दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, पोलीसांनी सिसोदिया यांच्यासोबत केलेल्या गैरवर्तनाचे प्रकरण समोर आले आहे. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही ट्विट करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल म्हणाले की, पोलीसांना हे करायला वरून सांगितले आहे का? त्याचवेळी दिल्ली पोलीसांनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे.
खरं तर, या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ यापूर्वी दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी ट्विट केला होता. ज्यात त्यांनी लिहिले की, ‘राऊस एव्हेन्यू कोर्टात एका पोलीसाने मनीषजींसोबत केलेले धक्कादायक गैरवर्तन. दिल्ली पोलीसांनी त्याला तात्काळ निलंबित करावे. यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आणि म्हटले की, "पोलीसांना मनीषजींसोबत असे गैरवर्तन करण्याचा अधिकार आहे का? वरून (गृह मंत्रालय) पोलीसांना हे करायला सांगितले आहे का?" यासोबतच ‘आप’च्या अन्य नेत्यांनीही पोलीसांच्या या वागणुकीवर आक्षेप घेतला आहे.
हे प्रकरण तापल्याचे पाहून दिल्ली पोलीसांनी तातडीने त्याची दखल घेतली. त्यांनी ट्विट करून आपली बाजू मांडली. ज्यात दिल्ली पोलीसांनी म्हटले आहे की, ‘राऊस एव्हेन्यू कोर्टात मनीष सिसोदियांसोबत पोलीसांनी केलेले गैरवर्तन हा अपप्रचार आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध केलेला पोलीसांचा प्रतिसाद सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींनी माध्यमांना निवेदन देणे कायद्याच्या विरोधात आहे.
मनीष सिसोदिया यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनानंतर 'आम आदमी पार्टी'ने व्हिडिओ कॅप्शननंतर ट्विट केले होते. पीएम मोदी आणि दिल्ली पोलीसांना लाज वाटली पाहिजे, असे पक्षाने लिहिले. मनीष सिसोदिया यांच्याशी असे वागण्याची दिल्ली पोलीसांची हिंमत कशी होते? हा देश तुमची हुकूमशाही पाहत आहे. यानंतर 'आम आदमी पार्टी'चे ट्विटर खाते निलंबित करण्यात आले. मात्र काही काळानंतर पक्षाचे खाते पूर्ववत झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा