थिक बेशिस्तीचे वातावरण आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी स्थगितीमुळे खर्च झालेला नाही. शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कर्ज काढून शेती केली जात आहे. शेतीचा उत्पादन खर्च निघत नाही अशी परिस्थिती आहे. अवकाळी पाऊस, महापूर अशा आपत्ती आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. सततच्या पावसाचे पैसै अजून मिळाले नाहीत. अशा काळात वर्षाला एका कुटुंबाला सहा हजार रुपये दिले आहेत. एका शेतकऱ्याला दिवसाला १७ रुपये मिळणार आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा असून त्यापेक्षा सोयाबीन, द्राक्षे, कांदे आणि अन्य शेतपिकाला दर द्या. दूरदृष्टीचा आभाव आणि स्वप्नांचे इमले, शब्दांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही अर्थसंकल्पावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, या आधीचे दोन अर्थसंकल्प महाविकास आघाडी सरकारने मांडले होते. त्या वेळी कोरोनाचे संकट होते आणि केंद्र सरकार आमच्या बाजूचे नव्हते. २५ हजार कोटींहून अधिक जीएसटी थकबाकी होती. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. आमच्या काळातील योजना नामांतर करून जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे काजूचा हलवा आहे असे त्यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा