नाशिक शहरासह जिल्ह्यात अनंत चतुर्दशी निमित्त लाडक्या गणरायाला निरोप देताना सकाळपासून उत्साहाचे वातावरण नागरिकांमध्ये पाहायला मिळत होते मात्र सायंकाळी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जण बुडाल्याची घटना घडली असून यात दोघांचे मृतदेह सापडले असून इतर दोघांच्या मृतदेहाचा शोध पालिका प्रशासन घेत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील रामकुंड परिसरामधील गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन जण बुडाल्याची घटना समोर आली आहे. हे दोघे जण विसर्जनासाठी दाखल झाले होते.
याचवेळी ते दोघेही बुडाल्याची माहिती समोर आली असून सद्यस्थितीत या दोघांचाही महापालिकेच्या अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शोध घेतला जात आहे.
तर दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील वालदेवी धरणाच्या परिसरामध्ये घडली आहे. वालदेवी परिसरात मित्रांसोबत विसर्जनासाठी गेलेल्या दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून या दोघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच पुढील कार्यवाहीसाठी हे दोन्ही मृतदेह नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा